धर्मनिरपेक्ष देश
२४ डिसेंबर २०१७ ला बागडोग्रा विमानतळावर पोहोचलो आणि तेथे आमच्या दिमतीला संतोष अर्धलकर व कॅल्टन परेरा हे दोघे हजर. दोघांनी आमचे स्वागत केले आणि संतोषने त्यांचा दोघांचा परिचय देताच त्याचे आडनाव ऐकून सगळ्यांनी, "काय म्हणालास ?"त्यालाही त्याच्या आडनावाचा अनुभव गाठीशी होताच त्यामुळे त्याने सर्वांना पुन्हा एकदा स्लो स्पीचमध्ये आडनावाचा सगळ्यांना समजेल असा उच्चार केला नि सगळे एका तालासुरात म्हणाले , " संतोषच ठीक आहे." अशाप्रकारे संतोषच्या नावाचा अर्धविराम वगैरे होऊ नये म्हणून सगळ्यांनी संतोषमध्येच संतोष मानून घेतला आणि संतोषने त्याच्या साथीदाराचे नाव कॅल्टन परेरा असे उच्चारताच सगळ्यांना कॅल्टन ऐवजी परेराच ठीक वाटले. या दोघा टूर मँनेजरच्या नावात एकाचे नाव आवडले तर दुसऱ्याचे आडनाव. काय गंमत आहे ना नावांची! सगळ्यांच्या नावांची बाराखडी वाचून झाल्यावर आम्ही बागडोग्राला एका हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला नि गंगटोकला जाण्यासाठी किती वेळ लागेल व एका गाडीत किती पर्यटकांनी बसायचे अशी सविस्तर माहिती दिली. सिक्कीममध्ये प्रवासी वाहतुकीसाठी मोठी वाहने वापरणे शक्य नाही कारण सर्वच रस्ते घाटाचे आणि खोल दरी तीही सदोदित पाण्यासोबत सतत उछलकूद करणारी. असा हा निसर्गाच्या सान्निध्यातील पण तितकाच भयकारी प्रवास सुरू झाला. आमच्या गाडीत आम्ही दोघे , श्री.व सौ.मढे आणि आमचा टूर मँनेजर कॅल्टन परेरा आणि स्थानिक ड्रायव्हर सुभाष असे आम्ही सहाजण होतो. आमचा टूर मँनेजर कॅल्टन पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आमच्याच सोबत होता. कॅल्टन हा माझ्याच मुलाच्या वयाचा आणि माझ्या मुलासारखाच मनाने सोज्वळ. संपूर्ण प्रवासात कॅल्टनशी अनेक विषयांवर चर्चा झाली आणि केल्टनसारखे तरूण किती विचारपूर्वक वागतात याचा आनंद झाला. वीणा वर्ल्डमध्ये काम करताना वीणा वर्ल्डशी असलेली त्यांची बांधिलकी मनाला खूप भावली. कॅल्टनला त्याच्या आईने मराठी शाळेत शिकविले याचा खूप अभिमान वाटत होता. त्याची सगळी चुलत,मावस, मामे भावंडं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत होती आणि लहानपणी त्याची भावंडं त्याला नेहमी मराठी माध्यमात असल्यामुळे चिडवायची पण त्याला कधी कमीपणा वाटला नाही. मोठेपणी पदवी मिळविल्यावर तो इंग्रजीतून सफाईदारपणे संभाषण करू लागला. त्यामुळे कॅल्टनचे प्रामाणिक मत होते की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाची भाषा शिकून त्यातच शिक्षण घेतले तर खूप फायदा होतो. त्याला भारतात जन्मल्याचा खूप अभिमान वाटत होता. मी धर्माने ख्रिश्चन असलो तरी प्रथम मी भारतीय आहे आणि माझ्या देशाची माती मला अन्न, हवा व पाणी देते म्हणून मी माझ्या देशाचा सदैव ऋणी आहे. माझ्या आईने मला धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ समजून सांगितला नि आमच्या घरी सर्व सण साजरे होतात. ख्रिसमस इतकेच आम्ही दिवाळी, गणेशोत्सव,होळी, ईद असे सर्व सण साजरे करीत असतो. देशाविषयी नितांत आदर,आईविषयी प्रेम आणि आपल्या कामाप्रती निष्ठा हे गुण कॅल्टनमध्ये पाहून आजची युवा पिढी किती विचारपूर्वक वागते याचा आनंद झाला नि कॅल्टनचे कौतुक वाटले. देशाचा सच्चा नागरिक कॅल्टनमध्ये पाहिला आणि माझा देश 'धर्मनिरपेक्ष देश' आहे याचा सार्थ अभिमान वाटला.

Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.