शिऱ्याची गोडी

शिऱ्याची गोडी 

                 दर पंधरा दिवसांनी लोणी काढताना दोन गोष्टी हमखास आठवतात, त्या म्हणजे शेवाळी (दातर्ती , जि. धुळे )येथील आजोबांचे ( मामाचे ) गाव आणि संत तुकारामांच्या अभंगातील ओवी. संत तुकाराम महाराज म्हणतात, मृदु सबाह्य नवनीत (लोणी ) तैंसे सज्जनाचे चित्त दैनंदिन व्यवहारातील साध्या, सोप्या उदाहरणांनी जीवनाचे मर्म उलगडून दाखविणाऱ्या संत तुकारामांच्या प्रतिभेला खरे तर तोड नाही. असं हे आतून बाहेरून मृदु असणारे लोणी जेव्हा माझी मामी भांडयात काढायची तेव्हा ते भांडयात पडण्यापूर्वीच माझ्या तोंडात गडप व्हायचे. मामी ताक घुसळेपर्यंत व लोणी काढेपर्यंत पाव किलो लोणी तरी माझ्या पोटात गडप व्हायचे. मामी ताक घुसळेपर्यंत व लोणी काढेपर्यंत पाव किलो लोणी तरी माझ्या पोटात ठाण मांडून बसायचे. पोटात गेलेल्या या पांढऱ्या लोण्याचे रक्तात रूपांतर कसे होते? हा बालपणी पडलेला प्रश्न दरवेळी लोणी काढताना आठवतो आणि नकळत ओठांवर हसू उमटते. मामीने काढलेल्या लोण्यापासून दीड ते दोन किलो तूप तयार व्हायचे. तूप झाल्याबरोबर त्या ताज्या तुपाचा शिरा बनवायचे काम माझी आजी करायची. शिरा तयार होताच घरातील सर्वांना पूर्ण डिश भरून गरमागरम शिरा खायला मिळायचा. आजीच्या हातच्या शिऱ्याची चव पुन्हा कधीच अनुभवायला मिळाली नाही. आज काजू, बदाम, बेदाणे घालून केलेल्या शिऱ्यालादेखील ती चव येत नाही. काय जादू असेल आजीच्या हाताने बनवलेल्या शिऱ्यात! खरे तर शिरा बनविणे ही तशी झटपट बनणारी सर्वात सोपी स्वीट डीश असूनही ती बनविण्यास मी तयार नसते. माझ्याकडे दुसरी कोणतीही स्वीट डीश उपलब्ध नसेल त्यावेळेसच मी शिऱ्याला पाचारण करते ते ही मोठया जड अंतःकरणाने कारण शिऱ्यामुळे मला माझे आजोळ आणि दूधदुभत्याने भरलेल्या घराचे खरे वैभव व त्या वैभवात नांदणारा सुखासमाधानाने असलेला माझ्या आजोबांचा परिवार आठवतो आणि गतस्मृतींनी मन कसे गलबलून येते. आज आजी आजोबा नाहीत, दोघे मामाही नाहीत आणि दोघी मामींची कुंकूविहिन भकास, उदास चेहरे आठवून शिऱ्याची गोडीच निघून गेली. शिऱ्यातली गोडी आता शोधूनही सापडत नाही परंतु, संत तुकारामांच्या ओवीतील सज्जन माणसे म्हणजे माझे आजोबा, आजी, मामा, मामी, मामेभाऊ व मामेबहिणी यांचा गोतावळा मला लाभला म्हणून मी स्वतःला धन्य समजते. शिऱ्यातली गोडी आणि लोण्यातील मृदुता आजोळच्या गोतावळ्याने भरभरून दिली आणि देत आहेत आणि देत राहणार याचा विशेष आनंद आहे. पंधरा सोळा वर्षांपूर्वी माझ्या सासूबाईंना डॉ. डहाळेंच्या दवाखान्यात डावा खांदा दुखत असल्यामुळे दाखल करण्यात आले होते. जवळजवळ दहा दिवस दवाखान्यात त्यांना राहावे लागले होते. एके दिवशी सोमवार असल्यामुळे मी घरून फळे व राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा डब्यात घालून नेला. डब्यातील शिरा पाहून सासूबाई म्हणाल्या, " अगं, मी काही इतका डबाभर शिरा खाणार आहे का?" अर्थात दवाखान्यात खूप लांबून, खेडयापाडयातील पेशंट आलेले असतात. सर्वांचेच नाशकात नातलग असतीलच असे नाही. त्यातच अनेक पेशंट व त्यांच्यासोबत असलेल्या नातलगांची आर्थिक परिस्थितीही बेताची असते त्यामुळे अशा गरजू पेशंट व त्यांच्यासोबत असणाऱ्या नातलगांसाठी मी डबा अधिक प्रमाणात नेत असे. त्यादिवशीही मी त्याच उद्देशाने फळे व शिरा नेला होता. माझ्या सासूबाईंना सांगितले, "आई, तुमच्या बाजूला (बेडवर ) असणाऱ्या काकांचा व मावशींचाही उपवास आहे. त्यांच्यासाठीही डबा आणला आहे." मग आमच्या आई खूश झाल्यात. आमच्या आईंच्या शेजारील बेडवरील काका, मावशी नगर जिल्ह्यातील एका खेडयातील शेतकरी होते, त्यांचाही उपवास असल्यामुळे आणि उपवासाचा शिरा असतो हे त्यांना ठाऊक नसल्यामुळे ते शिरा खायलाच तयार नव्हते. मग मी त्यांना सांगितले तुम्ही शेतात राजगिरा पिकवितात ना! त्या राजगिऱ्याचे पीठ तयार करून नेहमीच्या शिऱ्याप्रमाणेच तुपात पीठ भाजून शिरा केला आहे, शिऱ्याचा उलगडा केल्यावर ते दोघेही शिरा खाण्यास राजी झालेत. राजगिऱ्याचा शिरा खाऊन दोघेही खूश झालेत. मावशीबाई म्हणाल्या, "घरी गेल्यावर करून पाहीन." आमच्या आई दवाखान्यात असेपर्यंत मी त्या दोघांचा डबा नेत असे. ज्यादिवशी आमच्या आईंना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला तेव्हा त्या दोघांच्या डोळ्यात पाणी आले. ते दोघेही म्हणाले, "ओळखपाळख नसताना आमची काळजी घेतली, आमच्या गावी या. तुम्हांला आमच्या शेतातला रानमेवा खाऊ घालण्याची संधी दया. " आजीच्या हाताच्या शिऱ्याची गोडी अशाप्रकारे वेळोवेळी सर्वदूर जात राहिली, जात आहे आणि जात राहणार. संत तुकारामांच्या ओवीचे मर्म अशा छोटया छोटया कृतीतून अधिकच उलगडत जाते आणि आजीचा शिरा माणसामाणसातला दुवा बनून माणुसकीचा झरा वाहता ठेवण्याचा मंत्रही देत असतो. आज बारीक रव्याचा शिरा, जाड रव्याचा शिरा, गव्हाच्या पिठाचा शिरा,राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा, मुगाच्या डाळीचा शिरा, बदामाचा शिरा, मटाराच्या दाण्यांचा शिरा, साखरेचा शिरा, गुळाचा शिरा, तुपाचा शिरा, तेलाचा शिरा अशा अनेक प्रकारचा शिरा खाऊनही जिभेवर रेंगाळतो तो फक्त आजीच्या हातचा शिरा आणि वैष्णोदेवीला जाताना १९८९ साली कटरा येथील संगीतकार गुलशनकुमार यांच्या लंगरमध्ये खाल्लेला शिरा.

Comments

  1. I truly appreciate your empathy towards needy and underprivileged. This story was truly interesting.
    Today’s generation raised in nuclear families with les human interactions is definitely missing the joy of sharing.

    ReplyDelete

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या