माझी सवत - भेंडी
काही भाज्यांशी आपलं नातं जुळता जुळताच राहून जात असतं, असे मला नेहमी वाटत असते आणि असंच एक नातं म्हणजे माझे नि भेंडीच्या भाजीचं नातं होय. आजोळी असताना मला भेंडी आवडायची ती फक्त कच्चीच. आजी, मामी किंवा मावशी भेंडी कापायला लागताच निम्मी भेंडी गायब करण्यात माझा हातखंडा होता त्यामुळे मी घरात नसतानाच आजी, मामी किंवा मावशी भेंडी कापण्याचा कार्यक्रम आटोपून मोकळ्या व्हायच्या, परंतु कधी कधी मीही त्यांच्या या गुपचूपपणे भेंडी कापण्याच्या कार्यक्रमाला शिताफीने उधळून लावीत असे, नि शेवटी कच्च्या भेंडीचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मला चैन पडत नसे. भेंडीची भाजी घरातील सर्व सदस्यांना खाण्यास मिळावी म्हणून आजी, मामी व मावशी आटापिटा करायच्या परंतु त्यांची ती तळमळ माझ्यापर्यंत पोहचतच नसे. कच्च्या भेंडींचा फज्जा उडविणारी मी फोडणी देऊन शिजविलेल्या भेंडीच्या भाजीच्या वाटयाला कधीच जात नसे. असे हे भेंडीच्या भाजीशी असलेले अफलातून नातं मात्र आईकडे गेल्यावर चक्क उलटे झाले. आईकडे गेल्यावर भावंडांबरोबर भेंडीची भाजी खाण्याशिवाय पर्याय नसे. अर्थात आईकडे भेंडीच्या भाजीबरोबर खिचडीही असायची त्यामुळे भेंडीची भाजी पोळीबरोबर न खाता खिचडीतच भाजी मिक्स करून खाण्याची शक्कल मी शोधून काढली. भेंडीच्या भाजीचे खिचडीशी मेतकूट जमविल्यावरच ती माझ्या उदरात गडप व्हायची.
मी मोठया कष्टपूर्वक भेंडीची भाजी खिचडीसोबत खाण्याचा प्रयोग चालू करताच थोडयाच दिवसात या प्रयोगाचेही तीनतेरा वाजलेत आणि भेंडीच्या भाजीला मी कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला कारण त्याला कारणही तसेच घडले.
एके दिवशी आम्ही सर्व मैत्रिणी शाळेत असताना मधल्या सुटीत डबा खाण्यास बसलो असताना एका मैत्रिणीने डबा उघडताच तिच्या डब्यातून भेंडीचे दर्शन झाले आणि त्या भेंडीच्या भाजीने पोळीच्या घासाबरोबरच एकतारी पासून चार - पाच तारी तंबोऱ्याच्या तारांप्रमाणे सूर छेडताच बाजूला बसलेल्या मैत्रिणीने भेंडीच्या भाजीला जी उपमा दिली ती ऐकून भेंडीची भाजी खाण्याची इच्छाच नाहीशी झाली. पंरतु माझ्या इच्छेला न जुमानणारी चिवट भेंडी तिच्या चिवट गुणधर्माला जागून माझा पिच्छा काही सोडायला तयार नव्हती. मी जितकी भेंडीच्या भाजीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत होते तितकी ती अधिकच जिद्दीने माझ्यापुढे येऊन उभी ठाकली तीही माझी सवत बनूनच. माझ्या नवऱ्याने भाजी बाजारातून सर्वात आधी कोणती भाजी घेतली असेल तर ती म्हणजे भेंडी. ज्या भेंडीच्या भाजीशी माझा छत्तीसचा आकडा त्या भेंडीच्या भाजीशी माझ्या नवऱ्याचे चांगलेच सूत जुळलेले. आता आली का पंचाईत? मला नकोशी असलेली भेंडीची भाजी नेमकी माझ्याच नवऱ्याला आवडावी. जगातल्या तमाम बायकांच्या नवऱ्यांना सोडून हिने माझ्याच नवऱ्याला भुरळ घालावी म्हणून मीही चिडून धारदार सुरीने सपासप वार करून तिला चांगल्या कडक तेलात चांगली भाजून काढल्याशिवाय सोडत नाही.
लग्नानंतर आम्ही दोघे जम्मू - काश्मीरला गेलो , तेव्हा माझे मोठे जेठ यादवराव पाटील ( त्यांना आम्ही ' आबा ' म्हणतो ) हे तेथेच राहत होते. ते उधमपूर शहरात राहत होते. एअर फोर्समधील सर्व कर्मचाऱ्यांची वसाहत उधमपूर शहराच्या बाहेर शांत अशा निसर्गरम्य ठिकाणी होती. ते ज्या बिल्डिंगमध्ये राहत होते त्या बिल्डिंगच्या आजूबाजूला प्रत्येकाने छोटयाछोटया वाफ्यांमध्ये भाजीपाला लावला होता आणि माझ्या जाऊबाईंना(विजयाताई) पण शेकडो भाज्यांमधून फक्त भेंडीच वाफ्यामध्ये लावायला सापडावी हे पाहून मी डोक्याला हात लावून घेतला. मी माझ्या जाऊबाईंना म्हणाले,"ताई, आपल्या महाराष्ट्रातून सगळ्या भाज्या काय हद्दपार झाल्या आहेत का? तुम्हांला काय फक्त भेंडीचंच बीज सापडलं का वाफ्यामध्ये लावायला!" "अगं ,प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावायच्या म्हणजे सगळ्यांना सर्व भाज्या खाता येतील मला काय माहिती होते का तुला भेंडीची भाजी आवडत नाही. मला ठाऊक असते तर तुझ्याच आवडीची भाजी लावली असती. काही हरकत नाही आपण वसिष्ठ, शर्मा वहिनींच्या भाज्यांवर डल्ला मारू. तू काही काळजी करू नकोस." माझ्या जाऊबाईंनी जोपर्यंत आम्ही काश्मीरला होतो तोपर्यंत दररोज आमच्या पाटील साहेबांना भेंडीची भाजी मनसोक्तपणे खाऊ घातली. काश्मीरहून निघताना मी पाटील साहेबांना म्हणाले, " वर्षभराची भेंडी खाऊन झाली आहे त्यामुळे आता भेंडी चुकूनही माझ्या स्वयंपाकघरात दिसायला नको." माझ्या भेंडी वैरावर माझे पुतण्या(पराग) व पुतणी(प्रेरणा) दोघेही हसायला लागलीत,"अंकल भेंडी में पहले से ही लेडीज हैं, आपकी तो खैर नहीं." आणि त्याबरोबर सगळेच हसायला लागलेत.
तार न धरणारी कुरकुरीत, खरपूस तळलेली भेंडी खाऊन माझा नवरा चांगला तृप्त होऊन ढेकर देत असतो नि मी मात्र अतृप्त राहून वरण - भात, चटणी, लोणचे यांच्या शोधातच फिरत असते.
माझ्याकडे भेंडी लसूण व हिरवी मिरची घालून होत असते तशीच ती शेंगदाण्याचे कूट (पावडर)घालून मसाल्याचीही भेंडी होते नि ती खास करून माझी बेटी पूर्तीला आवडते तर बेसनपीठ घालून तळलेली कुरकुरीत भेंडी पाटील साहेबांना आवडते तर माझा लेक म्हणजे साने गुरुजींचा अवतार त्याला सगळेच आवडत असते. तसेच वर्ध्याच्या रूद्राकर वहिनी मेसच्या डब्यात कांदा, टोमॅटो घालून भेंडीची भाजी पाठवायच्या त्यामुळे त्यांच्या हातच्या भेंडीची भाजी खाल्ल्यावर कधी कधी कांदा, टोमॅटो घालूनही भेंडीची भाजी करीत असते. ब्राम्हणगावला असताना संगीता, बाईसाहेब, कल्पना या मैत्रिणींच्या डब्यातील भेंडी डाळीचे वडे घालून केलेली असायची त्यामुळे क्वचित कधीतरी वडे घालूनही भेंडीची भाजी करीत असते.
अशाप्रकारे वेगवेगळ्या प्रकारे भेंडीची भाजी करूनही ती मात्र मला खायला फारशी आवडत नाही हेही तितकेच खरे.
©ज्योत्स्ना पाटील
©ज्योत्स्ना पाटील
मॅडम आपला भेंडीच्या भाजी वरील लेख वाचून खूप छान वाटले आज घराघरात लहान मुलांना डब्यात भेंडी च लागते परंतु तुमची व भेंडीची तार कधी जुळली नसती परंतु तुम्ही तुमच्या नवरोजीनची हृदयाची तार छेडली आणि आपोआपच तुमचे तुमच्या सवतीशी जमू लागले असेच खाद्यपदार्थन वरील लिखाण करून आमची वाचनाची भूक भागवत जा पुढील वाटचालीस खूप खूप। शुभेच्छा
ReplyDeleteमनापासून धन्यवाद!
Deleteखूपच छान माझ्या सर्व आठवणींची उजळणी झाली धन्यवाद
ReplyDeleteमनापासून धन्यवाद!
DeleteMast👌
ReplyDeleteखुपच अलंकारीक लिखाण.
Deleteमांडणी ,शैली सुंदरच.
Many many thanks!
DeleteKhupch chan pan bhendi mala hi ni aavdat v mazya gharat papa maze husband ani maza shiv yana khup aavdte pan mala bilkul ni avdat lekh khupch chan ahe
ReplyDeleteManapasun dhanyavad!
ReplyDeleteKhup chan lekh Jyostna tai.. lekh wachu maan bhendi bhendi zale..!! Tumhala na awadnari bhendi mazhyakade khup awadte, Bhendi che ani mazhe naate khup ghatta aahe te mazhya mulimule, tichya bhendi premamule mala kadhi kadhi watate ki bhendichi sheti karawi ki kay..😊
ReplyDeleteKeep it up..
मनापासून प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर!
Delete