पिठलं


दहा - अकरा वर्षापूर्वीचा प्रसंग. मी लिनाकडे गेले असता आमच्या दोघींच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. आमच्या गप्पा चालू असतानाच लिनाचा मोबाईल ' तुझे सूरज कहूँ या चंदा, तुझे दीप कहूँ या तारा ' अशी मधुर रिंग टोन गुणगुणत वाजला. लिनाचे मोबाईलवर संभाषण चालू असेपर्यंत मी वर्तमानपत्र वाचत बसले आणि वाचत असताना मधेच ' एक फूल दो माली ' चित्रपटातली निसर्गदृश्येही डोळ्यांसमोर झळकत होती. एकाचवेळी लिनाचे संभाषण कानांवर पडत होते आणि त्याचबरोबर भूतकाळात पाहिलेला चित्रपटही आठवत होता आणि समोरचे वर्तमानपत्र तिसऱ्याच जगात नेऊ पाहत होते. ऐकणे, आठवणे, वाचणे या तिन्ही गोष्टी एकाचवेळी करण्यास लिनाचा मोबाईलच कारणीभूत होता
          लिनाचे मोबाईलवरील संभाषण संपताच तिचे डोळे भरून आले होते. मी लिनाला डोळे भरून येण्यामागचे कारण विचारताच ती म्हणाली, "काही नाही गं, मी स्वप्नीलला, आपण दोघींनी पिठलं भात खाल्ला,असे सांगताच, तो मला म्हणतो कसा,"आई, तू पिठलं भात म्हणताच तोंडाला पाणी सुटलं. आता मेसचा डबा खायची इच्छाच गेली." लिना अधिकच भावूक झाली. लिनाचं भावूक होणं मी समजू शकत होते
          लिनाचा मुलगा स्वप्नील पदवीच्या शिक्षणासाठी मुंबईला होस्टेलवर राहत होता. मेसच्या जेवणाचा अनुभव अनेकांना ठाऊकच आहे आणि त्यात माझ्या मैत्रिणीच्या हातच्या पिठल्याची चव तर विचारायलाच नको. आम्ही सर्व मैत्रिणी लिनाकडे फर्माईश करणार ती पिठलं भात खाण्याचीच. पिठलं म्हणताच पाणी घालून पातळ केलेल्या बेसनपिठाला फोडणी देणे आणि शिजविणे एवढेच आपल्याला ठाऊक असते. परंतु लिनाकडे पिठल्याचे वेगवेगळे प्रकार खाल्ल्यावर समजले की, पिठल्याचेही अनेक प्रकार आहेत. कोबी घालून केलेले पिठले, शेवग्याच्या शेंगांचे पिठले, कैरीच्या फोडी घालून केलेले पिठले, हिरव्या मिरचीचे पिठले, लाल तिखट घालून केलेले पिठले, टोमॅटोचे पिठले, पालेभाजी घालून केलेले पिठले, उकड घेऊन केलेले पिठले, भाताबरोबर खायचे पिठले हे पातळ तर भाकरीबरोबर खायचे घट्टसर पिठले आणि पोळीबरोबर खायचे वड्या पडतील असे पिठले आणि या सर्व प्रकारच्या पिठल्यांना एक विशिष्ट चव असते, ती खासकरून लिनाच्या हातची
          लिनाचे पिठल्याशी एवढे सूत कसे काय जुळले? हा मला पडलेला प्रश्न. लिनाला त्याविषयी छेडले असता तिने सांगितलेला किस्सा मजेशीरच होता. लिना आणि तिच्या दोघी मैत्रिणी कॉलेजला असताना रूम घेऊन राहत होत्या. तिघींच्या कॉलेजची वेळ वेगवेगळी असल्यामुळे जी मैत्रीण रूमवर असेल तिने स्वयंपाक करायचा असे ठरले होते. लिनाचे कॉलेज दुपारच्या सत्रात असल्यामुळे सकाळच्या स्वयंपाकाची जबाबदारी लिनावर पडली. एके दिवशी भाजीसाठी घरात काहीच नव्हते. त्यामुळे लिनाने जवळच्या दुकानातून बेसनपीठ आणून पिठले बनविण्याचे ठरवले. रूमवर राहायला गेल्यावर लिनाने स्वयंपाकाचा श्रीगणेशा सुरू केल्यामुळे जे इतरांचे होते तेच लिनाचेही झाले. लिनाने पिठले बनविले परंतु ते घट्ट व्हायचे काही नावच घेत नव्हते. कॉलेजमध्ये गणिताच्या तासाला भराभर समीकरणे सोडवणाऱ्या लिनाला बेसनाचे पाण्याशी असलेले समीकरण काही सोडवता आले नाही त्यामुळे पिठल्याचा नाद सोडून शेवटी कंटाळून तिने स्टोव्ह बंद करून पिठले तसेच झाकून ठेवले. बेसनपीठात पाणी जास्त घातल्यामुळे आणि पीठ नीट कालवल्यामुळे पिठल्यात पाणी एकीकडे नि गुठळी पडलेले पीठ दुसरीकडे असे हे लिनाचे गुठळीयुक्त पिठले पाहून दोघी मैत्रिणींनी लिनाची चांगलीच टर उडवली. मैत्रिणींनी लिनाच्या पिठल्याला 'बेसनपीठाचा रायता' असे संबोधन दिले. लिनाच्या बिघडलेल्या पिठल्यापासूनचा प्रवास पिठले खावे तर लिनाच्याच हातचे येथपर्यंत येऊन पोहचला
          कितीही घाईत असलेला पाहुणा असला तरी त्याला दहा मिनिटात जेवायला द्यायचे असले तर प्रत्येक गृहिणीच्या मदतीला धावून येणारी रेसिपी म्हणजेच पिठलं होय. गरीब-श्रीमंत, अनुभवी नुकत्याच लाटणं हातात घेतलेल्या अशा सर्व गृहिणीच्या मदतीला धावून येणारे पिठलं आजच्या अर्थार्जन करणाऱ्या स्रियांचे तर फारच प्रिय बनले आहे त्यामुळे काल, आज आणि उद्या असा सर्वकाळी, सर्ववेळी सर्वांना हवेहवेसे असणारे पिठले हे खरंच अनोखे होय
          आमच्या कुटुंबातील तीस-पस्तीस सदस्य जेव्हा बाहेरगावी सहलीला जातो तेव्हा हॉटेलमधील एकवेळच्या जेवणाचे बारा तेरा हजार रूपये बिल देताना माझ्या साक्रीच्या जाऊबाई कल्पना माई दिराला म्हणतात," काय दादा! एवढं बिल भरीसन काय खायं ते म्हणे कांदा टामाटानं पानी त्यानापेक्षा आपलं पिठलं कीतलं भारी राहास." मग माझ्या या जाऊबाईंना पिठलं भाकरी खाऊ घालण्यासाठी एखादा गड-किल्ला पालथा घालावा लागतो. मग कधी पन्हाळगड तर कधी सिंहगड कारण मराठी माणसाचं गड किल्ल्यां इतकेच पिठल्यावर प्रेम असावे. असे हे पिठलं म्हणजे गृहिणींसाठी नेहमीच ऐनवेळेला उपयुक्त असा पदार्थ होय.    

©ज्योत्स्ना पाटील

Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या