हम हैं हिंदुस्थानी
दि . २९ डिसेंबर २०१४ ला आम्ही बँकॉकला पोहचलो असता आमच्या टूर मँनेजरने आम्हांला तीन दिवसाचे नियोजन थोडक्यात सांगितले आणि grand howard हॉटेलमध्ये नेऊन सोडले . हॉटेलची भव्यता प्रथमदर्शनीच नजरेत भरली आणि तेथील प्रत्येक गोष्टीने मन मोहून घेतले . आमची रूम अठराव्या मजल्यावर होती . आम्ही आपापल्या रुमचे कार्ड घेतले आणि लिफ्टमध्ये कार्ड स्वाईप केल्याबरोबर आमच्या मजल्याचा अठरावा क्रमांक आला आणि बरोबर अठराव्या मजल्यावर लिफ्ट थांबली नि डोअर ओपन झाल्याबरोबर आम्ही लिफ्टमधून बाहेर पडलो . त्याच कार्डने आमच्या रूमचा दरवाजा उघडला . रूममधील आतली प्रत्येक वस्तू आकर्षक होती . बाथरूमविषयी तर विचारायलाच नको . पंचतारांकित हॉटेलमधील बाथरूम कितीही आकर्षक असले तरी बादलीतील पाण्याने आंघोळ करण्यातली जी काही मजा असते ती शॉवर व बाथटबने येत नाही काय करणार ! ' आदत से मजबूर ' असे म्हणण्याची वेळ येते . grand हॉवर्ड हॉटेल त्याच्या भव्यता , स्वच्छता व उत्कृष्ट वास्तुरचनेचा नमुना म्हणून जितके लक्षात राहिले तितकेच ते एका प्रसंगाने अधिक लक्षात राहिले .
३१ डिसेंबर २०१४ हा वर्षाचा शेवटचा दिवस या हॉटेलमधील आमचाही शेवटचा दिवस होता . ३१ डिसेंबर २०१४ ला संध्याकाळी आमच्या टूर मँनेजरने सगळ्यांना कॉल करून रात्री नऊ वाजता पार्टीसाठी दुसऱ्या हॉटेलमध्ये जायचे असल्यामुळे तयारी करून सगळ्यांना एकत्र यायला सांगितले होते त्यामुळे आम्ही सर्वजण तयारीला लागलो . मी पार्टीसाठी साडी घालायचे ठरवताच माझे पती म्हणाले , " छानपैकी वेस्टर्न ड्रेस घालायचे सोडून काय साडी नेसतेस ! " अर्थात माझे उत्तरही ठरलेले होते , " हम तो हिंदुस्थानी हैं , बॅंकॉक में अपनी पहचान छोडके जायेंगे . " यावर पती महाशय म्हणाले , " ठीक हैं , ये भी सही हैं . " असे म्हणतच आम्ही आपापल्या तयारीला लागलो आणि थोडयाच वेळात तयार होऊन आम्ही रूममधून बाहेर पडलो आणि लिफ्टने जात असताना पंधराव्या मजल्यावर आमची लिफ्ट थांबताच दोघांनी लिफ्टमध्ये प्रवेश केला . आता ते दोघे पती - पत्नी की मित्र - मैत्रिण असा विचार मनात डोकावताच त्या परदेशी स्रीने आम्हांला विचारले , " आर यू इंडियन्स ? " आम्ही , " येस . " म्हणताच ती लागलीच सुरात गायला लागली , ओ मेरे सोना रे सोना रे सोना , दे दूंगी जान जुदा मत होना रे होना . " लिफ्ट खाली पोहोचेपर्यंत ती गात राहिली . तिच्या गाण्याला टाळ्या वाजवून दाद दिल्यावर तिला विचारले , " तुम्ही कुठून आलात आणि हिंदी भाषा कशी शिकलात ? " यावर ती म्हणाली , " आम्ही इराणहून आलोत आणि आमचे दोघांचे मित्र इंडियन्स आहेत . त्यांच्याकडून आम्ही हिंदी भाषा आणि गाणी शिकालोत .त्या इराणी स्त्रीच्या त्या वाक्याने मला पुन्हा केरळमधील मराठी प्रेमी सुभेर व तमिळी भगिनी आठवली , राज्य सोडून गेले की ,मराठी भाषेविषयीचे प्रेम उचंबळून येते तर देश सोडून गेल्यावर हिंदीचे ! व्यक्ती एकच असते पण देश ,कालपरत्वे विचार बदलत जातात आणि हेच व्यक्तिचे खरे लक्षण होय असे विचार मनात घोळवतच त्या दोघांसोबत आम्ही आठवण म्हणून फोटो काढलेत आणि त्या दोघा पती - पत्नीला निरोप देऊन आम्ही निघालो असता माझे पती म्हणाले , " आमचा साडी नेसण्याचा फायदा झाला तर मग ." आणि सगळे हसायला लागले . खरंच आपापल्या देशाचं वेगळेपण जपण्यात एक असीम आनंद असतो आणि या आनंदात इतरही सहभागी होतात तेव्हा तो आनंद द्विगुणीत होत असतो . परदेशात गेल्यावर आपली वेशभूषा ही आपली स्वतःची वेशभूषा नसते तर ती संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करीत असते याची जाणीव त्या दिवशी त्या इराणी स्रीने करून दिली म्हणून ती इराणी स्री कायमची स्मरणात राहील यात शंकाच नाही . ३१ डिसेंबर जवळ येताच मला ती इराणी स्री आणि तिचे ते गाणे आठवले आणि बँकॉक मधील grand हॉवर्ड हॉटेलमधील लिफ्ट आणि त्यानंतर Avani Atrium Bangkok येथील ५०० भारतीय पर्यटकांनी एकत्रितपणे केलेली पार्टीतील धमाल आठवली . जगाच्या पाठीवर कोठेही जा पण ' फिर भी हम हैं हिंदुस्थानी . ' हेच खरे .

Very good
ReplyDeleteThank you so much !
Deleteवाह खरंच अभिमान वाटतो भारतीय असल्याचा... आणि तुमच्या प्रसंगावरून तो द्विगुणित होतो
ReplyDeleteThank you so much!
Deleteखुप भावनाशील व बोलका अनुभव
ReplyDeleteThank you so much!
DeleteNice experience write up.. keep it up Jyotsna..
ReplyDeleteThank you so much
DeleteWhat an amazing and proud moment!
ReplyDeleteMany many thanks
Deleteखुपच छान अनुभव आहे, मस्त 👌
ReplyDeleteManapasun Dhanyavad!
Delete