समाधान देणारी पोळी
समाधान देणारी पोळी
२५ जानेवारी ते २९ जानेवारी २०१९, या पाच दिवसात फूड स्टॉल टाकला असता जे अनुभव आलेत ते खूपच उत्साहवर्धक होते. मी फूड स्टॉल टाकला असे सांगताच सर्वांचा एकच प्रश्न,नफा किती झाला? अर्थात फूड स्टॉल टाकण्यामागे अनेक कारणं होती. त्यातील काही कारणांचा उहापोह हा नंतर होईलच पण सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे माझ्या हातचे पदार्थ घरच्या लोकांना व नातलगांना आवडतात तितकेच ते बाहेरच्या लोकांनाही आवडतात का? हे मला खऱ्या अर्थाने अजमावून पाहायचे होते. तसेच वयोमानानुसार आपल्या कामात शिथिलता तर नाही ना आली! हे माझे मलाच अजमावून पाहायचे होते. त्यानंतर मुलांच्या लांब जाण्याने आलेली एक पोकळी आणि या पोकळीला छेदण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपले आवडते काम सतत करीत राहणे पण घरात इनमीन तीन माणसे यांच्यासाठी माझ्या आवडीचे काम म्हणजे वीस-पंचवीस मिनिटात करून पुन्हा मोकळेपण. तीन माणसांना स्वयंपाक करतानाही त्रिकोणी स्वयंपाक करायचा त्यातही चार पाचच भाज्या आवडीच्या मग काय विचारता! अशा या कारणांमुळे फूड स्टॉल टाकून स्वतःला तपासून पाहण्याची नि पुन्हा ताजेतवाने होऊन पाकशास्राला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करण्याची इच्छा तीव्र झाली.
फूड स्टॉलवर इतर पदार्थांबरोबर पुरणपोळी ठेवण्यामागे माझा उद्देश तसा खूपच वेगळा होता. तव्यावरची पुरणपोळी ही खापरावरच्या पोळीपेक्षा (मांडे) चांगली नसावी असाच बऱ्याच जणांचा समज होता पण जेव्हा तव्यावर फुगलेली पोळी पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटले आणि एक पोळी तर खाऊन पाहू या असा विचार करून बऱ्याच जणांनी पोळी घेतली नि खाल्ल्यानंतर मात्र कुणी दोन तर कुणी चार तर कुणी पाच अशा पोळ्या पार्सल करून मागू लागलेत. एका खवय्याने पोळी खाल्ल्यानंतर मला विचारले, "मॅडम, मला ठाण्याला पोळ्या न्यायच्या आहेत चांगल्या राहतील का?" "सर, ही पुरणपोळी चार दिवस जरी बाहेर ठेवली तरी ती जशीच्या तशीच राहते त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका." दुसऱ्या एका खवय्याने तर दमच दिला, "मॅडम, मला पाच पोळ्या उद्या गोरेगावला न्यायच्या आहेत त्यामुळे उद्या आल्याबरोबर माझ्या पाच पोळ्या बाजूला काढून ठेवायच्या आहेत." त्यात दुसऱ्या खवय्याची तर भलतीच तऱ्हा, "मॅडम, उद्या माझा मंगळवार आहे नि मला उपवास सोडण्यासाठी पुरणपोळी हवी आहे." अशी ही गोलमटोल पुरणपोळी सगळ्याच खवय्यांना मनापासून आवडली नि सर्वांनी भरभरून कौतुकही केले. काहींना पुरणपोळी इतकी पातळ कशी काय असू शकते? हाच प्रश्न पडला होता त्यामुळे बरेचजण लांबून पोळी कशी बनवली याचे निरीक्षण करायचे नि मग पोळीचा आस्वाद घ्यायचे.
पैसेवाल्या खवय्यांनी तर पुरणपोळीचा आस्वाद घेतला पण काही लोकांना ते शक्य होतेच असे नव्हे. अशीच एक गरीब शेतकऱ्याची बायको पुरणपोळीकडे एकटक बघत होती नि थोड्या वेळाने जवळ आली नि विचारू लागली,"पोळी कितीला आहे." मी किंमत सांगताच ती पुढे निघून गेली. मीही माझ्या पोळ्या करण्यात गर्क झाली आणि वीस-पंचवीस मिनिटांनी पुन्हा ती स्त्री माझ्या स्टॉलसमोर उभी राहून पोळीकडे एकटक पाहत असताना मी तिला प्लेटमध्ये पोळी दिली आणि सांगितले, "ताई, तुम्हांला जेवढे पैसे देणे शक्य असेल तेवढेच पैसे द्या किंवा नाही दिलेत तरी चालेल." मी असे म्हणताच तिला जो आनंद झाला ते पाहून खूप समाधान वाटले. त्या स्त्रीने पोळी खाल्ली नि जाताना वीस रुपये देत म्हणाली, "ताई, पोळी खूपच चवदार होती." असे म्हणत ती हसतच निघून गेली. त्यानंतर एक म्हाताऱ्या आजीबाई आल्यात आणि पोळीला पाहून पोळी खाण्याची इच्छा झाली. त्यांनाही पोळीची किंमत जास्त वाटताच मी सांगितले, "तुम्हांला जेवढे पैसे देणे शक्य असेल तेवढेच द्या." मी असे म्हणताच आजी खूश झाल्यात नि पोळी खाल्ल्यानंतर दोन पोळ्या पार्सल घेऊन गेल्यात नि साठ रुपये देत म्हणाल्या, "छान चव आहे तुमच्या हाताला." असे म्हणत हसतच तेथून निघून गेल्यात.

सुगरण सखी...
ReplyDeleteआम्हाला कधी खावू घालणार..?
छान लिहिले आहे..
धन्यवाद सखी, केव्हाही येऊ शकतेस खायला.
DeletePuranpoli jevhadhi chhan tevhadach lekh suddha chhan
ReplyDeleteमनापासून धन्यवाद!
DeleteToo good👌 yummy Puran Poli😋
ReplyDelete