तेरे घर के सामने, एक घर बनाऊँगी.....
चला, आज थोडी वेगळ्या वाटेने म्हणजेच निसर्गासोबत तेही घरातल्याच निसर्गासवे भटकंती करून येऊ या! तेरे घर के सामने, एक घर बनाऊँगी.....! पुणे व बारामती येथे १९ ऑगस्ट २०११ ला गेलो होतो. दोन दिवसांनी म्हणजेच २१ ऑगस्ट २०११ ला सायंकाळी साडे सात वाजता घरी पोहचलो. घरी येताच सर्वांना चहा करण्याकरिता मी किचनमध्ये येताच किचनच्या खिडकीसमोर खूप मोठा काळ्या आकाराचा डोंगरच चिकटलेला दिसला. त्या डोंगराला पाहताच प्रथम मी घाबरलेच. अरे बाप रे! हे काय लागले आहे आपल्या घराला असे वाटून जास्तच घाबरले नि आमच्या महाशयांना जोरात आवाज दिला, "पाटील साहेब इकडे या. हे बघा काय आहे येथे!" असे म्हणत मी बारकाईने पाहिले तर मधमाश्यांनी पोळं बनविण्यास सुरवात केली होती. हजारो मधमाश्यांना एकाच जागी आणि तेही इतक्या जवळून पाहून मला खूपच आश्चर्य वाटले. दोनच दिवसांत हजारो मधमाश्या कुठून आणि कशा आल्यात? या प्रश्नाने डोक्यात चांगलेच थैमान घातले होते. छताला चिकटलेल्या या मधमाश्यांनी उलटा डोंगरच माझ्या डोळ्यांपुढे तयार करून ठेवला आणि जणुका...