' स्वच्छ नाती , स्वच्छ भारत ' 

 सुषमा : अरे , बारा वाजायला आलेत , आत्ता मुलांची शाळेतून येण्याची वेळ होईल , भरभर आवरावे लागेल , चला स्वयंपाकाला लागू या ! 
सुषमा : ( सुषमा भाजी चिरते आणि तितक्यात सुरी बोटाला लागते आणि ओरडते ) आई गं ... , 
सासूबाई : काय झालं गं सूनबाई ! ( सुनेचा कापलेला बोट बघून ) अरे देवा ! हे काय केलंस गं ! जरा बघून तर काम करायचे ना ! 
सुषमा : अहो आई , मुलं येतील म्हणून ते घरी येण्याच्या आत जेवण तयार झाले की गडबड होणार नाही पण भलतीच गडबड होऊन बसली .
सासूबाई : ( हळद शोधून सुनेच्या जखमेवर लावतात )
सुषमा : अरे देवा ! आई गं ... किती आग आग होत आहे ! 
सासूबाई : (जखमेवर हळद लावता लावता ) आता पाण्यात हात नको घालूस , जा तिकडे बैस , मी करते आज स्वयंपाक . 
सुषमा : अहो आई , तुम्हांला सवय नाही आता स्वयंपाक करायची , मी करीन थोड्या वेळाने .
सासूबाई : नको , मी करते हळूहळू , एवढे वर्षांची सवय आहे गं , माणूस काही विसरत नाही त्याचे काम ! एवढेच आहे की पूर्वीसारखे भरभर काम करायला जमत नाही एवढेच . 
सुषमा : आई , आज तुम्ही स्वयंपाक करणार तर मग तुम्ही बनवता ती स्पेशल डीश बनवा ना ! मला गरम गरम खायला मिळेल . 
सासूबाई : वा वा ! आधी मला म्हणायची की तुम्हांला स्वयंपाक करायला जमणार नाही आणि आता आवडती डीश पाहीजे नाही का ? लबाड आहेस चांगली . आईसारखीच बनेल आहेस ! 
सुषमा : आई , मी तुम्हांला सांगून देते , माझ्या आईला काही बोलायचे नाही हं , नाहीतर तुमची नि माझी चांगलीच जुंपेल हं . 
सासूबाई : ए , माझा तो हक्क आहे माझ्या विहिणीला बोलण्याचा , तुम्ही कोण गं आम्हांला अडवणाऱ्या . 
सुषमा ; अस्स का ! तुम्ही विहिणी विहिणी काहीही धुडगूस घाला पण माझ्या आईला बोललेले मला नाही आवडणार . 
सासूबाई : बरं बाई , आम्ही दोघी बघून घेऊ , मलाही वेळ नाही , तुला मसाल्याच्या पाटवड्या खाऊ घालायच्या आहेत ना ! 
सुषमा : अरे वा ! माझ्या मैत्रिणी म्हणतात अस्सं माहेर सुरेख बाई पण मी मात्र म्हणते , अश्शी सासू सुरेख बाई ! सासूबाई : मला हरभऱ्याच्या झाडावर काही चढवू नकोस . ( सासूबाई पाटवड्या करू लागतात ) घे गं सुषमा , कश्या झाल्यात पाटवड्या बघ ! 
सुषमा : ( तोंडात पाटवडी टाकत ) वाह ! आई काय सॉलिड टेस्टी झाल्यात पाटवड्या ! तुम्ही पण खाऊ बघा ना , पण एकच खायची हं , बाकी सर्व पाटवड्या माझ्या आहेत . ( तितक्यात बाहेरून रीमा नि विनय दोघेही गप्पा करीत घरात प्रवेश करतात ) 
विनय : अरे वा ! काय छान मसाल्याचा वास आला ! सासू सुना दोघीजणी मला सोडून मस्तपैकी ताव मारीत आहेत . बघितलं का रीमा , आता तूच बघ या दोघी माझे किती हाल करतात ! 
सुषमा : काय गं भटक भवाने आज जॉबला सुटी का ? 
रीमा : आम्हांला कोण सुटी देणार ? ऑफिसच्या कामासाठी इकडे आले होते तितक्यात रस्त्यात दादा भेटला नि घरी घेऊन आला . 
सुषमा : रीमा ! व्हेरी बॅड ! ऑन ड्यूटी असताना असं माहेरी येणं चांगलं नाही . आमचे पंतप्रधान स्वच्छ भारत म्हणून सगळ्यांना आवाहन करतात आणि तुम्ही लोकं भारत स्वच्छ करायचे सोडून .... (रीमा तिला मध्येच थांबवत ) 
रीमा : ए ए वहिनी ..., तूच काही एकटी स्वच्छतेची भोक्ती नाहीस हं आणि माझ्या ऑफिसचा आणि स्वच्छतेचा काय गं संबंध ! 
विनय : ए सुषमा , माझ्या बहिणी इतके स्वच्छतेची पुजारीण दुसरी कुणी नाही हं , असे भलतेसलते आरोप करू नकोस माझ्या बहिणीवर . 
सुषमा : अहो , रक्षाबंधनाचे दावेदार , बहिणीची बाजू घ्यायला येथे काही संसदेची खडाजंगी नाही चालू . मला फक्त एवढेच म्हणायचे होते की , स्वच्छ भारत म्हणजे झाडू घेऊन झाडणे नव्हे तर प्रत्येक काम स्वच्छ व चोखपणे करणे होय तेही कामचुकारपणा न करता , 
रीमा : हो गं वहिनी , तू म्हणतेस ते अगदी शंभर टक्के खरे आहे . आम्ही' स्वच्छ भारत ' या संकल्पनेचा खूपच संकुचित अर्थ घेतला . 
विनय : रीमा , तुझ्या वहिनीला भाषण झोडायला कुणी सापडले नव्हते , तू आयतीच शिकार मिळालीस तिला . आता लवकर सटक येथून . नाहीतर तुझ्या नोकरीवर गदा यायची . 
सासूबाई : काय रे आल्यापासून तिघे ओरडत आहात , या पाटवड्या खा आणि पोटातला अग्नी शांत करा जरा , मग नंतर घालित बसा धुडगूस . विनय : सुषे , तुला काही लाज वाटते की नाही ! या वयात आईला काम करायला लावतेस नि स्वतः मात्र मिटक्या मारीत खात बसलीस ! 
सुषमा : साहेब , हे कलियुग आहे समजलं का ! कलियुगात सासूने काम करायचे नि सुनेने बसून खायचे . ( सासूबाईकडे नवऱ्याची कागाळी करीत ) बघितलंत आई ! तुमच्या मुलाने मला पाटवड्या काही पचू दिल्या नाहीत 
सासूबाई : ( हसत ) अरे बेटा , दररोज तीच तर मला खाऊ घालते . एक दिवस मी तिला खाऊ घातले तर बिघडले कुठे ! विनय : माझं काही म्हणणं नाही आई , पण उद्या उलटे घडले तर मात्र मला सांगू नकोस . तुझी बायको अशी वागते वगैरे ..... 
सुषमा : ऐकलं का आई , हा तुमचा मुलगा म्हणजे वकील आहे वकील , मोठ्या शिताफीने आधीच स्वतःची सुटका करून घेतली . बेजबाबदार कुठला ! विनय : आई , तू हिला सांगून दे हं ! खरं म्हणजे तूच हिला डोक्यावर बसवून ठेवलेस . का गं मी कुठे बेजबाबदार वागलो ... 
रीमा : ( मोठ्याने ओरडत ) गप्प बसता का तुम्ही दोघे ! मी आले माझ्याशी गप्पा करायचे सोडून तुमचं आपलं चाललं मस्तपैकी ! 
सुषमा : हं सॉरी गं रीमा , हे आमचं घरात नेहमीच चालत असतं गं हे काही भांडण वगैरे नाही गं . पण आपण जिवंत माणसं आहोत घरात असा फील येत असतो म्हणून आमची ही भांडणमय मस्करी नेहमीच चालू असते आम्हां तिघांमध्ये . 
रीमा : खरंच गं तुम्हां सर्वांचे नात्यांचे छानसे मेतकूट बघितले की वाटते आमच्या घरी का नसतं , सगळे कसे त्रिकोणी चेहरे करून परग्रहाच्या प्राण्यांसारखे वावरतात याचं वाईट वाटतं गं ! 
सुषमा : तुला सांगू का एक गोष्ट , तू तुझ्या सासू सासऱ्यांना महिनाभर आमच्याकडे पाठवून दे मग बघ काय चेंज होतो त्यांच्यात . 
रीमा : वहिनी , अगं काही उपयोग व्हायचा नाही नुसते ठोकळे आहेत , उलटे तुझे काम वाढेल . 
सुषमा : रीमा , आपण प्रयत्न तर करू या . तुझ्या सासू सासऱ्यांनी त्यांच्या पलिकडे कधी जगच पाहीलं नाही नाती म्हणजे काय असतात आणि ती कशी जपायची हे खूप लोकांमध्ये वावरल्यावर कळते . तू पाठव तर खरी आमच्याकडे . 
रीमा : मग तर देतेच पाठवून , चल बाय 
सुषमा : अगं लगेच काय निघालीस , थांब ना ! 
रीमा : नको , निघते मी स्वच्छ भारतच्या अभियानावर . 
सुषमा : तसं असेल तर मग जा , थांब नाही म्हणणार . ( दोघीही हसतात ) , मनेही स्वच्छ करायची , नातीही स्वच्छ करायचीत नि जातीभेदाच्या गटारीही साफ करायचीत तेव्हा कुठे भारत स्वच्छ होईल . स्वच्छ मने , स्वच्छ नाती , स्वच्छ समाज आणि ( सर्वजण तालासुरात म्हणतात ) स्वच्छ भारत !

Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या