कौतुकभरली पुरणपोळी
सर्व रसिक वाचकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
होळी रे होळी
पुरणाची पोळी
अशी बोंब मारीत होळीभोवती उड्या मारणारे सगळे सवंगडी आजही प्रत्येकाला हमखास आठवतात आणि बालपणाच्या मधुर आठवणी घेऊन येणारी होळी जीवनाला एका वेगळ्याच रंगात न्हाऊन काढीत असते. मला मात्र माझ्या सर्व बालमैत्रिणींची हमखास आठवण करून देणारी होळी पुरणपोळीचीही वेगवेगळी तऱ्हा आठवण्यास भाग पाडते नि पुन्हा बालमैत्रीण संगीताची प्रकर्षाने आठवण करून देत असते.
कौतुकभरली पुरणपोळी
मराठी माणूस दुसऱ्याचे कौतुक करण्यास फारसा उत्सुक नसतो असा सर्वसाधारण गैरसमज आहे असे मला नेहमी वाटत असते कारण मला मात्र नेहमीच याच्या विपरीत अनुभव आलेले असल्यामुळे असावे. मला मात्र माझ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीची दखल घेणारे नातेवाईक व मित्रमंडळी भेटल्यामुळेही असावे. असाच एक पदार्थ मला नेहमीच कौतुक भरली थाप मिळवून देतअसतो आणि तो पदार्थ म्हणजेच महाराष्ट्रीयन जेवणातील खरीखुरी राणी असणारी अशी तुमची माझी आवडती ' पुरणपोळी ' होय .
एकदा माझी लहान जाऊ भावना नाशिकला आली असता मी पुरणपोळी केली आणि ती तव्यावरील टम्म फुगलेल्या पोळीकडे पाहून म्हणाली, "ताई, आत्तापर्यंत मी समजत होते की, माझीच पुरणपोळी मऊसूत असते पण आज तुमची पोळी पाहिल्यावर माझा भ्रम दूर झाला." त्यादिवशी आम्ही दोघींनी पुरणपोळीच्या जेवणाचा गप्पा करीत करीतच मनसोक्त आस्वाद घेतला .
दुसरा प्रसंग , एके दिवशी माझी मैत्रीण संगीताची लेक सृष्टी काही कामानिमित्ताने आली होती तेव्हा मी पुरणपोळ्याच करीत होते आणि संगीताच्या घरी सर्वांना पुरणपोळी खूप आवडते हे संगीताने गप्पांच्या ओघात सांगितले होते त्यामुळे मी सृष्टीजवळ पुरणपोळ्या पॅक करून दिल्यात . सृष्टी घरी पोहचल्यावर संगीताला म्हणाली , " अगं , मावशीने बघ माझ्यासाठी पुरणपोळी दिली . " संगीता लागलीच बेटीला म्हणाली , " असं होणार नाही की माझी मैत्रीण माझ्यासाठी पोळी पाठवणार नाही , तूच काही एकटी लाडाची नाहीस , बाईसाहेब आमच्यासाठी पण पोळी राहू दया ." सृष्टी म्हणाली , " काळजी करू नकोस, मावशीने सगळ्यांसाठी पोळ्या पाठवल्या आहेत." दोघी मायलेकींनी पोळ्या खाल्ल्यात आणि मला लागलीच संगीताने फोन केला आणि दोघी मायलेकींचा पोळ्यांवरून झालेला वरील संवाद ऐकवून संगीता म्हणाली , " ज्योत्स्ना , आमच्या सर्व नातलगांना मी बनवलेल्या पुरणपोळ्या खूप आवडतात आणि मलाही मीच बनवलेली पोळी आवडते पण खरं सांगू का , तू बनवलेली पुरणपोळी तोंडात टाकताच अलगद विरघळते , इतकी अलवार पुरणपोळी मी पहिल्यांदाच खाल्ली ." असे अनेक किस्से पुराणपोळीमुळे अनुभवायला मिळालेत पण या मऊसूत पुरणपोळीचे खरे श्रेय जाते ते नंदा कवडे हिला . आम्ही मनमाडला राहत होतो तेव्हा कवडे भावोजी हे आमच्याच घरातील एक सदस्य बनलेत . त्यांचे लग्न झाले नि नंदा त्यांच्या आयुष्यात आली . नंदा पुरणपोळी खूप छान बनवायची . दोडल वहिनी नेहमी म्हणायच्या , " वहिनी , पुरण करायचे झाले की मला टेन्शनच येते , पुरण शिजवायचे म्हटले की , पुरण चाळून चाळून हात दुखायला लागतात ." मी मात्र डाळमध्येच गूळ टाकून शिजवायचे नि नंतर डाळ वाटायची पण दोडल वहिनी प्रथम डाळ वाटून मग नंतर गूळ घालून पुरण शिजवायच्या त्यामुळे पुरण करायला वेळ लागायचा आणि दोडल वहिनींप्रमाणेच नंदाही पुरण शिजवायची त्यामुळे नंदाची पुरणपोळी नि माझी पुरणपोळी या दोन्हींत चवीमध्ये बराच फरक जाणवला आणि नंदाच्या हातची पुरणपोळी खाल्ल्यानंतर मीही नंदासारखे प्रथम डाळ वाटून नंतर साखर किंवा गूळ घालून पुरण शिजवून पोळी करू लागले आणि दोडल वहिनींना सांगितले , " वहिनी , आता मीही तुमच्या प्रमाणेच पुरणपोळी करायला शिकले तेही कवडे भावोजींच्या बायकोकडून . " कारण दोडल वहिनी या माझ्या घरापासून खूप लांब राहत होत्या आणि त्या जेव्हा सणाला पुरणपोळी करायच्या तेव्हा मी सणासाठी आमच्या गावी नांद्र्याला जात असे त्यामुळे त्यांच्याकडून पुरण कसे शिजवायचे हे शिकता आले नाही पण माझी सखी शेजारीण नंदा आली आणि तिच्याकडून मला पुरण कसे शिजवायचे हे शिकता आले . त्याबद्दल नंदाचे मी मनोमन आभार मानीत असते . त्याकाळी फोनची सुविधा नसल्यामुळे व त्यांचीही बदलीची ठिकाणे बदल्यामुळे संपर्क राहिला नसला तरीही पुरणपोळी करताना कवडे भावोजी व नंदा या दोघांची हमखास आठवण येत असते .
आमच्याकडे मातीच्या खापरावरील मांडे करण्यात माझ्या आईचा कुणीही हात धरू शकत नसे . ब्राम्हणगावातील अनेक स्रिया माझ्या आईकडून मांडे करायला शिकल्यात नि आईचा हा वारसा माझी लहान बहीण पूजा मराठे चांगल्याप्रकारे चालवीत आहे याचा आनंद होतो . मी मात्र मांडे दोनदाच करून पाहिलेत पण आई इतके चांगले करता आले नाहीत म्हणून मी तव्यावरचीच पुरणपोळी करू लागले आणि तीच सर्वांना आवडू लागली नि मांडे करण्याचा विचार नेहमीच बारगळत गेला .
सात आठ वर्षांपूर्वी माझी आई काश्मीरला गेली असता मी तिला तिखट पराठे , दशम्या व पाच सहा पुरणपोळ्या डब्यात घालून प्रवासात खाण्यासाठी दिले . सगळ्यात खाली पुरणपोळ्या ठेवल्या होत्या , आईने व तिच्या मैत्रिणींनी तीन दिवस पराठे व दशम्या खाल्ल्यात आणि आईला वाटले , पराठे व दशम्या खराब झाल्यात की काय ! पण बघते तर डब्यात पुरणपोळी . आईने थोडीशी खाऊन पाहिली तर पोळी अगदी जशीच्या तशीच , थोडीशीही खराब झालेली नव्हती किंवा तिची चवही ताज्या पोळीसारखी . आईला खूप आश्चर्य वाटले नि तिने मला फोनवरूनच सांगितले , " तू पुरणपोळी पण दिली होती मला माहितीच नाही नि आज चार दिवस झालेत तरी पोळी जशीच्या तशीच , माझ्या मैत्रिणींनाही तू दिलेली पुरणपोळी खूप आवडली . " आता मात्र आश्चर्य करण्याची पाळी माझ्यावर होती कारण नेहमीच ताजे खाण्याची सवय असल्यामुळे पुरणपोळी चार दिवस चांगली राहू शकते हे मलाही ठाऊक नव्हते . मुलाच्या व मुलीच्या परप्रांतीय मित्रमैत्रिणींना महाराष्ट्रीयन पुरणपोळी आवडते नि ते हमखास विचारतात की कशी बनवली ? त्यांना पुरणपोळी कशा कशाबरोबर खातात ते सांगितले की आश्चर्य वाटते . महाराष्ट्रीयन पुरणपोळी आंब्याचा रस , खीर , बासुंदी , दूध , दही , भरपूर तूप टाकून खातात नि त्याचबरोबर विदर्भात तिखट आमटीबरोबर खातात.
अशा या महाराष्ट्रीयन जेवणातील राणीचा थाट तसा नखरेलच आहे .दूध ,दही , तूप ,बासुंदी , खीर या सर्वाना तर नाचवतेच पण फळांच्या राजालाही ती तितक्याच तोऱ्यात नाचवते. त्याचा तर राजाचा थाटभाट सगळाच उतरवून टाकत असते . बिचारा तोही गपगुमान तिला सरळपणे शरण जातो नि खवय्यांच्या जिभेवर असा काही विराजमान होतो की ,त्यांच्या तोंडून , वा ! काय आमरस होता ! असे उद्गार बाहेर पडतात तेव्हा ही महाराणी जणूकाही स्वतःला विसरून , स्वतःचे नामोनिशाणही राहू न देता आंब्यालाच नकळत सारे श्रेय देऊन टाकते . जेवण असते पुरणपोळीचे पण नाव मात्र आंब्याचे . येथेही पुरुषप्रधान संस्कृतीच . किती अजब न्याय ! खादय संस्कृतीही अपवाद नसावी तेथेही ' आमरस ' पुरणपोळीला दुय्यम ठरवून जातो तेव्हा लिंगभेदाचे कोडे अधिकच बुचकळ्यात टाकून जात असते .
माझ्या पिंपळनेरच्या जाऊ सखू ताई या वयाने माझ्यापेक्षा खूप मोठया आहेत . त्यांना दुधाचे पदार्थ बिलकूल आवडत नाहीत नि एकदा त्या माझ्याकडे आल्या असता त्यांच्यासाठी मी पुरणपोळी केली नि त्यासोबत मी बासुंदी केली होती . जेवायला बसल्यावर त्या म्हणाल्या , " ज्योत्स्ना , मी बासुंदी खात नाही ." त्यांचे वाक्य ऐकताच मला आश्चर्य वाटले , " ताई , तुम्ही थोडीशी बासुंदी खाऊन तर बघा ." माझ्या आग्रहास्तव त्यांनी बासुंदी खाल्ली आणि त्यांना खूप आवडली . त्या दिवसापासून माझ्या जाऊबाई पुरणपोळी सोबत बासुंदी आवडीने खाऊ लागल्यात . त्या माझ्याकडे आल्यात की , मला म्हणतात , " ज्योत्स्ना , तुला पुरणपोळी करताना पाहत राहावेसे वाटते . " माझ्या पूर्ण पोळ्या होईपर्यंत त्या समोर खुर्चीवरच बसून राहतात नि माझ्या टम्म फुगणाऱ्या पोळ्या पाहत बसतात .
माझ्या मधल्या बहिणीकडे पुरणपोळी मात्र मूगाच्या डाळीचीच करणे भाग पडते . तिच्याकडे हरभऱ्याच्या डाळीचे पुरण होत नाही म्हणून ती जाम वैतागते कारण मूगाच्या डाळीचे पुरण हे फारच चिकट नि शिजवायला त्रासदायक होत असते पण करणार काय !
असा हा आईच्या पुरणपोळीचा वारसा आम्ही तिघी बहिणी वेगवेगळ्या प्रकारे चालवित
आहोत. पुरणपोळीचे अनेक अनुभव व किस्से आहेत त्यातही काही नातलगांना वाटते की शहरात राहणाऱ्या व जास्त शिकलेल्या स्त्रीला काय स्वयंपाक करता येईल आणि त्यातही पुरणपोळी कशी असेल हिच्या हातची! अशी शंका घेऊन आस्वाद घेणारे ही भेटलेत.
Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.