सिंहगड fort of sinhagad
सिंहगड fort of sinhagad
कृषी पर्यटनाचे महत्त्व
पुण्याला गेल्यावर आम्ही पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सिंहगडला जाण्याचे ठरवले. दुपारी बारा वाजता आम्ही सिंहगडाच्या पायथ्याशी पोहचलोत आणि सिंहगड चढण्यास सुरवात केली. मधूनच येणारा पावसाचा शिडकावा आणि सिंहगड चढताना होणाऱ्या पर्यटकांच्या फजितीने सर्वांचीच हसून हसून पुरेवाट होत होती. सिंहगडावरील हिरवाकंच कोट आणि गडाखालचा हिरवा गालिचा पाहून मन अगदी प्रफुल्लित होत होते त्यामुळे सिंहगड चढताना सर्वांनाच मजा येत होती.
सिंहगड fort of sinhagad
गप्पा करता करता सिंहगडाच्या मध्यावर येऊन पोहचलोत. निम्मे अंतर चढून झाल्यावर सगळेच दमलेत नि तहानेने घसाही सुकू लागला नि मग लिंबू सरबत पाहून सगळे ओरडलेत, 'लिंबू सरबत घेऊ या.' लिंबू सरबतची ऑर्डर देताच सरबत विक्रेते काका लिंबू सरबत बनवायला लागले. लिंबू सरबत बनवतांना त्या काकांचे हात मोठ्या सफाईने काम करीत होते, डब्यात हात टाकला नि घेतली मूठभर साखर, दुसऱ्या डब्यात हात टाकला नि घेतले चिमूटभर मीठ आणि ते पाण्याचे मिश्रण वर खाली ओतत असतानाच ते मोठ्याने ओरडलेत, "अरे ए गाढवांनो जरा अक्कल आहे का! माझं सगळं पीक पायाखाली तुडवलंत." काकांच्या ओरडण्याने आम्ही दचकलोत नि मागे वळून बघतो तर सात-आठ तरूण मुले उतारावर एकमेकाला पकडून सेल्फी काढत होती." आम्हीही आश्चर्याने बघितले तर खरंच त्या काकांनी उतारावरच घेवड्याची लागवड केली होती. आम्हांलाही आश्चर्यच वाटले कारण आम्हांला आमची सपाटीवरची दहा पंधरा एकर शेती पाहण्याची सवय आणि त्या काकांची छोट्याशा जागेत व तेही उतारावर पेरलेले बी पाहून आश्चर्य वाटणारच. काकाच्या ओरडण्यावर ती मुले चांगलीच दचकलीत नि त्या काकांना म्हणालीत, "अहो काका, येथे तर सगळे गवतच आहे." मी म्हणूनच तुम्हांला गाढव म्हटले, तुम्ही जे ताटात खातात ते कुठून येतं नि कसं येतं ते नाही ठाऊक, तुम्हांला फक्त कागद ( नोटा ) कळतो, काकाने रागाने शिवीही हासडली. सर्व मुले चांगलीच शरमिंदी झालीत. सरबत विक्रेत्या काकांची बायको काकांना म्हणाली, "अहो, त्या शहरातल्या पोरांना कुठे कळणार, कशाला डाफरलेत त्यांच्यावर!" बायकोच्या या प्रतिक्रियेवर काका चांगलाच भडकला नि बायकोला म्हणाला, "त्यांना खायचं कळतं मग ते खाणं कुठून येतं ते त्यांच्या आईबापांनी नि मास्तरांनी नको का शिकवायला!" असे म्हणतच काकाने आमच्या हातात सरबताचे ग्लास दिलेत नि आम्ही काकाचा तो अवतार बघून विचार करीतच सरबत पिऊ लागलोत. काकाशी शेतीविषयी गप्पा करीतच प्रत्येकाने दोन दोन ग्लास लिंबू सरबत पोटात रिचवले नि मग स्वतःला ताजतवानं करून सिंहगडाची मोहीम फत्ते करण्यासाठी मनाला तयार केले.
सिंहगड fort of sinhagad
सिंहगड चढताना काकांचे शब्द डोक्यात चांगलेच धुमाकूळ घालित होती. छोटासा का तुकडा असेना त्यात धान्य पेरून पीक घेणारे गरीब शेतकरी देशाच्या अन्नधान्य पुरवठ्याला नक्कीच हातभार लावतात नि शेती हा देखील जोडधंदा होय हेच त्या काकांच्या कळकळीतून जाणवले आणि शहरातील मुलांसाठी कृषी पर्यटन किती महत्त्वाचे आहे याची जाणीव या घटनेतून जाणवली. शहरातील प्रत्येक शाळेने पंधरा वीस कि. मी. वरील शेतात मुलांना सहलीसाठी नेऊन तेथील पिकांची माहिती करून द्यावी तसेच प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे सहलीचे आयोजन करावे जेणेकरून शेतकऱ्यांना थोडीफार आर्थिक मिळकत होईल आणि मुलांना अन्नाचे महत्त्वही कळेल तसेच वनस्पती शास्रातील प्रश्नोत्तरे लिहिणे सहज सोपे होईल आणि भूगोल व अर्थशास्र या विषयातील काही भागही समजण्यास मदत होईल याची जाणीव या घटनेमुळे झाली .
सिंहगड fort of sinhagad
सिंहगडावरील पावसाळ्यातील सहल ही सरबतवाल्या काकांमुळे आणि शहरी तरुणांमुळे कायमचीच लक्षात राहिली.
तसाही सिंहगड शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाने ह्रदयात कायमचा कोरला गेला होताच! प्रत्यक्ष सिंहगडाच्या भूमीवर पाऊल ठेवताना 'गड आला पण सिंह गेला.' नि नकळत आपण नतमस्तक होत असतो.
सिंहगड fort of sinhagad
©ज्योत्स्ना पाटील
Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.