सर्व रसिक वाचकांना,
सप्रेम नमस्कार. 
काल झालेल्या आतंकवादी हमल्याने संपूर्ण देशच दुःखाच्या खाईत लोटला गेला. खरंच माणसाचं जीवन इतके कवडीमोल आहे का की, कुणीही, केव्हाही, कुणालाही या जगातून उठवून टाकावे! जागतिकीकरणाचे परिणाम सर्वांनाच कशा ना कशाप्रकारे भोगावे लागत आहेत. दोन-तीन वर्षांपूर्वी मी 'जागतिकीकरण आणि खाद्यसंस्कृती' हा लेख लिहिला आणि हा लेख माझ्या 'अंतरंग सुगरणींची खवय्येगिरी सर्वांची' या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आणि पुन्हा 'आतंकवाद' या शब्दाने चीड, घृणा तर निर्माण केलीच त्याचबरोबर मनाला जी वेदना झाली ती शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. माझ्या देशासाठी शहीद झालेल्या देशबांधवांना आक्रंदणाऱ्या मनाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याशिवाय काहीच करू शकत नाही. शहीद झालेल्या बांधवांचे कुटुंब डोळ्यांसमोर येऊन मनात खूपच कालवाकालव होते आणि प्रश्न पडतो की माणूस खरंच सुसंस्कृत झाला का? तर उत्तर नाही असेच द्यावे लागेल कारण माणसातला राक्षस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आतंकवादी या भूतलावर राहणार हे निर्विवाद सत्य स्विकारण्याशिवाय तरणोपाय नाही, हेच खरे. 
 
       जागतिकीकरण आणि खाद्यसंस्कृती 

           ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण, उदारीकरण अशा मोठमोठ्या शब्दांनी जगातील विचारवंतांना, शास्त्रज्ञांना, तत्वचिंतकांना, अर्थतज्ज्ञांना गोंधळात पाडले तेथे सर्वसाधारण गृहिणींची काय अवस्था असेल! याविषयी तर विचारायलाच नको. जागतिकीकरणाचा परिणाम शेअर मार्केट व रुपयावर ज्या प्रमाणात होतो त्याच्या कितीतरी पटीने अधिक परिणाम व्यक्तीच्या जिभेच्या चोचल्यांवर होतो असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. यावरूनच आजच्या गृहिणींची खरी समस्या लक्षात घेऊनच सर्व प्रसार माध्यमे गृहिणींच्या सेवेला सदा तत्पर आहेत. प्रकाशन संस्थांनी पाककलेच्या पुस्तकांचा रतीब सुरू केला तर याउलट नियतकालिके, साप्ताहिके व मासिके यांनी पाककृतींच्या झणझणीत फोडणींनी वाचकांची रुची वाढविण्याचा प्रयत्न केला. टी. व्ही. वरील प्रत्येक चॅनेलने कुकरी शो ला मानाचे पान (स्थान) बहाल केले आहे, त्यातच आनंदाची बाब म्हणजे नागरिकांची काळजी घेणारे विविध राजकीय पक्षाचे नेते व त्यांचे कार्यकर्ते यांना देखील पाककलेचे महत्त्व पटले आहे. पक्षाला गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत नेण्याचा मार्ग हा शेवटी नागरिकांच्या पोटातूनच जातो हे आमच्या कुशल नेत्यांनी ओळखले असल्यामुळेच वर्षभर विविध प्रकारचे फेस्टिव्हल्स आयोजित करून नामांकीत शेफ लोकांना पाचारण करण्यात येत असते. जेणेकरून जागतिकीकरणाच्या रगाड्यात सामान्य गृहिणींची जागतिक पाककलेची कॉन्टीनेन्टल फूड याविषयीची रूची अधिकाधिक वाढावी हाच त्यामागील हेतू होय. शेवटी पन्नास टक्के शक्ती असणाऱ्या स्त्री वर्गाचा विचार करणे सर्वांनाच भाग पडत आहे. आकाशवाणीच्या मनोरंजनाबरोबर रुचिपालट म्हणून पाककृती सादर होतात त्याचप्रमाणे सर्वांनाच रुचिपालट म्हणून पाककलेला महत्त्वाचे स्थान देणे भाग पडले आहे.  
           जागतिकीकरणाचा यशाचा आलेख स्पर्धेच्या माध्यमातून जसा उंचावत आहे त्याचप्रमाणे पाककलेचा आलेखही स्पर्धेच्या माध्यमातून उंचावत आहे. आजच्या सामान्य गृहिणीला जागतिक स्पर्धेला तोंड देण्याशिवाय पर्याय उरला नाही. आजच्या गृहिणीला महाराष्ट्रीयन पुरणपोळीबरोबर राजस्थानी दालबाटी, गुजराती खमण ढोकळा, पंजाबी छोले भटुरे, साऊथ इंडियन इडली, डोसा काश्मिरी बिर्याणीबरोबरच चायनीज फूड, थाई फूड, इटालियन फूड असे जगभरातले सर्व प्रकारच्या खाद्यसंस्कृतीला पाचारण करण्याशिवाय पर्याय उरला नाही. 
            जागतिकीकरणाचे वारे सर्वत्र वाहू लागले आणि हे वारे आमच्या स्वयंपाक घरात आले नसते तरच नवल. जागतिकीकरणाने आमच्या स्वयंपाक घराचा चेहरामोहरा तर बदललाच शिवाय घरातील प्रत्येकाच्या रूचीतही बदल घडवून आणला हे सांगायलाच नको.         आज प्रत्येकाच्या घरात विविध प्रकारच्या खाद्यसंस्कृती गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. या विविध प्रकारच्या खाद्यसंस्कृतीने,
              'हे विश्वचि माझे घर' 
               हे संत ज्ञानेश्वरांचे बोल सार्थ करून दाखविले. अपवाद फक्त जगभरातल्या आतंकवाद्यांचा. या  जगभरातल्या आतंकवाद्यांवर या जागतिक खाद्यसंस्कृतीचा कोणताही परिणाम होत नाही त्यामुळे खाल्ल्या अन्नाला जागण्याचा प्रश्नच उदभवत नाही, हेही तितकेच खरे. जागतिकीकरणाचे फायदे-तोटे सर्वच क्षेत्रांना भोगावे लागत आहेत त्याला खाद्यसंस्कृतीही अपवाद नाही.                   

Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या