स्पर्धा घेण्यामागचा उद्देश 

                              स्रियांची मासिक पाळी या विषयावर स्पर्धा घेण्यामागे माझा मुख्य उद्देश होता की, स्रियांना वर्षानुवर्षे ज्या गोष्टी मनात जाचत असतात त्या गोष्टीतून मोकळे करणे आणि पुरुषांनी या गोष्टीकडे निर्मळ मनाने पाहणे. मासिक पाळीचा पहिला अनुभव बऱ्याच स्रियांचा व मुलींचा हा कष्टप्रदच नव्हे तर मानसिक संतुलन बिघडवणारा देखील असतो. एका मुलीने तर शाळेत पाळी आल्यामुळे मुलांनी चिडवले होते म्हणून शाळाच सोडून दिली होती. एकीने तर आईकडे गर्भपिशवी काढून टाकण्याचाच हट्ट धरला अशा अनेक गोष्टी समाजात घडत असतात पण त्याविषयी समाज अनभिज्ञ असतो तेव्हा समाजाला अशा नाजूक विषयावर सजग करणे हाच खरा या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश होय. बारा-तेरा वर्षाची मुलगी अल्लडपणे खेळत असते, बागडत असते आणि एके दिवशी तिला पाळी आली की, अचानक मोठे केले जाते नि सांगितले जाते."तू आता मुलगी नाही तर स्त्री आहेस." हे ऐकल्यावर तिची होणारी तारांबळ आणि त्यातच पाळीमुळे होणारा शारीरिक त्रास. या सर्वच गोष्टींचा तिला एकाचवेळी सामना करावा लागत असतो. शारीरिक, मानसिक, सामाजिक व कौटुंबिक अशा सगळ्याच आघाडींवर या छोट्याशा जीवाला झगडावे लागत असते. तिची होणारी कुचंबणा एका आईशिवाय कुणालाच कळत नाही. ते कष्टप्रद चार दिवस आई तिला आराम करायला सांगते नि घरातले इतर मात्र तिच्यावर ओरडत असतात,"काय आळशी आहे, नुसतं लोळायला सांगा तिला." आजकाल तर मुलींना स्पर्धेच्या युगात अतिताणामुळे, अभ्यास व प्रवास यामुळे मासिक पाळी अनियमित होऊ लागली याचा परिणाम तिच्या शरीरावर होऊ लागला. कालच्या मुलींपेक्षा आत्ताच्या मुलींना मासिक पाळीचा त्रास अधिक प्रमाणात होऊ लागला आहे. लग्नानंतर तर काही स्रियांचे तर हाल विचारायलाच नको. पाळीच्या चार दिवसात शारीरिक संबंध करायला मिळणार नाही म्हणून बायकोला त्रास देणारेही महाभाग आहेत. त्या चार दिवसात अनेक पुरूष बायकोला काही ना काही निमित्त शोधून भांडण करतात किंवा वेळप्रसंगी मारायला कमी करीत नाहीत तर काही जबरदस्ती करून बायकोवर बलात्कार (या दिवसात केलेला शारीरिक संबंध हा बलात्कार करण्यासारखेच होय) देखील करतात. आज समाज सुशिक्षित झाला असे आम्ही समजतो पण मासिक पाळीविषयी फक्त पंधरा ते वीस टक्केच पुरूष स्रियांच्या मनाला जपताना दिसतात इतर महाभाग मात्र स्त्री म्हणजे भोगवस्तू आहे एवढेच जाणणारे आहेत. मासिक पाळीमुळे मुलींना व स्रियांना मात्र खूप मोठा फायदा झाला आहे आणि त्याबाबतीत पुरुष मात्र कमनशिबीच होत असे मला वाटते. मासिक पाळीमुळे मुलींना व स्रियांना शारीरिक, मानसिक वेदना सहन करण्याची ताकद उपजतच मिळाली असल्यामुळे त्या कोणत्याही प्रसंगाला धैर्याने तोंड देत असतात आणि याउलट पुरुष मात्र लवकरच हार मानून निराश होत असतात. मासिक पाळीमुळे स्त्री मनाने खंबीर व कणखर बनली आणि संसाराचा डोलारा समर्थपणे पेलण्यास सक्षम बनली. आजही शेतकरी कुटुंबात आत्महत्या पुरुषांनीच केल्यात स्रियांनी नव्हे. यावरून लक्षात येऊ शकते, 'स्त्री जन्म म्हणूनी न व्हावे उदास' असे संत जनाबाई म्हणतात ते काही उगीचच नाही. 
 सृजनाची स्वामिनी आहेस तू 
 का लाचार झालीस आज तू? 
 कळी उमलते तुझ्या उदरी 
 ठाव घेशील तू तिचा अंतरी 
 सृजनाची स्वामिनी आहेस तू 
 खडबडूनी जागी हो आज तू
©ज्योत्स्ना पाटील

Comments

  1. योग्य प्रकारे माहिती दिली आहे

    ReplyDelete
  2. Hats off for spreading awareness about periods ..!! We need to speak out about periods without shame as it is nothing but a simple natures law .!

    ReplyDelete
    Replies
    1. Many many thanks! your reply is motivates me.

      Delete

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या