मासिक पाळी

                             मासिक पाळीचा पहिला अनुभव २८ मे हा प्रथमच 'जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस ' म्हणून साजरा करण्यात येत आहे . मी स्वतः या विषयावर गेल्या पाच सहा वर्षांपासून वैयक्तिकरित्या काम करीत आहे . माझ्या नात्यातील , परिवारातील ,मैत्रिणींना तसेच महिला मंडळे व भिशी ग्रुपमधील स्रियांना या विषयावर मी लिहिण्यास प्रवृत्त केले . नाशिक शहरातील काही शिक्षिकांनी मला जून महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात म्हणजेच शाळा सुरु होण्याच्या वेळेस अभ्यासक्रम सुरु होण्यापूर्वी मला इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थींनीसाठी स्पर्धा घेण्यास सुचविले त्यामुळे मला खूप आनंद झाला . एका स्रिचा मासिक पाळीचा दुःखद अनुभव ऐकल्यावर व मन्ना डे यांचे ' लागा चुनरी में दाग ' हे गाणे ऐकले तेव्हापासून आणि दासू वैद्य यांची ' जाळभाज ' ही कविता वाचली तेव्हापासून ' मासिक पाळी ' हा विषय माझ्या डोक्यात थैमान घालीत होता . पुरुष जर या विषयावर बोलू किंवा लिहू शकतात तर मग स्रियांनी का या विषयाला वर्ज्य करावे ? या विचारासरशी स्रियांना मासिक पाळीचा प्रथम अनुभव या विषयावर मी लिहिते करण्याचा प्रयत्न केला आणि मला त्यात यशही आले . दि . ७ एप्रिल २०१३ ला मला आलेला या संदर्भातला अनुभव खूप काही शिकवून गेला . नाशिकमधील ' पी and टी कॉलनी महिला मंडळ ' मधील महिलांची मी स्पर्धा घेण्यासाठी गेले असता इतक्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्यात की मीच आश्चर्यचकित झाले . साठ महिलांच्या या भिशीमध्ये त्या दिवशी पस्तीस चाळीस महिला आल्या होत्या . त्या सर्व महिलांना मी आज तुमच्या मंडळात स्पर्धा घेण्यासाठी आले आहे हे सांगताच दोघी तिघी म्हणाल्या , "अहो मॅडम , आतापर्यंत किती स्पर्धा देऊन झाल्यात आता काय आमची स्पर्धा घेतात . " स्पर्धेचे नाव काढताच नन्नाचा पाढा ऐकावा लागला आणि या बायकांना स्पर्धेचा विषय सांगितल्यावर काय ऐकायला मिळेल याचा अंदाज घेतच मी स्पर्धेचा विषय सांगितला आणि सर्वजणी एका तालासुरात ओरडल्या , मासिक पाळीचा पहिला अनुभव ! या विषयावर काय लिहिणार ? पावसाळ्यातील एक दिवस या निबंधाच्या पुढे कधी आमची धाव गेली नाही . काहींनी तर सरळ सांगितले इतक्या वर्षानंतर काय आठवणार . यावर मी सर्वांना ठासून सांगितले , मासिक पाळीचा पहिला अनुभव विसरणे कोणत्याही स्रीला शक्य नाही आणि हे माझे मत तितकेच ठाम आहे . यावर सगळ्याजणी हसल्या आणि म्हणाल्या , तुम्ही म्हणतात ते खरेच आहे . सगळ्यांनी प्रामाणिकपणे कबूल केल्यावर काहीजणी म्हणाल्या , आमच्याकडे कागद , पेन नाही . त्या सगळ्या मैत्रिणींना मी म्हणाले," मी एक स्री आहे आणि मला स्रियांचे सगळे बहाणे ठाऊक आहेत म्हणून मी सर्व तयारीनिशी आले आहे त्यामुळे तुम्हांला कुठलीही पळवाट शोधता येणार नाही ." मी कागद पेन देताच आता लिहिण्याशिवाय पर्याय नाही हे जाणून सगळ्यांनी लिहिण्यास सुरुवात केली . त्या दिवशी अनुराधा धटिंगण वहिणींच्या घरातील दृश्य अगदी बघण्यासारखे होते . तिघी चौघींनी टेबलवर कब्जा केला तर दोघी तिघींनी स्टुल बळकावले तर काहीजणी सोफ्यावरून उठून खाली बसल्यात नि सोफ्यावर कागद ठेवून लिहित होत्या . सोफा बसण्यासाठी नसून लिहिण्यासाठी देखील असतो याची कुणी कल्पना केली असेल का ? काहीजणी सरळ धरती मातेला शरण जाऊन लिहित बसल्या तर काहींनी धटिंगण वहिनींच्या घरातील वह्या पुस्तके घेऊन लिहिण्यात दंग झाल्या . त्यात काहींचे विनोद चालू होते , शाळेत तरी कॉपी करण्याचा चान्स असायचा येथे तर तेही शक्य नाही . त्यात पुन्हा एकमेकींच्या हस्ताक्षरावर टीका टिप्पणी करीत सगळ्या भगिनी मनापासून लिहित होत्या . त्या दिवशी सगळे दृश्यच मन मोहून घेणारे होते . संसाराच्या रगाड्यात दबलेल्या भगिनींचे अवखळ बालपण पाहण्याचा एक अविस्मरणीय क्षण होता तो . स्पर्धेला घाबरणाऱ्या भगिनींनी नंतर मात्र स्पर्धा चांगलीच एन्जॉय केली याचा विशेष आनंद झाला . स्पर्धा संपल्यानंतर सगळ्या भगिनींचे अभिप्राय ऐकून मला खूप आश्चर्य वाटले . काही भगिनी म्हणाल्या , "पस्तीस चाळीस वर्षानंतर पेन हातात धरला आणि बालपणाच्या आठवणीत दंग होऊन गेलोत . " काहीजणी म्हणाल्या ," या विषयावर आम्ही कधी लिहिण्याची कल्पनादेखील केली नाही . " आणि सर्वात महत्वाची प्रतिक्रिया सर्व भगिनींनी अगदी प्रामाणिकपणे सांगितली , "मॅडम , खरं सांगू का तुम्हांला , मासिक पाळीचा पहिला अनुभव आठवला तरी भीती , किळस , खूप काही अपराध केल्यासारखे आणि नको हा स्री जन्म असे खूप काही वाटत असे परंतु आज मात्र आम्ही हा अनुभव लिहून काढल्यावर इतके मोकळे वाटत आहे की आम्ही तुम्हांला सांगू शकत नाही . " आणि त्या दिवसाचा तो क्षण माझ्यासाठी कायमचा एक अमूल्य ठेवा बनून ह्रदयात स्थिरावला . रात्री साडेबारा वाजेपर्यंत मी सर्व भगिनींचे निबंध वाचलेत . काही निबंध वाचताना अंगावर काटे उभे राहिलेत . दुसऱ्या दिवशी ८ एप्रिल २०१३ ला पाडव्याच्या मुहूर्तावर मी पी and टी कॉलनी महिला मंडळाच्या भगिनींना बक्षीस देण्याकरिता पुन्हा बोलावले आणि त्यात सौ . ज्योती भिंगे हिला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले . द्वितीय क्रमांक सुवर्णा काजळे तर तृतीय क्रमांक सौ . संध्या बिरारी यांनी पटकावला . बक्षीस वाटपानंतर बक्षीस देण्यातील पारदर्शकता भगिनींच्या लक्षात यावी म्हणून तिन्ही निबंधातील थोडक्यात सारांश सांगताना माझ्या अंगावर काटे आले होते आणि तेव्हा समोर बसलेल्या भगिनी मागच्या भगिनींना म्हणाल्या , " मॅडमच्या अंगावर बघ कसे काटे आलेत . " भगिनींचे निरिक्षण आणि माझा स्पर्धा घेण्यामागचा उद्देश सफल झाला . चौदाव्या शतकात होऊन गेलेल्या संत जनाबाई म्हणतात , स्री जन्म म्हणूनी न व्हावे उदास. जर सातशे वर्षापूर्वी संत जनाबाई असे म्हणतात तर मग आजच्या आधुनिक युगातील स्रियांनी मी सृजनाची स्वामिनी आहे असे अभिमानाने का म्हणू नये ?
©ज्योत्स्ना पाटील

Comments

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या