कुंकू

                                                  कुंकू 
              
            मला माझी आजी आठवताच तिची कुंकू लावतानाची मूर्ती आठवत असते . कपाळावरचा कुंकू म्हणजे तिचा जीव की प्राण होता . पतिव्रतेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे कपाळावरचा कुंकू होय आणि शिरोभागी असलेला हा कुंकूच स्रीला एकनिष्ठता शिकवित असतो अशी तिची ठाम समजूत होती त्यामुळे तिचा कुंकू हा खऱ्या अर्थाने एक संस्कार सोहळाच असायचा .  मी जर चित्रकार झाले असते तर पहिले चित्र हे मी आजीचेच काढले असते आणि तेही कुंकू लावत असतानाचे . तिचे कुंकू लावणे म्हणजे सर्वांचा चर्चेचा विषय असे . तिच्या मैत्रिणी जर सकाळच्या गाडीने तिच्यासोबत गावाला जायला निघाल्यात की एखादी मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला म्हणायची " तू मोरे (पुढे ) निघ नि ती लटकननं कपाय रंगानं व्हयन का दख ती तासभर कुकूच कोरत बशी (बसेल ), जश्या तिलेच नवरा शे . तिना त्या कुकूनामुये गाडी चुकी जायी .  तू तिले पुढे घालीसन निघ मी वनूच ."  तिचे कुंकू लावणे म्हणजे एक मोठं किचकट काम असे . ती कुंकू लावायला बसली की तिला कुणीही काही काम सांगण्याची सोय नसायची . तिला काही सांगायचे असले तर तिचे कुंकू रेखाटन पूर्ण झाल्यावरच सांगावे लागत असे . कपाळी कॅनव्हासवर मेणरूपी ब्रश फिरल्यावर दुसरा हात फिरायचा तोच मुळी लाल लाल कुंकवाचा त्यानंतर ती पदराचे टोक बोटात पकडून कपाळावरील कुंकवाला कधी डाव्या बाजूला कोर तर कधी वरच्या बाजूला कोर तर कधी वरती तर कधी खाली असे कोरत कोरत ती त्या कुंकवाचा पूर्ण गोल असा काही रेखायची की तिचा कुंकू मला कधी सूर्य वाटायचा तर कधी पौर्णिमेचा चंद्र तर कधी पृथ्वीचा गोल वाटायचा . तिचा वर्तुळाच्या आकाराचा कुंकू मला सृजनतेचे प्रतीक वाटायचा तसेच तो सूर्याप्रमाणे सर्वांना ऊर्जा पुरवणारा वाटायचा तसेच तो चंद्राप्रमाणे सर्वांना शितल छाया देणारा वाटायचा . शाळेत असताना कंपासच्या साह्याने वर्तुळ काढताना आमचे कंपासचे टोक हमखास जागा बदलायचे आणि आमचे वर्तुळ दोन परीघ घेत आकारायचे तेव्हा आजीचे वर्तुळी कुंकू हमखास आठवायचे आणि मग आपलेही वर्तुळ आजीच्या कुंकवासारखेच रेखाटले गेले पाहिजे अशी मनाशी खुणगाठ बांधत मी वर्तुळ काढायची . जणूकाही माझी व आजीच्या कुंकवाची ही अदृश्य स्पर्धा मग चांगलीच रंगायची आणि अनेक कागद त्यात बळी पडायचे . लहानपणाच्या या अजाणता  बळी गेलेल्या कागदांना मात्र मी आता जीवापाड जपते कारण लहानपणी केलेली  पर्यावरण ऱ्हासाची भरपाई करण्यासाठी मी कागदाचे छोटेसे चिटोरेही लिहिण्यासाठी वापरत असते ,   तसेच जाहिरातींचे एका बाजूला कोरे असलेले कागदही लिहिण्यासाठी वापरत असते.  
         असेच  एके दिवशी   एका स्पर्धेसाठी ' हळदी कुंकू ' असा विषय देण्यात आला आणि अर्धा मिनिट कुंकू या विषयावर तर अर्धा मिनिट हळद या विषयावर बोलायचे होते . 
' कुंकू ' हा शब्द उच्चारताच भारतीय स्रीची एक सोज्वळ प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते . त्याचबरोबर मला माझी आजी लटकन माय आठवली . कुंकवाचा लाल रंग उगवत्या सूर्याचे दर्शन घडवतो . लाल रंग म्हणजे उर्जेचा स्रोत होय . सूर्यप्रकाशामुळे प्रकाश संश्लेषण होऊन वनस्पती अन्न तयार करीत असतात आणि तेच अन्न खाल्ल्यावर आपल्या शरीरात तयार होणारे रक्त हेदेखील लालच होय . त्यामुळे एक स्री जेव्हा आपल्या पतीच्या नावाने लाल कुंकू लावते तेव्हा ती आपल्या पतीला सांगत असते की , " तुझं व माझं नातं रक्ताचं नसलं तरीदेखील आपले नातं हे रक्ताच्या नात्याइतकचं श्रेष्ठ आहे . मी या घरात आले ते तुझ्या रक्ताच्या नात्यांना बांधून ठेवण्यासाठी . कुटुंबाला एका वर्तुळात ठेवण्यासाठी तुला केंद्रस्थानी ठेवून मी त्या वर्तुळाच्या परिघात सतत फिरत राहणार कधी पत्नी बनून , कधी सून ,कधी वहिनी ,कधी काकू ,कधी आई ,कधी आजी बनून . वर्तुळातील प्रत्येक नात्याच्या त्रिज्येत वावरताना मला समानतेचा मंत्र जपावाच लागेल तरच ते वर्तुळ परिपूर्ण होईल हे मला ठाऊक आहे . " तसेच लाल रंग ल्यायलेले कुंकू वीरतेचे प्रतिक असून ज्या क्षणी पती पत्नीचे रक्षण करण्यासाठी जवळ नसेल तेव्हा त्याच्या नावाने लावलेले हे लाल कुंकू तिला वीरांगना बनवून लढण्याचे बळही देईल . हेच कुंकू लावण्यामागचे खरे कारण आहे . परंतू मधल्या काही काळात कुंकू लावण्याची कारणे ही फक्त पुरुषाचे वर्चस्व वाढविणे यापुरतेच सीमित राहिले आणि पती निधनानंतर स्रिने कुंकू लावू नये ही प्रथा तर स्रीच्या अस्तित्वालाच धक्का पोचवणारी ठरली कारण कपाळी कुंकू नसलेली स्री म्हणजे कोणत्याही पुरुषाच्या लोचट नजरेची शिकार व्हायला मिळालेली आयतीच संधी देणारी ठरली .   आज मात्र स्री जागरूक झाली आणि तिने या वाईट प्रथेविरुद्ध पुकारलेले बंड हे तिच्यासाठी वरदान ठरले .  कुंकू लावणे न लावणे हे ठरविण्याचा अधिकार स्रीला आहे याचे भान आजच्या स्रीत  आले आहे . ही नक्कीच सुखावह बाब आहे . ( कुंकू लावण्याची शास्रीय कारणेही दिली जातात परंतू त्याविषयी ठोस पुरावे अजून तरी नाहीत त्यामुळे त्याविषयी न लिहिणेच योग्य होय . )
     अर्ध्या मिनिटात कुंकवावर बोलण्यास आजीचे कुंकूच कारणीभूत ठरले आणि प्रथम पारितोषिकही प्राप्त झाले ते केवळ आजीच्या कुंकवामुळेच .  
©ज्योत्स्ना पाटील

Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या