अमराठी भाषिकांचे प्रयत्न
मी ब्लॉग लिहायला सुरवात केली नि बेटीने तंबी दिली,"तुझ्या ब्लॉगमुळे मला किती डोकेदुखी होते माहीत आहे का तुला!" अरे वा! ब्लॉग मी लिहते त्यात तुला त्रास व्हायचे काही कारण नाही. तितक्यात बेटी लटक्या रागाने म्हणते कशी, कुठून मला बुद्धी सुचली नि तुझी ब्लॉगची लिंक मित्रमैत्रिणींना पाठवली गेली. सगळे मला विचारतात, पूर्ती इसका मिनिंग क्या हैं, उसका मिनिंग क्या हैं। आता मी माझं कामधाम सोडून काय ट्रान्सलेटरचंच काम करू का? तो निशांत, अपूर्वा ओरडतात, पूर्ती,आँटी को हिंदी भाषा में ब्लॉग लिखने को बोल." बेटीचे माझ्या ब्लॉगवरील शेरे खरेच होते याचे
प्रत्यंत्तर लवकरच आले.
२९ डिसेंबर २०१८ या दिवशी माझी लेक पूर्तीच्या विवाहानिमित्ताने तिचे मित्रमैत्रिणी आले होते. पूर्तीने तिच्या  मित्रमैत्रिणींची ओळख करून दिली असता तिने एका मित्राकडे निर्देश करीत सांगितले, "आई, हा सिद्धार्थ धामा आणि त्याची नियोजित वधू रीना कटारिया दोघेही दिल्लीहून आलेत. आम्ही तिघे काँग्निझंट कंपनीत बरोबर होतो. आता त्याची स्वतःची कन्सल्टन्सी आहे." तितक्यात सिद्धार्थने,"नमस्ते आँटी, मैं आपका ब्लॉग पढता हुँ।" त्याने असे म्हणताच मी त्याला विचारले,"अरे वा! तुला मराठी येते." तितक्यात माझे बोलणे मध्येच तोडत तो म्हणाला,"आँटी, मुझे मराठी नहीं आती लेकीन आपका ब्लॉग पढ़के सिखने की कोशीश कर रहा हुँ। हिंदी भाषा और मराठी भाषा के अल्फाबेटस् सेम हैं इसलिए पढ़ने में दिक्कत नहीं आती, समझनें में दिक्कत आती हैं तब मैं पूर्ती का और दुसरे दोस्तों का दिमाग खाता हुँ।" त्याच्या वक्तव्यावर सर्वच हसायला लागलेत नि पूर्तीने त्याला लागलीच दम दिला,"आगे से मेरा दिमाग बिलकूल नहीं खाना।" त्यानंतर सगळ्यांचे मराठी व हिंदी भाषेविषयी चर्चा चालू असताना मी लेकीच्या लग्नाच्या गडबडीत व्यस्त होऊन गेले नि सिद्धार्थचे मराठी भाषा शिकण्याचे कौतुकही वाटले.
           सिद्धार्थच्या वक्तव्याने मला लग्नाच्या गडबडीतही तिरूअनंतपूरमला भेटलेली मराठी बोलणारी तमिळी स्त्री आठवली, केरळचा मराठी बोलणारा केरळी सुभेर आठवला आणि सिद्धार्थप्रमाणेच मराठी शब्द 'नमस्कार' शिकण्याची धडपड करणारा गोव्याच्या कोलवा बीचवर भेटलेला परदेशी पर्यटक आठवला नि विचारांची झेप कशी, कुठे नि केव्हा घेतली जाईल हे मानवी आकलना पलिकडचे होय.
       आज जागतिक मराठी भाषा दिन साजरा करताना मनाला एक समाधान आहे की इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेले अभिषेक मराठे, सायली खैरनार, दीप्तेश ठाकरे यांंच्यासारखे अनेक विद्यार्थी मराठी ब्लॉग वाचू लागलेत.
         दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कन्नड महिला श्रीलता सुरेशराव यांनीही मला सांगितले की, "मैं आपका मराठी ब्लॉग पढ़ती हुँ। थोडा बहुत समझ में आता हैं।"
          आज पुस्तक प्रत्येक वाचकांपर्यंत पोहचू शकत नाही पण ब्लॉगवर अनेकांना वाचण्याची संधी उपलब्ध होत आहे नि त्यातही अमराठी वाचक मराठी वाचण्याचा व शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत हे पाहिल्यावर ब्लॉग लिहिण्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले.
अलाहाबादचा हिंदी भाषिक सिद्धार्थ धामा रीना कटारिया चि.पूर्ती व चि. कुणाल सोबत

जागतिक मराठी दिनाच्या सर्व मराठी बोलणाऱ्या, वाचणाऱ्या रसिकांना हार्दिक शुभेच्छा

Comments

  1. The way you described all your experience is commendable. Hatsoff to you!

    ReplyDelete

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या