अनुभव पहिला 
                                  
                    ('मासिक पाळीचा पहिला अनुभव' या स्पर्धेतील पहिला लेख) ती नऊ दहा वर्षाची असताना खेळता खेळता पडली . तिच्या गुडघ्याला मोठी जखम झाली आणि संपूर्ण पाय रक्ताने लाल झाला . रडत रडत ती घरी आली परंतु घरात आई नव्हती .तिची आई बाहेर गेलेली असल्यामुळे तो एवढासा जीव हमसून हमसून रडत बसला . एकटीच रडत बसली आईची वाट पाहत . थोडया वेळात आई येताच तिने त्या एवढ्याशा जीवाला रडताना पाहून जवळ घेतले . आई त्या छोटयाशा जीवाला डॉक्टरकडे घेऊन गेली आणि डॉक्टरांसमोर म्हणाली , " बेटा यापुढे खेळताना काही झालेच तर लागलीच डॉक्टर काकांकडे यायचे आणि ड्रेसिंग करून घ्यायचे . " त्यानंतर मात्र तिला खेळताना काही झालेच तर ती लागलीच डॉक्टर काकांकडे धाव घ्यायची . ती अकरा वर्षाची झाली आणि निसर्गाने आपली किमया दाखविली . ती आपल्याच मस्तीत , धुंदीत वावरत होती . अल्लड बालपण उपभोगत आनंदाने जगत होती . अशीच एके दिवशी मैत्रिणींबरोबर खेळत असताना ती लघवी करण्यासाठी घराच्या मागच्या अंगणातील बाथरूममध्ये गेली . बाथरूममध्ये तिने पहिले तर सगळीकडे रक्तच रक्त पडलेले पाहून ती चांगलीच घाबरली . तिला वाटले आपल्याला खेळताना काहीतरी लागले असावे म्हणून ती दोन्ही पायांकडे निरखून पाहू लागली . परंतु पायाला कुठेच जखम झालेली दिसली नाही . नंतर तिच्या लक्षात आले की आपल्याला लघवीच्या ठिकाणीच जखम झालेली दिसते . ती घाबरली आणि तशीच पळत डॉक्टर काकांकडे गेली . ती डॉक्टरला म्हणाली ,"डॉक्टर काका ,मला खेळत असताना लघवीच्या जागी जखम झाली आहे . खूप रक्त वाहत आहे ." तो अकरा वर्षाचा बालजीव मोठया विश्वासाने डॉक्टर काकांकडे गेला होता परंतु डॉक्टर असूनही त्या डॉक्टर काकांना एका निष्पाप जीवाचे भाव जाणता आले नाहीत . त्या डॉक्टरने तिला टेबलावर झोपवले आणि तिच्या छातीवर हात ठेवून चाचपून पाहिले . त्याकाळी म्हणजेच पंचवीस तीस वर्षापूर्वी खेडयातल्या दवाखान्यात पडदे वगैरे लावलेल नसल्यामुळे त्याचक्षणी दवाखान्यात डॉक्टरचा मित्र आला आणि डॉक्टरला म्हणाला ,"अरे मुलगी फार लहान आहे तू काय करतो आहेस तिच्याशी ?" यावर डॉक्टर मित्राला हसून म्हणाला ," अरे , मी तेच तर बघतो आहे की ती वयात आली का . " आणि दोघेही खो खो करीत हसत सुटलेत . ते का हसत आहेत ? ते त्या बालजीवाला काहीच कळले नाही . ती डॉक्टर काका ड्रेसिंग करतील याच आशेने टेबलवर झोपून राहिली . डॉक्टरने तिला सांगितले ,"ऊठ , घरी जाऊन आईला सांग ." तो एवढासा जीव उठला आणि घरी आला . आई नुकतीच शेतातून आलेली होती . तिने आईला घडलेली घटना सांगितली . आईला खूप वाईट वाटले . आईने तिला कपडे कसे घ्यायचे ते शिकविले आणि तिला सांगितले , "तू आता मोठी झाली आहेस . आता बाहेर खेळायचे नाही आणि यापुढे काहीही झाले किंवा तुला खेळताना लागले ,खरचटले तरी डॉक्टर काकांकडे जायचे नाही ." आईच्या उद्गारांनी तो बालजीव पुरता गोंधळून गेला . कालपर्यंत लहान म्हणून कवटाळणाऱ्या आईने तिला आज चक्क मोठे करून टाकले . डॉक्टर काकांकडे जायला सांगणारी आई आज चक्क म्हणते ,"काहीही झाले तरी डॉक्टरांकडे जायचे नाही . " निसर्ग आणि माणूस यांच्यात तो एवढासा बालजीव पुरता गुदमरून गेला होता . आजही तो जीव पंचवीस तीस वर्षापूर्वीच्या भूतकाळात शिरतो तेव्हा त्याला दरदरून घाम फुटतो आणि नको तो भूतकाळ असे म्हणून स्वतःची त्यापासून सुटका करू पाहतो पण ते कदापीही शक्य नसते .
©ज्योत्स्ना पाटील

Comments

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या