मराठी अस्मिता 

                         पुण्याला अनेकवेळा येणे व्हायचे पण पुण्याला येऊन सिंहगड किल्ला पाहणे काही व्हायचे नाही . प्रत्येक वेळेला ठरवायचे की यावेळेस पुण्याला गेलो की सिंहगड किल्ला पाहायचाच पण हा ' च ' काही पाहण्याचा योग आणीत नव्हता त्यामुळे ' च ' जोडूनही उपयोग नव्हता . शेवटी मनात म्हटले , जाऊ दया . जेव्हा आपलं आणि सिंहगडाचं गोत्र जुळून येईल त्यादिवशी भेटीचा योग येणारच आणि खरोखरच एके दिवशी ध्यानीमनी नसताना माझी लेक म्हणाली , " आज रविवार आहे आपण सर्वजण सिंहगडावर जाऊ या , गड चढताना सगळ्यांचीच दमछाक होत होती तर काही तरूण मुले भराभर गड चढून जात होती . काही मुले मात्र चार - पाच मुलींना पाहून रेंगाळत आणि शेरेबाजी करीत गड चढत होती तेव्हा त्या मुलींसोबत आम्हांला हळूहळू गड चढणे भाग पडले . त्या मुली आम्हांला म्हणाल्या , " काका , काकू , तुम्ही आमच्यासोबतच राहा ." आम्ही त्यांची विचारपूस केली असता कळले की , त्या पाची मुली बहिणी होत्या . आम्ही पाच बहिणी असे म्हणताच , त्या एका सुरात म्हणाल्या , आम्ही चुलत बहिणी आहोत , भाऊ लोकं यायला तयार नव्हते आमच्यासोबत मग आम्हीच आलोत आगाऊपणा करून आणि आता गड चढताना कळते की ,किती अवघड आहे ! " आम्हां दोघांना त्यांच्या वाक्याचे हसूही आले आणि कौतुकही वाटले . आम्ही दोघे त्या मुलींसोबत गड चढत असताना आमचे दोघे नमुने लेक व भाचा पुढे जाऊन वरून आमची व आमच्यासोबत असणाऱ्या मुलींची कसरत पाहून मजा बघण्याचे काम करीत होते . कारण त्या बहिणींमध्ये दोघी तर इतक्या नाजूक होत्या की , खूप चढाव आला की त्यांना हात देऊनच वरती ओढावे लागायचे , " आमची बया ( माझी मुलगी पूर्ती ) माझ्याजवळ येऊन हळूच कानात कुजबुजली , "आई , या बयांना गड चढणे म्हणजे एफ . सी . रोडवर फिरणे वाटले की काय ! गडावर कुणी चप्पल घालून येतं का ! " मीही तिला वेडावून दाखवत म्हटले , हो का ? आमचे पूर्वज चप्पल घालूनच गड चढायचे , आली मोठी शूजवाली मड्डम !" माझ्या उत्तरावर आमच्या बाईसाहेब बरसल्या , हो , मला माहितीच होते तू असंच काहीतरी म्हणशील तुला दुसऱ्या मुलींचे भारी कौतुक असते . " अशी आमची चेष्टा मस्करी व एक दुसऱ्याला मदत करीत गड चढणे चालू असतानाच आमच्या मागून पाच - सहा मुले आलीत आणि मागे राहिलेल्या एका मुलाला त्यांनी आवाज दिला व त्याला भराभर येण्यास सांगताच तो सगळ्यांना ऐकायला जाईल अशा आवाजात ओरडला , " वरती शिवाजी काय गरम गरम जेवायला वाढणार आहे का ? " अर्थात हे वाक्य तो गुजराथी भाषेतून बोलला होता , ती सर्व मुले गुजराथी होती हे त्यांच्या संवादातून कळलेच होते . त्या मुलाचे ते वाक्य ऐकताच माझेही रक्त खवळले नि मी त्या सर्व मुलांना ओरडून सांगितले , " खबरदार जर शिवाजी महाराजांविषयी असे बोलाल तर , छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आम्ही हिंदू म्हणून जगत आहोत आणि स्वातंत्र्य म्हणजे काय असते हे त्यांनीच शिकवले नाहीतर गुलामीतच खितपत पडलो असतो . त्यांच्याविषयी कोणतेही अनुद्गार काढलेले सहन केले जाणार नाही ." माझा रूद्रावतार पाहून बोलणारा मुलगा व त्याचे जोडीदार खजील झालेत आणि ' सॉरी ' म्हणून मागेच थांबलेत . थोडे पुढे गेल्यावर पूर्ती मला म्हणाली , " आई , अशा मूर्ख मुलांना कशाला बोलत बसलीस , ते उलटून काही बोलले असते तर ..... " मग मी लेकीला सांगितले , " बोलले असते तरी मला वाईट नसते वाटले कारण मी माझी अस्मिता जपली . पण त्या मुलाला जर मी बोलले नसते तर मात्र मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते . छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कोणीही अनुद्गार काढलेत तर त्यांना कायदयानुसार शिक्षा होऊ शकते कारण शिवाजी महाराज आपली अस्मिता आहे आणि अस्मिता जपणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे . राष्ट्रपुरूषांचा आदर व सन्मान करायला शाळेत शिकविले जाते मग काय शाळा सोडल्यानंतर काहीही केले तरी चालते का ? आजच्या युवकांना योग्यवेळी योग्य गोष्टीची समज देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे . " सवयीप्रमाणे लेकीला माहितीच आहे , आपल्या आईला जे करायचे ते ती करणारच ,गप्प बसलेले बरे ,ती काही न बोलताच चालत राहिली . शेवटी एकदाचे सिंहगडावर पोहचलो आणि वरून जे दृश्य दिसले ते पाहून मन प्रसन्न झाले . थोडया वेळापूर्वी घडलेल्या घटनेमुळे आलेली उद्विग्नता कुठल्या कुठे पळून गेली . मधून मधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरींनी ओलाव्याचा शिडकावा केला होताच आणि आताचा नजारा पाहून गड चढण्याचे सार्थक झाले होते आणि छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे यांसारखे एकनिष्ठ मावळे यांचे स्मरण करून ऊर अभिमानाने भरून आला होता . ' शिवाजी महाराज ' या नावात काय अशी जादू आहे की , नुसते नाव जरी उच्चारले तरी शेकडो हत्तींचे बळ मिळाल्याचा भास होतो आणि नकळत आपण त्यांच्यापुढे नतमस्तक होत असतो . सिंहगडावर गेले की , ' गड आला पण सिंह गेला ' हे उद्गार आठवतात आणि काळजात चर्रर्र .... होत असते . तानाजी मालुसरेंच्या देशाभक्तीला मानाचा मुजरा करून परतीचा प्रवास करताना आपल्या इतिहासाला सोबत घेऊनच येत असतो नि गर्वाने म्हणतो ' जय महाराष्ट्र , जय शिवाजी!'

Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या