तिची नि माझी भाषा 

                       फेब्रुवारी महिना येताच कुसुमाग्रजांची जशी आठवण येते त्याचप्रमाणे तिरुअनंतपूरमला भेटलेल्या एका महिलेचीही हमखास आठवण येत असते . २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करताना मला तिची नेहमीच आठवण येते आणि भाषा म्हणजे काय ? याचे उत्तर खऱ्या अर्थाने मिळत असते . १२ नोव्हेंबर २००५ ला मी व माझी नणंद तिरुअनंतपूरमला एका रेस्टारंटमध्ये जेवण करीत असताना आमच्या गप्पा चालू होत्या . गप्पा करीत जेवणाचा आस्वाद घेत असतानाच एक स्री आमच्याजवळ आली आणि मला म्हणाली , "एक्सक्यूज मी , तुम्ही महाराष्ट्रीयन का ?" मी हो म्हणताच ,तिने लागलीच दुसरा प्रश्न विचारला , "कुठून आलात ?" आम्ही आमची सविस्तर माहिती सांगितली तेव्हा ती स्री म्हणाली ,"मराठी शब्द कानावर पडले की खूप छान वाटते . मला मराठी बोलणारे भेटताच माझे बालपण परत मिळाल्यासारखे वाटत असते . " तिच्या त्या भावना जाणून मी तिला बोलते केले . तुम्ही तर तेलगू बोलतात मग तुम्हांला मराठी कसे बोलता येते ? माझ्या या प्रश्नावर त्या स्रीने माझ्यासमोर तिचे बालपणच साकार केले . ती म्हणाली ,"मॅडम , मी मूळची तामिळनाडूची . येथे केरळमध्ये नोकरी करते . माझं शिक्षण पुण्याला झाले त्यामुळे मला मराठी छान बोलता येते तसेच खांडेकर , फडके , जी . ए . कुलकर्णी यांची पुस्तकेही वाचली आहेत . मला मराठी साहित्य वाचायला आवडते . मराठी भाषा ऐकली की मला वाटते मी पुण्यातच आहे . माझा नवरा म्हणतो , मराठी भाषा बोलणारे भेटलेत की तू तुझ्या नवऱ्यालाही विसरून जातेस . अर्थात हे तो मल्याळममध्ये बोलतो . " त्या स्रीला आमच्याशी खूप गप्पा कराव्याशा वाटत होत्या . जणूकाही खूप दिवसांचा उपाशी माणूस असावा आणि त्याला जेवायला दिल्यावर काय खाऊ नि किती खाऊ असे होऊन जाते त्याचप्रमाणे त्या स्रीची आमच्याशी गप्पा करताना अवस्था झाली होती . तिने तिच्या मुलीला रेस्टारंटमध्ये जेवायला आणले होते . मी तिला म्हणाले , "तुम्हांला जेवायचे नाही का ?" तर ती म्हणाली , आज मला हाफ डे असल्यामुळे मुलीचा हट्ट होता की रेस्टारंटमध्ये जेवाण्याचा म्हणून तिला जेवायला घेऊन आले . माझा स्वयंपाक झालेला आहे मी घरी गेल्यावर जेवीन तुम्ही जेवण चालू ठेवा . "आमचे व तिच्या मुलीचे जेवण होईपर्यंत तिने मनसोक्तपणे मराठीतून गप्पा केल्यात . जणूकाही सासुरवाशीण माहेरी आली असता सर्वांशी किती बोलू न किती त्याप्रमाणे ती आमच्याशी बोलत होती आणि तिची मुलगी कधी आमच्याकडे तर कधी आईच्या तोंडाकडे आश्चर्ययुक्त नजरेने पाहत होती . ती मुलीला मधूनच मल्याळममध्ये सूचनाही देत होती . तिला पाच सहा भाषा अवगत होत्या . जेव्हा आम्ही जेवण करून निघताना तिचा निरोप घ्यायला लागलो तेव्हा ती म्हणाली , "मी या रेस्टारंटच्या पाठीमागेच राहते . तुम्ही माझ्या घरी आला असतात तर मला खूप आनंद झाला असता . परंतु प्रथम भेटीत कुणाच्या घरी जाणे योग्य नाही म्हणून मी तिला सांगितले , "भविष्यात कधी केरळला येण्याचा योग आला तर तुमच्या घरी नक्की येणार . " असे म्हणत आम्ही तिचा व तिच्या मुलीचा निरोप घेतला . तिचा निरोप घेऊन आम्ही पुढील प्रवासाला निघालो असता प्रवासात सारखे त्या स्रीविषयीचे विचार चालू होते . भाषा , भाषा म्हणून आज सर्वत्र ओरड होत असते . परंतु कुठलीही भाषा असो , ज्याला जी भाषा अवगत असते ती भाषा त्या व्यक्तीला आवडत असते . विविध भाषा बोलणाऱ्या व्यक्तींना भाषेत भेदाभेद करायला आवडत नाही . भाषा ही एकदुसऱ्याशी संवाद साधण्याचे माध्यम आहे हेच ठाऊक असते . बालपण महाराष्ट्रात , माहेर तमिळनाडूचे , सासर आन्धराप्रदेशातले तर कर्मभूमी केरळ असणाऱ्या त्या स्रीला मी कधीच विसरू शकत नाही . भाषेचा खरा अर्थ जाणणाऱ्या त्या स्रीला मी मनोमन सलाम केला होता आणि भारतीय म्हणजे काय याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मला भेटलेली ही भारतीय स्री होय . मिसेस रेड्डी , मूर्ती अशा नावाने तिला संकुचितता न आणणेच शहाणपणाचे ठरेल .

Comments

  1. खूपच छान आणि सुंदर आठवणी

    ReplyDelete
  2. Everyone travels but very few create memories. Each journey of yours is full of interesting stories. Thank you for sharing your memories.

    ReplyDelete

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या