'वेडावूनी गेले वय' 

                           तिचे दहावीचे प्रथम सत्र संपले होते. प्रथम सत्राची परीक्षा नुकतीच संपली होती म्हणून ती आनंदात होती. सगळीकडे दिवाळीच्या कामांची लगबग चालली होती. कुणी घराला रंग देण्याचे काम करीत होते तर कुणी अंगण ठाकठीक करण्यात दंग. घरातील बायका फराळासाठी गहू दळून रवा, मैदा काढण्याच्या कामात गर्क होत्या. प्रत्येकजण आपापल्या परीने दिवाळीच्या तयारीला लागले होते. त्यात तीही रांगोळी काढणे, रांगोळीत रंग भरणे यासारखी कामे करीत सुटीचा व दिवाळीचा आनंद ऊपभोगत होती. ऊदया दिवाळी म्हणून ती खूप आनंदात होती आणि अचानक तिच्या पोटात व पायात वेदना होऊ लागल्यात परंतु दिवाळीच्या आनंदापुढे तिने शरीराला होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष केले. संध्याकाळी ती अंगणात रांगोळी काढत असतानाच काहीतरी झाले असे वाटून ती बाथरुममध्ये गेली आणि स्वतःचे कपडे नीट न्याहाळून पाहिले असता तिला तिचे अंतर्वस्र रक्ताने लाल झालेले दिसले. ती तशीच बाहेर आली आणि ओटयावर बसून रडू लागली. तिला रडताना पाहून आजी तिच्याजवळ आली आणि तिला म्हणाली,"बाळ,का रडत बसलीस. दादाशी भांडण झाले का?" यावर ती काहीच बोलली नाही फक्त मान हलवून 'नाही' म्हणाली. ती रडत रडत आजीला म्हणाली, "आजी, माझे अबॉर्शन झाले." ती काय म्हणते याचा काहीच उलगडा आजीला होत नव्हता. आजीने सुनेला म्हणजेच तिच्या आईला हाक मारली. आजीची हाक ऐकून तिची आई बाहेर आली आणि तिला तिची लाडली हमसून हमसून रडताना दिसली. आजी सुनेला म्हणाली, "ही बघ! काय म्हणते, केव्हापासून एकच रट लावली आहे, आजी माझे अबॉर्शन झाले. तिचे अबॉर्शनच्या नावाने चाललेले रडणे ऐकून आई व आजी चांगल्याच बुचकळ्यात पडल्यात. तिची आई तिला सारखी विचारत होती, "बेटा, काय होत आहे ते नीट सांग पण ती एकच वाक्य पुनःपुन्हा सांगू लागली, "माझे अबॉर्शन झाले आहे मला भीती वाटते. थोडया वेळानंतर मात्र तिच्या आईच्या लक्षात आले आणि तिने डोक्यालाच हात लावून घेतला नि सासूबाईला म्हणाली, "आत्याबाई, काही झाले नाही तुमच्या नातीला. लग्नाची घोडी झाली." असे म्हणतच तिने लेकीला हाताला धरूनच बाथरूममध्ये नेले आणि तिला समजावून सांगितले की तुझे अबॉर्शन वगैरे काही झालेले नाही. आता तुला दर महिन्याला असा रक्तस्राव होत जाणार. आता तू मुलगी नाही तर स्री झालीस. बापरे! कालपर्यंत मुलगी आणि आज अचानक स्री. तिचा गोंधळ अजूनच वाढला. अंगणात रांगोळी काढण्याऐवजी तिला घरातच स्थानबद्ध व्हावे लागले आणि त्या वर्षाची दिवाळीची मजा काही तिला घेता आली नाही. मासिक पाळीला अबॉर्शन समजून रडणारी ती आईच्या एका प्रसंगाने चांगलीच घाबरली होती. या घटनेपूर्वी तिला दोन वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. तिची आई गरोदर असताना पूजेसाठी ताजे पाणी हवे होते म्हणून गावातल्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असता अचानक तिची आई चक्कर येऊन विहिरीजवळच पडली आणि या छोटयाशा अपघाताने तिच्या आईचे अबॉर्शन झाले होते. आईला होणारा रक्तस्राव पाहून ती त्यावेळेस खूपच घाबरली होती . आणि आज तिला होणारा रक्तस्राव पाहून तिला आईचे झालेले अबॉर्शन आठवले आणि आपलेही अबॉर्शन झाले असे समजून ती पुरती घाबरून गेली होती नि आईप्रमाणे आपलेही अबॉर्शन झाले असे समजून रडत बसली. त्यादिवशी तिच्या आईला अबॉर्शन आणि मासिक पाळी यातील फरक तिला समजावून सांगता सांगता चांगलेच नाकीनऊ आले होते. तिची शंका आईने दूर केली त्यानंतर आईने व तिच्या आजीने मासिक पाळीनंतर चौथ्या दिवशी तिला मखर केले. पाच पक्वान्न केले होते. तिला पाटावर बसवून छान रांगोळी काढली. बाजूला समई लावली होती . तिच्यासाठी छानशी साडी आणली. तिची यथासांग पूजा केली. पाच दिवस तिला त्यामुळे शाळेला दांडी मारता आली. शाळेला दांडी मारण्याचा आनंद मात्र शारीरिक त्रासामुळे काही तिला उपभोगता आला नाही. याचे वाईट वाटत होते. त्यातच बरोबरीच्या मैत्रिणींनी शाळेत का येत नाही? असे विचारून विचारून भंडावून सोडले ते वेगळेच. मासिक पाळीलाच अबॉर्शन समजणारी छोटीशी लाडली त्यावेळी किती तणावात वावरली असेल या कल्पनेनेच मन भयभीत होऊन जाते. या छोट्या मैत्रिणीने हा अनुभव जेव्हा कागदावर लिहून काढला तेव्हा ती मला म्हणाली, "मॅडम, प्रत्येक पाळीच्या वेळेस मला हा अनुभव आठवतो आणि खूप किळसवाणे वाटायचे. दिवाळी येताच मला हे सगळे आठवत असते आणि नकळत मन कुठेही भरकटत जाते पण आज जेव्हा मी कागदावर लिहून काढले तेव्हा मन अगदी मोकळे झाल्यासारखे वाटले."
©ज्योत्स्ना पाटील

Comments

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या