अडेलतट्टू टोमॅटो ऑम्लेट
अडेलतट्टू टोमॅटो ऑम्लेट
वयाच्या एकोणिसाव्या वर्षी लग्न झाले आणि लग्नानंतर स्वयंपाक करणे भाग पडले. अर्थात तोपर्यंत स्वयंपाक म्हणजे आईने करायचा नि आम्ही गरमागरम स्वयंपाकावर ताव मारायचा हाच काय तो माझा नि स्वयंपाकाचा संबंध (तीन - चार वेळा तुटक संबंध सोडून) लग्नानंतर सासरच्या माणसांशी जुळवून घेता घेताच स्वयंपाकाशी जुळवून घेण्याची कसरत पार पाडणे भाग पडले. आहारशास्राचा अभ्यास करताना माणसांच्या स्वभावाच्या विविध पैलूंचाही अभ्यास करण्याची संधीही आपोआप उपलब्ध होत गेली.
लग्नानंतर पाटील साहेबांबरोबर नोकरीच्या ठिकाणी म्हणजेच मनमाडला गेले आणि संसाराची जबाबदारी अंगावर पडली आणि खऱ्या अर्थाने जगण्याला प्रारंभ झाला. त्यातच पाटील साहेबांचे मित्र घरी येताच होणारी त्रेधातिरपिट तर विचारायलाच नको. माझ्या बिघडलेल्या पाककृतींचे खरे साक्षीदार कवडे भावोजी आणि सुजय दोडल साहेब हे दोघे होत.
एके दिवशी (१९८९ साली) मी सकाळी नाश्त्यासाठी टोमॅटो ऑम्लेट करण्याचे ठरविले आणि त्यानुसार तयारी करण्यास सुरवात करण्याचा प्रयत्न करू लागले कारण टोमॅटो ऑम्लेटचा आणि माझा त्यापूर्वी दुरान्वयानेही संबंध आलेला नव्हता. त्याची नि माझी तोंडओळख जर कुठे झाली असेल तर ती फक्त एका हॉटेलच्या मेन्यूकार्डवर. मेन्यूकार्डवरचे टोमॅटो ऑम्लेट हे नाव मला चांगलेच राहून राहून खुणावत होते नि त्यामुळे या नावाचा काहीतरी सोक्षमोक्ष एकदाचा लावलाच पाहिजे, या निश्चयानेच मी टोमॅटो ऑम्लेटची गाठ घेण्याचे ठरविले. एकदाचे पाच - सहा लाल लाल टोमॅटोंना मिक्सरच्या स्वाधीन करताच माझेही रक्त चांगलेच खवळलेले होते. माझे खवळलेले लाल रक्त आणि टोमॅटोच्या लाल प्युरीचे सूत कितपत जमेल अशा साशंक मनानेच मी टोमॅटो प्युरीमध्ये हिरवी मिरची, कांदा, लसूण, आलं, हळद, मीठ, कोथिंबीर आणि बेसनपीठ टाकून पुन्हा मिक्सर फिरविले. मिक्सरने सर्व पदार्थांना चांगलेच एकजीव केले. आता मात्र निर्लेपच्या तव्याची सुविधा उपलब्ध असल्यामुळे अनेक पदार्थ करणे सुकर झाले आहे, पंरतु त्यावेळी मी लोखंडी तव्यावर टोमॅटो ऑम्लेट करण्यास घेताच सर्व मिश्रण एकाच जागी अडेलतट्टूपणे बसून राहिले. ते मिश्रण काही केल्या हलण्याचे नाव घेत नव्हते. मी ते तव्यावरचे टोमॅटो ऑम्लेटचे मिश्रण काढण्यात दंग असतानाच पाटील साहेबांचे उदगार कानी पडलेत, "दोडल साहेब, तुम्ही अगदी वेळेवर आलात! आता नाश्ता करायला मजा येईल." बाप रे! पाटील साहेबांच्या उदगारांनी तर माझी चांगलीच घाबरगुंडी उडाली. आता टोमॅटो ऑम्लेटचा नाद सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. सदा तत्पर असणाऱ्या साध्या, सोप्या पोह्यांना पाचारण करण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून मी टोमॅटो ऑम्लेटचे मिश्रण बाजूला ठेवून झटकेपट पोहे बनवलेत नि त्यांना दोघांना पोह्यांच्या डिश देताच पाटील साहेब पोह्यांची डिश घेतच म्हणाले, "तुझे टोमॅटो ऑम्लेट कुठे गायब झाले?"मला मात्र चांगलेच हसू आले. हसतच सांगितले, माझे टोमॅटो ऑम्लेट तव्यावरच रूसून बसले." "तुझे रूसलेले टोमॅटो ऑम्लेट आम्हांला पाहू तर दे कसे आहे!" असे म्हणतच पाटील साहेबांनी तव्यावरचे आकारविहीन असलेले टोमॅटो ऑम्लेट स्वतःच्या प्लेटमध्ये घेतले आणि दोडल साहेबांना त्यातला अर्धा भाग काढून दिला. दोडल साहेबांनी ऑम्लेटचा एक घास खाताच म्हणाले, " वहिनी ऑम्लेटची टेस्ट छान आहे. अजून बनवा." ऑम्लेट बनवण्याचा हुरूप लयाला गेला असताना दोडल साहेबांच्या फर्माईशने तो हुरूप पुन्हा अंगात संचारण्याशिवाय पर्यायच नव्हता. दोन - तीन ऑम्लेट बनविल्यावर लक्षात आले की मिश्रण थोडे पातळ करायला हवे. येथे अतिरिक्त पडलेल्या बेसनापीठाने चांगलीच करामत दाखविली होती. मिश्रणात थोडे पाणी घालताच गोल आकाराचे ऑम्लेट तयार झाले नि पाटील साहेबांनी व दोडल साहेबांनी दोघांनी बिघडलेल्या टोमॅटो ऑम्लेटवर चांगलाच ताव मारला.
माझ्या बिघडलेल्या पदार्थाला नावे न ठेवता त्याची प्रशंसा करून चांगले टोमॅटो ऑम्लेट बनविण्यास उदयुक्त करणाऱ्या दोडल साहेबांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत आणि कोणताही आडपडदा न ठेवता आम्ही जसे आहोत तसे , अशी वृत्ती असणाऱ्या पाटील साहेबांचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या दोघांमुळे त्या दिवसाचे टोमॅटो ऑम्लेट कायमचेच स्मरणात राहिले आणि त्यानंतर अनेक प्रकारे टोमॅटो ऑम्लेट करून खाल्ले नि अनेकांना खाऊही घातले.
कधी बेसनपीठात तांदळाचे पीठ घालून केलेले टोमॅटो ऑम्लेट, कधी बेसनपीठात कॉर्नफ्लॉवर तर कधी मक्याचे पीठ तर कधी थोडासा मैदा मिक्स करून तर कधी डोशांच्या पिठात टोमॅटो प्युरी टाकून केलेल्या ऑम्लेटला धिरडे म्हणा किंवा डोसा म्हणा चव मात्र त्याची अप्रतिमच होय. शेवटी एकदाचं माझं व टोमॅटो ऑम्लेटचे मेतकूट जमलं ते कायमचेच.
आता मात्र या टोमॅटो ऑम्लेटचेही पूर्णपणे ग्लोबलायझेशन झाले आहे. त्याच्यात कोणकोणत्या भाज्यांची सरमिसळ होईल ते सांगणे कठीण आहे. कधी या टोमॅटो ऑम्लेटची गट्टी पालकाच्या भाजीशी होऊन त्याचे मूळचे लाल रूपडे चक्क हिरवा रंग धारण करतेतर याउलट बिटाशी दोस्ती झाली तर मग विचारायलाच नको त्याच्या रंगरूपाविषयी! अनेक चवी आणि अनेक रंगरूप घेऊन टोमॅटो ऑम्लेट नाश्त्यासाठी तयार असते तेही आरोग्याशी बांधील राहून.
Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.