'अर्ध्या रात्री शुभेच्छा!'
अर्ध्या रात्री शुभेच्छा
दिवाळीच्या दिवशी सगळी आवराआवर करता करता रात्रीचा म्हणजेच पहाट पाडव्याचा एक वाजला आणि मोबाईल चार्जिंगला लावताना मेसेज पाहून थक्कच झाले. ग्रुपसवर एकवेळ मेसेजस् नाही पाठवलेत तर चालून जाते पण जवळच्या नातलगांचे व स्नेह्यांच्या संदेशांना उत्तर न देणे म्हणजे कृतघ्नपणाच होय. शेवटी झोप येत असतानाही मनाची तयारी करून दिवाळीच्या शुभेच्छा उशीराने का होईना दिल्यात आणि काय दुसऱ्या दिवशी काही नातलग व मित्र मैत्रिणींनी फोन करून तर काहींनी मेसेज करून विचारलेच,"काय गं, एवढ्या रात्री शुभेच्छा!" काहीजणांनी तर 'अर्ध्या रात्री शुभेच्छा' माझ्या लहान बहिणीची जाऊ समिधा माझ्या बहिणीला म्हणते कशी,"ताई, बाईपण ऑनलाईन आहेत." तिने लागलीच मला रिप्लाय दिला. त्या पाचही जावांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. त्यांना ठाऊक आहे की दिवाळीचे चार दिवस झोपेच्या वाटेला जायचेच नसते. पण इतरांना कुठे ठाऊक असते,मग काय सगळ्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. आमच्याकडे दिवाळीला पाच दीर जेठ व दोन नणंदांचा परिवार एकत्रित येत असतात त्यामुळे मला व माझ्या लहान जावेला सक्त ताकीद असते,"आम्ही तुम्हां दोघांच्याच हाताने बनवलेला घरचाच फराळ खाणार, 'नो आचारी, नो रेडीमेड.' आता या वर्षी आपण फराळ घरी करायचाच नाही, या आमच्या बेताला दिवाळीच्या पंधरा दिवस अगोदरच मुलांच्या धमकीने सुरुंग लावला जातो नि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. चार दिवसावर दिवाळी आली की भावना काकूला पोह्यांच्या चिवड्याची नि शंकरपाळ्यांची ऑर्डर सोडली जाते तर मला नमकीन चिरोटे नि म्हैसूरपाकाची. दिवाळीची तयारी करताना आमची तशी दमछाक होत असते पण त्यानंतर मिळणारा आनंद आणि समाधानही तितकेच मोलाचे असते. या सगळ्या धबडग्यात सगळ्या नातलगांचे व मित्रमैत्रिणींचे फोन घेत सोशल मीडियाशी कनेक्ट राहायचे तर रात्रीचे दीड दोन केव्हा होतात ते कळतच नाही. रात्री दीड दोन वाजता झोपायला गेल्यावरही मुलांच्या रात्रभर चालणाऱ्या गप्पांच्या नि गडगडाटी हास्यकल्लोळाने पुन्हा झोपेचे खोबरे होते ते आणखी वेगळेच. मोठ्यांनी कितीही ओरडून सांगितले,"झोपा रे!" यावर पुन्हा सगळे एकदाचे मोठ्याने हसून चिडवणार, झोपा रोजच काढतो ना! आम्ही सगळे काही रोजच भेटतो का?" यावर काय बोलणार! घाला बाबांनो काय धुडगूस घालायचा तो! असे मनात म्हणतच मोठ्यांनी झोपेला आळवणी करण्याशिवाय पर्यायच नसतो. दरवर्षी दिवाळीसाठी वेगळी थीम मुलांनी निवडलेली असते. नांद्रे(ता. जि. धुळे) येथील घरी गावदिवाळी तर कधी देवी दर्शन, कधी गड, कधी बीच तर कधी अकोल्याचे शेत तर कधी साक्रीच्या बंगल्यावर तर कधी नाशिकचे घर. अशा वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळ्या रंगढंगात दिवाळी साजरी केल्यावर यावर्षी महागांव येथील 'द ऑर्किड व्हिला' येथे दिवाळी साजरी करायची म्हणून माझ्या बेट्याने सगळ्या काकांना व आत्यांना फोन करून जाहीर करून टाकले. दरवर्षीप्रमाणे बापबेट्यांची डेस्टिनेशनवरून मैं मैं तू तू ठरलेली नि बाकी सगळे मात्र "हो बेटा स्वप्नील. तू म्हणतोस तर ठीक आहे." स्वप्नीलचे पप्पाजी मात्र तेथे अमुक आहे का? तमुक आहे का? मग व्हिलाचे रेटस व्यवस्थित ठरवलेत का? जेवण चांगले असेल का? अशा नाना चौकश्या नि बेटा मात्र "तुम्हांला काय करायचे हो बाबा, तुम्ही मजा करा ना. बाकीचं माझ्यावर सोपवा ना!" अशा बऱ्याच चर्चेनंतर बाप बेट्यांचं एकमत होते तेव्हा कुठे आम्ही सुस्कारा सोडत असतो.
डेस्टिनेशनच्या महाचर्चेनंतर मला मात्र टी. व्ही. वरील कोणतीच महाचर्चा बघण्याची खरे तर गरजच पडत नाही. घरातल्या महाचर्चेने आधीच डोके जॅम झालेले असते त्यात सगळे एकत्र जमल्यावर होणारा गोंगाट तर विचारायलाच नको. जसजसे एक एक जण यायला लागतात तसतसे प्रवासात असणाऱ्यांना 'कुठपर्यंत पोहोचलेत' या दोनच शब्दांचा मारा करून करून बेजार करून सोडतात. बेजार करण्यामागचे खरे कारण वेगळेच असते कारण आधी पोहचलेल्यांच्या पोटात कावळे ओरडत असतात पण सगळे जमल्याशिवाय जेवायचे पण नसते.शेवटचे सदस्य दुपारी अडीच तीन वाजता आल्यानंतर मग जेवणाला सुरवात होते नि एकच गलबला सुरू होतो मग बघायलाच नको.
यावेळच्या 'द ऑर्किड व्हिला' मध्ये क्रिकेट व बॅडमिंटन खेळायला भरपूर मोठे मैदान, कॅरम, चेस, टेबल टेनिस, स्नूकर असे इनडोअर गेम्स, स्विमिंग पूल, असे सर्वकाही खेळायला उपलब्ध असल्यामुळे मुलांनी मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटला नि माझ्या लहान जावेने (भावना) सगळ्या कपल्ससाठी नि मुलांसाठी अफलातून गेम्स शोधून आणले होते नि जिंकणाऱ्यांना उपयुक्त्त बक्षीसही आणलेत.बायकोच्या चेहऱ्यावर जास्तीत जास्त टिकल्या लावण्याच्या स्पर्धेत चि. स्वप्नील व दीपश्री या दोघांनी बक्षीस पटकावले. नवरा बायकोच्या पाठीमध्ये फुगा ठेवून पळण्याच्या स्पर्धेत चि. राकेश व कल्याणी या दोघांनी बक्षीस जिंकले. कॉइनला दोन रबर अडकवून प्लस साईन (बेरजेचे चिन्ह बनविणे) करण्यात मोना बाविस्कर हिला बक्षीस प्राप्त झाले. स्ट्रॉने फुटाणा ओढून कपात टाकण्यात चि. दिप्तेश यास बक्षीस मिळाले. फुग्यावर जास्तीत जास्त नावे लिहिण्यात चि. सायली बक्षिसाची मानकरी ठरली. एका टुथपिकमध्ये पाच थर्माकॉलचे बॉल्स न तुटता टाकण्याच्या स्पर्धेत परीना अकलाडे हिला बक्षीस मिळाले. लिंबू चमचा या स्पर्धेत चि. विहान या आमच्या छोट्या पिल्लूने बाजी मारली. अशा या अफलातून स्पर्धा घेऊन सर्वजण जे काही हसत सुटलेत ते विचारायलाच नको. त्या हसण्याने फुफ्फुसांचा इतका व्यायाम झाला की मला वाटते मी वर्षभर जरी हसले नाही तरी चालेल कारण आजही डोळयांसमोर त्या स्पर्धा आल्यात तरी आपसूकच हसू येते. यावेळच्या दिवाळीला लहान मोठे तेहत्तीस सदस्य जमा झालेत तरीही दहा सदस्य मात्र नोकरीमुळे व परदेशात असल्यामुळे येऊ शकले नाहीत. त्यांची उणीव जाणवत होती ती आणखी वेगळीच. 'दिवाळी' म्हणजे खैरनार परिवारासाठी वर्षभराचा ऑक्सिजन असतो त्यामुळे प्रत्येकजण दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतो.
माझ्या घरची जी तऱ्हा तीच तऱ्हा माझ्या दोघी बहिणींच्या घरीही असते. त्यांच्याकडेही दिवाळीची धमाल विचारायलाच नको! अशा या तिन्ही घरांच्या दिवाळीचे किस्से आम्हांला महिनाभर फ्रेश ठेवतात कारण दिवाळीनंतर आमची लहान बहीण माहेरी आली की मग तिघींच्या घरचे किस्से ऐकून सगळेच हसून हसून लोटपोट होतात.
हा लेख लिहिण्यामागचा एकच उद्देश की काळानुसार सांगळ्यांनी बदलावे पण आपल्या कुटुंब संस्थेची पाळंमुळं घट्ट पकडून ठेवत. राग, रुसवे-फुगवे, मान-अपमान हे प्रत्येक घरी असतात पण चांगले होणार असेल तर अशा छोट्या-मोठ्या गोष्टींना वेळीच तिलांजली देऊन कुटुंबाने वाटचाल करावी एवढीच इच्छा.
अशा मोठ्या कुटुंबाची दिवाळी साजरी करताना शुभेच्छा अर्ध्या रात्री पोहचणार नाहीत तर काय..... !

Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.