गावाची शान - गावाचा पार

                  गावाची शान-गावाचा पार  

         आम्ही लहान असताना पाराजवळ पिंपळाच्या झाडाखाली सागर गोटया खेळायचो त्यामुळे पार आणि पिंपळाचे झाड या दोन गोष्टींशी आमचे एक भावनिक नाते जोडले गेले ते कायमचेच . धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी या गावाचे भद्रावती नदीने दोन भाग केले आहेत . भद्रावती नदीने एका काठावरील गावाला उंचावर नेऊन ठेवले आहे तर दुसऱ्या काठावरील गावाला अगदी खाली आणून ठेवले आहे . उंचावर असणाऱ्या गावाला नेमके उलट नाव मिळाले आहे . उंचावर असणाऱ्या गावाला ' खालनं गाव ' खाली असलेल्या गावाला ' वरनं गाव ' अशी नावे येथील गावकऱ्यांनी दिली आहेत . असे उलट नाव देण्यामागे कदाचित या गावाचा बाजाराच्या म्हणजेच तालुक्याच्या गावाशी असलेला संबंध कारणीभूत असावा कारण तालुक्याच्या गावाच्या दिशेला असणाऱ्या गावाला ' वरनं गाव ' असे नाव पडले असावे . खरे तर भौगोलिक दृष्टया पाहिले तर ते गाव नदीच्या पात्राला लागूनच आहे परंतु हे गाव सपाटीवर नाही हेही खरे ,  कदाचित त्यामुळे ' वरनं गाव ' म्हणून संबोधण्यास भाग पडले असावे . परंतु प्रत्यक्षात नदीच्या मध्यभागी उभे राहून दोन्ही गावांवर नजर टाकली तर ती नावे विसंगत वाटतात . ते काही असो नदीला मात्र दोन्ही मुले (गावे) सारखीच आहेत . परंतु तिचा एक पार समृद्ध आहे तर दुसऱ्या पाराची अवस्था पाहून जीव तळमळतो
           भद्रावती नदीच्या खालच्या गावातील पार हा तिच्यापासून तेरा चौदा फूट उंचीवर आहे तर याउलट वरच्या गावातील पार हा फक्त तीन फूट उंचीवर आहे . खालच्या गावातील पार हा उंचावर असून त्याचा थाट काही वेगळाच आहे . हा पार भक्कम अशा दगडी बांधकामाने एखादया मदमस्त हत्तीप्रमाणे भारदस्त आहे . त्याच्या चारी बाजूंनी कोट बांधलेला आहे जेणेकरून वृद्धांना आरामात टेकून बसता येते . या पारावर सतत छत्री धरून उभे राहण्याचे काम पिंपळाकडे सोपवले आहे . पिंपळाच्या झाडाकडे पाहिल्यानंतर पाराकडे पाहिले तर या पाराचा थाट एखादया राजाप्रमाणे वाटतो . या पाराचा गोतावळा फार मोठा आहे त्यामुळे याला एकाकीपणाची भावना काय असते हे ठाऊकच नाही . सूर्य नारायण उगवताच या पाराची लगबग सुरू होते . कावळे , चिमण्या यासारखे अनेक पक्षी त्याला सकाळचं संगीत ऐकवतात त्यानंतर त्यांच्या आजूबाजूला पहारा करायला गाई , म्हशी ,शेळ्या असतातच . काही जख्ख म्हातारी माणसे सकाळी आठ वाजताच घरून चहा पिऊन निघतात ती तडक पाराच्या आश्रयाला येतात . घरातल्या लोकांना आपली अडचण नको तसेच घरातल्या कटकटीपासून दूर राहायचे तर मग पाराइतका जिवाभावाचा दुसरा सखा नाही . एक एक करीत पंधरा वीस म्हातारी माणसे सकाळपासून दुपारी बारा एक वाजेपर्यंत ठाण मांडून बसतात . या पंधरा वीस जख्ख म्हाताऱ्या माणसांच्या सोबतीला अर्धा पाऊन तासाकरिता पारावर फेरी मारणारी साठी उलटलेली परंतु शारीरिक दृष्टया तंदुरुस्त असणारी माणसांची ये - जा सतत चालू असते . यातले काही शेतात जाणारे तर कुणी तालुक्याच्या गावाला तर कुणी जवळपासच्या खेडयांवर कामानिमित्ताने जाणारी माणसे घटकाभर पारावर येऊन जाणार . कदाचित या म्हाताऱ्या माणसांना पारावर आल्याशिवाय कुठले कार्य तडीस जात नसेल अशी त्यांची श्रद्धा तर नाही ना ! असे वाटत असते .    
        पारावरील म्हाताऱ्या माणसांच्या गप्पा हा देखील मजेशीर अनुभव असतो . रस्त्याने जाणाऱ्या बायका , मुली हा तर या म्हाताऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो . पारासमोरून एखादी गोरीगोमटी स्री डोक्यावर कपडयांची टोपली घेऊन धुणं धुवायला नदीवर जाताना दिसली की एखादा जख्ख म्हातारा इतर म्हाताऱ्यांना हमखास विचारतो , " हाई भुरं कातडं कोनं रे ? " एखादी नखरेल पोरगी जाताना दिसली तर त्यातला एखादा म्हातारा म्हणतो कसा . " हाई छम्मक छल्लो कोनी रे ?"  ' छम्मक छल्लो ' हा शब्द हे म्हातारे अशा काही ढंगात बोलतात की हिंदी सिनेमातल्या हिरोंनी देखील हा शब्द कसा उच्चारावा हे या म्हाताऱ्याकडून शिकावे . बायका पोरींवरून या म्हाताऱ्यांची नजर जाते ती थेट म्हाताऱ्या बायकांवर . एखादी म्हातारी पाराजवळून जाताना दिसली की हे म्हातारे डोळे फाडून फाडून बघू लागतात परंतु त्यांच्या अधू डोळ्यांना तसे पुसटच दिसते मग ते सुदैवाने ज्याची नजर शाबूत असते त्याला विचारतात , " हाई मोठमाय दगडयानी दिसस . " शाबूत नजरवाला त्यांना होकार भरतो आणि निःश्वास सोडतच म्हणतो , " दगडयानं नसीब भलतं बलवत्तर म्हनीसन त्याले हाई सोनानी खान मियनी ." असे हे जख्ख म्हातारे पारावर का येतात ? आणि यांना पारावर आल्याशिवाय चैन का पडत नाही याचा उलगडा पारावर गेल्याशिवाय कळत नाही . म्हाताऱ्याच्या गप्पा रंगात असतानाच आमचा पाराला लागूनच चाललेला सागर गोटयांचा डाव रंगात आलेला असायचा त्यामुळे आमचा जोरात आरडाओरडा सुरू होताच म्हातारे आमच्यावर चांगलेच बरसायचे कारण आमच्या ओरडण्याने म्हाताऱ्याच्या गप्पांमध्ये व्यत्यय यायचा कारण त्यातल्या बऱ्याच जणांचे कान पैलतीराला लागलेले असायचे . जसजसा डाव रंगात यायचा तसतसा आमचा आवाज वाढत जायचा मग मात्र सर्व म्हातारे एका तालासुरात ओरडायचे , " घुबडीसन तथं खेयता येत नही का तुम्हले . राहयन्यात आठे केकाटीन . " अर्थात त्यांचे सर्वच शेरे आमचे चांगलेच तोंडपाठ झाले होते त्यामुळे आम्ही ते मनावर घेता आम्ही आमचा खेळ खेळत राहायचो . आमचा खेळ आणि म्हाताऱ्यांच्या गप्पा या चांगल्याच रंगात यायच्या
           म्हातारे बायका , मुलींवरून नजर काढायचे आणि थेट तरूण मुलांवर रोखायचे . एखादया नुकत्याच लग्न झालेल्या पोराला रस्त्याने जाताना पाहीले की हमखास हे म्हातारे त्या पोराला हटकायचे आणि म्हणायचे , " मंग काय यंदा पैरानं शे का नई ,का बायकोमाच दंग राव्हान शे . " बिच्चारं ते पोरगं गालातल्या गालात हसत हळूच म्हणायचं . " पैरं नई ते खावाले कसं मियी ." असं म्हणत ते पोरगं झटकन रस्ता चालू लागायचा . बिच्चारे म्हातारे या तरूण मुलांमुळे स्वतःचे जुने  दिवस आठवून स्वप्नात दंग होऊन जात असत
          असा हा गावाचा पार दिवसभर गजबजलेला असे . संध्याकाळी तर त्याला अगदी बहरच यायचा . दिवसभरातील गावात घडलेली प्रत्येक घटना ऐकण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे ' पार ' होय . असा हा पार सूर्य उगवल्यापासून ते सूर्य मावळेपर्यंत जसा गजबजलेला असे तसाच तो रात्रीदेखील गजबजलेला असायचा . गावातील गरीब कुटुंबातील एका खोलीत राहणाऱ्या सदस्यांना 
हा पार रात्रीची झोपण्याची सोय पुरवणारा असायचा . गावातील अनेक पुरुष मंडळी हातात वळकटी घेऊन सरळ पारावर पसरवून झोपेच्या स्वाधीन व्हायची . पारावर झोपणारी मंडळी त्यांच्यासोबत रात्री उशिरापर्यंत गप्पा करणारी मंडळी यांनी हा पार रात्रीही गजबजून जायचा त्यामुळे सतत माणसांचा राबता असलेल्या या पाराला एकाकीपणाचे दुःख कधी ठाऊकच नाही
          ' गावाचा पार '  म्हणजे गावाच्या रसिकतेचे खरेखुरे केंद्र होय . पार नसलेलं गाव हे कळाहीन भकास वाटत असते त्यामुळे गावाचं आणि पाराचं नात हे अतूट आहे . पार असलेल्या गावाची शान काही औरच असते . पार म्हणजे गावाचं ' हृदय ' होय त्यामुळे गावात एक चैतन्य नांदत असते . जीवनाच्या नवीन पर्वाला सुरुवात करणाऱ्या  नवरदेवाला पारावर नेण्याचा रिवाज आहे आणि हा रिवाज पडण्यामागे देवाच्या दर्शनाबरोबरच पारावरचा रंगीला स्वभाव पारावरच ठेवून आता निमूटपणे सभ्य बनून तुझ्या जीवनात प्रवेश करणाऱ्या स्रीलाच खऱ्या अर्थाने हृदय अर्पण करायचे आहे अशी शिकवण घेण्यासाठी तर नवरदेवाला नेत नाहीत ना ! असे वाटत असते . असा हा रंगरंगीला पार प्रत्येक गावाने जपावा आणि आपापल्या गावाची शान वाढवावी

Comments

  1. एकदम मस्त.. आमच्या गावाच्या पार ची आठवण झाली

    ReplyDelete
  2. हा लेख वाचून बालपण आठवले. सुंदर लेख आहे

    ReplyDelete
  3. While reading this I could picturise evey moment. Felt like I have witnessed it by myself . Beautiful written and aptly described .

    ReplyDelete
  4. आजपासून जवळपास 36 वर्षापूर्वीचा हा भावप्रसंग तू लिहीलास हे भावपूर्ण अंतःकरण असल्याशिवाय हे शक्य नाही.तसच हे सारं कृतज्ञता असल्याशिवायही शक्य नाही.आजकाल गावातूनच शहरी संस्कृती अंगीकारलेली लोक गावाकडचं सारचं जणूकाही अस्पृश्य व असंस्कृत समजतात.
    तू खूप दिवस शहरात राहूनही खेड्याच्या संस्कृतीचा गौरव करतेस.
    उत्तम लिखाणास व भावपूर्णतेस धन्यवाद.

    ReplyDelete
  5. शेवाळीचा पार हा आमच्या पिढीच सास्कृंतीक लेण हाेत व आहे..आजही गावात |गेलाे तर त्या पारावर विसावण एक वेगळा आनंद देअुन जाताे..तुमच्या लेखाने पाराच्या फरशा पिपंळ ही सजीव संवाद करा़यत....मनःपुुरवक आभार

    ReplyDelete

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या