बहुरूपी

                   तो आज माझ्यासमोर आला आणि मी बघतच राहिले त्याचा नखरेलपणा असा काही की विचारूच नका. बिच्चाऱ्या कॉलेजकन्यका देखील त्याच्यापुढे माघार घ्यायच्या. त्याचे रूप जेव्हा पाहावे तेव्हा वेगळेच. कॉलेजात जाणारी तरुणीदेखील दिवसाला चार-चार ड्रेस बदलत नसेल परंतु हा मात्र मॉडेलप्रमाणे वेगवेगळा ड्रेस परिधान करून तुमच्यापुढे हजर. जेव्हा पाहावे तेव्हा वेगळेच रूप घेऊन उभे ठाकणार. कधी तो पांढऱ्या सफेद वेशात थोडीशी लाली कमी लावून तर कधी अगदीच लालभडक वेशात. कधी थोडंसं लोशन कमी लावून तर कधी अगदीच काळा नाहीतर एकदम निस्तेज, पावडर कमी, लोशन कमी, फाउंडेशन, मस्करा कधी आहे तर कधी नाही काय वर्णावा त्याचा नखरा! तरी असे असूनही महाशय सर्वांना अगदी हवाहवासा. त्याच्यात काय एवढी जादू आहे की, भल्याभल्यांना त्याचा मोह पडावा. त्यादिवशी हळदीकुंकवाला सगळ्या मैत्रिणी जमल्या होत्या तेवढ्यात निता म्हणते,"अगं बघ तर किती पाणचट आहे." आता त्याला बिच्चाऱ्याला पाणचट पदवी तरी का द्यावी? काल हीच निता त्याला 'किती कडक आहे', असे म्हणत होती तर परवा बिरारी काकूंकडे त्याला म्हणत होती,"किती गोड आहे." शेवटी मी न राहवून निताला म्हणाले, "अगं बिचाऱ्याला अशा किती पदव्या बहाल करशील!" त्यावर निता म्हणते, "मी तरी काय करू. तो आहेच मुळी पदव्या बहाल करायच्या लायकीचा त्यात माझा तरी काय दोष!" सर्वच त्याला चांगली वाईट दूषणं देतच असतात पण त्याचा नाद सोडायला कुणीच तयार नाही. तो ही तितकाच मदमस्त. सर्वांना आपल्या अंकीत करून घेणारा. तुम्ही काहीही म्हणा. मी आपला आहे तसाच राहणार. दिवाळीचा फराळ आवडीने सर्वजण खातात हा मात्र खुदूखुदू हसतो. तुम्ही कितीही खा परंतु माझ्याशिवाय तुमच्या फराळाची रंगत कशी वाढणार? माझ्याशिवाय तुम्हांला चैन तरी पडणार का? एक दिवस जरी तुम्हांला भेटलो नाही तर तुमचा संपूर्ण दिवस खराब होतो. खरंच बाबा तू म्हणतोस तेच खरे! तुझे वेगवेगळे रंग, रूप, वेगवेगळी चव, वेगवेगळ्या वेळेला हवीच. लेखकांना लिहितांना तुझी सोबत लागते. कारागिराला काम करताना तू हवास, मोठमोठ्या अधिकाऱ्यांना मिटींगच्या वेळेस तू हवाच. एवढेच कशाला आमचे मंत्रिमहोदय देखील तुझ्याच नावाची पार्टी देऊन सल्लामसलत करीत असतात. या सर्वांना जसा तू हवास तसाच वाचकांना ही वाचतांना तू हवास म्हणून त्यांचे तोंड गोड कर. असा हा सर्वांना हवाहवासा वाटणारा,आवडणारा,करामती बहुरूपी-चहा.

Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या