पुस्तकांच्या जगात
मनाची पकड घेणारी पुस्तके तशी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच असतात नि असेच एक पुस्तक ' गेले लिहायचे राहून.' खरंच हे पुस्तक वाचताना जाणवते की अजून खूप काही लिहायचे राहूनच गेले आहे . लेखक विनायक पाटील यांच्या अनुभवांचा खजिना हा न संपणारा आहे याची जाणीव हे पुस्तक वाचताना हमखास होत असते . खरे तर हे पुस्तक फार पूर्वीच प्रकाशित व्हायला हवे होते परंतु उशिराने का होईना हे पुस्तक प्रकाशित झाले आणि समाजातील सर्वच घटकांसाठी ते किती उपयुक्त आहे याची जाणीव झाली . हे पुस्तक म्हणजे राजकीय क्षेत्रातील घडामोडींवर जसा प्रकाश टाकते तसेच ते कृषी क्षेत्रालाही समृद्ध करते नि सरकारी व शैक्षणिक कार्य प्रणालीवरही भाष्य करते व समाजाला उन्नतीचा मार्गही दाखवते . प्रत्येक घरी विनायक पाटील यांचे ' गेले लिहायचे राहून ' हे पुस्तक संग्रही असावे , असे हे पुस्तक वाचताना सारखे वाटत असते . या पुस्तकातील १०२ अनुभव हे लेखकाच्या प्रांजळपणाचे निदर्शक होय . संपूर्ण महाराष्ट्र विनायक पाटील यांना वनाधिपती विनायकदादा या नावाने का ओळखतात ? ' गेले लिहायचे राहून ' हे पुस्तक वाचताना कळत जाते . त्यांच्या वनशेतीच्या प्रयोगांचे कौतुक करावे तेवढे कमीच होय . या पुस्तकात उल्लेख केलेल्या शेवगाची शेती , बाभळीची शेती , आवळ्याची शेती , फुलांची शेती , गांडूळ शेती , काजूची शेती असे अनेक शेतीतील त्यांनी केलेले प्रयोग वाचताना एक बाब लक्षात येते की आमच्या देशातील शेतकऱ्यांनी शेतीत सतत नवनवीन प्रयोग केलेत तर त्यांना आत्महत्त्या करण्याचे काही कारणच नव्हे . प्रत्येक क्षेत्रात सर्जनशीलतेला तोड नाही आणि हीच बाब शेती क्षेत्रालाही लागू पडते आणि त्यासाठी शेतकरी बांधवांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक होय . राजकीय क्षेत्रात किती चांगल्या प्रकारे काम करता येते नि जनतेची सेवा करता येते याची जाणीव हे पुस्तक करून देत असते नि त्यासाठीच हे पुस्तक प्रत्येक राजकारणी व्यक्तीने वाचले पाहिजे . राजकारणातील सर्वेसर्वा असलेले चतुरस्र व अष्टपैलू असलेले महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणजेच यशवंतराव चव्हाण साहेब यांची ' राहून गेलेली प्रश्नबत्तिशी ' मनाला चटका लावून जाते नि वाटते की विनायकदादा नि चव्हाण साहेबांची भेट लवकर का झाली नाही ! शेवटी योगायोगाच्या गोष्टी असे म्हणावे लागते . या पुस्तकातील लेखकाची साहित्यिक व सर्वच क्षेत्रातील कलाकारांची ओळख म्हणजे समृद्ध जीवनाचा लेखाजोखा होय . कवी कुसुमाग्रज , ना . धो . महानोर , मंगेश पाडगांवकर , नामदेव ढसाळ , बाबासाहेब पुरंदरे यांच्या सहवासातील सोनेरी क्षण , सुभाष अवचट सारख्या चित्रकाराशी असलेले भावबंध असोत किंवा आदिवासी व मागासवर्गीय समाजाविषयी असलेली तळमळ असो हे सारेच वाचकाला संमोहीत करून जाते हे खरे या पुस्तकाचे वैशिष्ट्य होय . सर्वच क्षेत्रातील व्यक्तींचे खरेखुरे संमेलनच विनायक पाटील यांनी या पुस्तकात भरवले आहे असे हे पुस्तक वाचताना वाटत असते . 'महातो कहीन ' यात , दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील महातो म्हणतो , " यहॉं इन्सान कम आते हैं . " हे वाक्य देशातील राजकीय व प्रशासकीय व्यक्तींवर खूप काही भाष्य करून जाते . तर 'उर्दू ' यातील अनुभव म्हणजे मंत्रीही शाळेतील लहान मुलांसारखी खोडकर बालकेच होत नि वाचकही हसूनहसून लोटपोट होतो . ' जन्म कवितेचा ' यात दंगलग्रस्तांना मदत करताना झालेली लेखकाची घालमेल आणि त्यावर लिहिलेली कुसुमाग्रजांची कविता वाचकाला अंतर्मुख करून जाते . मे महिन्यात तेही वर्ध्यातील वास्तव्यात दुपारच्या उन्हाच्या झळा कमी करण्याचे काम , ' गेले लिहायचे राहून ' या पुस्तकाने केले असे म्हटले तर ती आतिशयोक्ती नव्हे . कारण हे पुस्तक वाचकाला इतके गुंतवून टाकते की विचारायलाच नको . संग्रही असावे नि केव्हाही , कुठूनही वाचावे असे हे पुस्तक होय त्यामुळे हे पुस्तक ज्यांच्या आग्रहास्तव लिहिले गेले ते संपादक शैलेंद्र तनपुरे व प्रकाशक दिलीप माजगांवकर यांचे धन्यवाद मानायला हवेत . एक चांगले पुस्तक वाचकांना लाभले .
Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.