सिक्कीमच्या भूमीत केलेला मूर्खपणा
सिक्कीमच्या भूमीत केलेला मूर्खपणा आपल्याकडून कधीकधी जी चूक होत असते ती आठवल्यावर आपल्यालाच हसू येत असते. अशीच एक चूक माझ्याकडून सिक्कीमच्या भूमीत झाली आणि आजही आठवण येताच माझे मलाच हसू येत असते. अर्थात अशी चूक माझ्याकडून झाली नसती तरच नवल घडले असते कारण निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर मी माझी राहतच नाही. निसर्गाचं नि माझं कोणतं असं अतूट नातं आहे ते मलाही कळत नसते. सिक्कीमचा निसर्ग तर बघायलाच नको! हिमालय पर्वताच्या उंचचउंच रांगा, खोल दऱ्या नि त्यातून वाहणाऱ्या नद्या आणि नद्यांच्या पाण्याचे झालेले बर्फ, उंचचउंच झाडी नि तितकीच शांतता! अशा या निसर्गरम्य परिसरात वावरताना आपणही तितकेच निरागस बालक झालो नाहीत तर आपल्याइतके कर्मदरिद्री कुणीच नसावे, असे माझे प्रामाणिक मत आहे. आम्ही भल्या पहाटे उठून पेलिंग सोडले आणि 'लाचुंग' येथे जाण्यासाठी निघालो. निघण्यापूर्वी पेलिंग येथून आम्ही कोट, ग्...