जशी दृष्टी तशी सृष्टी
मी एका नामांकित क्लासेसमध्ये मराठी ,हिंदी व समाजाशास्र विषय शिकवीत असे .एके दिवशी मी विदयार्थ्यांना महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीविषयी माहिती सांगत असताना एका विद्यार्थ्याचे पालक आले असता त्यांनी त्यांच्या पाल्याला काही कामासाठी बाहेर जाण्याची परवानगी मागितली .मी त्या विद्यार्थ्याला बाहेर जाण्याची परवानगी देताच त्याने त्याची चप्पल शेल्फ्वरून काढून पायात घालताच शेवटच्या बाकावरचा एक विदयार्थी हळू आवाजात त्याला म्हणाला , "तुझी चप्पल तर फारच सेक्सी आहे ." बाहेर जाणारा विदयार्थी त्या विद्यार्थ्याकडे रागाने पाहत ,"बाहेर ये मग बघतो तुझा बेत ." असे हळू आवाजात पुटपुटत बाहेर पडला .त्या दोघांनाही वाटले की माझे त्यांच्याकडे लक्षच नाही .मी चपलेला नाव ठेवणाऱ्या विद्यार्थ्याला वर्गात उभे केले आणि सांगितले ,"तू आत्ता जे वाक्य बोललास ते वाक्य सर्वांसमोर बोल ." चप्पलला सेक्सी म्हणणारा विदयार्थी खजिल झाला आणि खाली मान घालून उभा राहिला .मी वर्गातील सर्व विदयार्थ्यांना उद्देशून सांगितले," जे वाक्य बोलताना आपल्याला स्वतःला लाज वाटत असेल तर ते वाक्य न उच्चारलेलेच बरे . "त्यानंतर मी सर्व विदयार्थ्यांना विचारले , "सेक्सी या शब्दाचा मराठीतून अर्थ सांगा ?"एकही विदयार्थी उत्तर देण्यास धजावला नाही .वर्गातल्या शांततेचा भंग करीत मी म्हणाले ,"तुम्हांला सचिन तेंडूलकरचा शॉट सेक्सी वाटतो ,सानिया मिर्जाचा शॉट सेक्सी वाटतो मग सेक्सी शब्दाचा अर्थ सांगताना का संकोच वाटतो ?सेक्सी म्हणजे आकर्षक .आणि यात वाईट काय होते की तुम्ही सर्वजण खाली मान घालून गप्प बसलेत .प्रत्येक फॉर्मवर सेक्स म्हणजेच मेल ,फिमेल असे लिहावे लागते .मराठी व हिंदीच्या व्याकरणात लिंग ओळखा या प्रश्नाचे उत्तर लिहावे लागते .मग तोच शब्द इंग्लिशमधून सेक्स ,सेक्सी या नावाने उच्चारताच आम्हांला लाज का वाटते ?याचाच अर्थ 'जशी दृष्टी तशी सृष्टी .' ज्या दिवशी तुम्हांला तुमच्या पुढे असलेले पुस्तक सेक्सी वाटेल त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने शिक्षणाचा अर्थ जाणून घेण्यास लायक आहात .असे माझे प्रामाणिक मत आहे ."वर्गात वेळेवेळी उपस्थित होणाऱ्या प्रसंगातूनच लैंगिक शिक्षण वेळीच देणे आवश्यक असते तसेच स्री पुरुष समानतेचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये बिंबवणे आवश्यक असते .विद्यार्थ्यांच्या वर्गातील खोडया या खरे तर त्रासदायक नसून शिक्षकाला आव्हान देणाऱ्याच असतात .आणि हे आव्हान पेलण्यातच शिक्षकाची खरी कसौटी लागत असते .
अगदी बरोबर मॅडम
ReplyDeleteधन्यवाद!
Delete