हेल्दी ड्रायव्हिंग
१४ फेब्रुवारी २०१९ ला मी एका कार्यक्रमासाठी धुळ्याला गेले होते. एक तासात कार्यक्रम आटोपून मी तीन वाजता धुळे बस स्टॅन्डवर आले तर बसमधील शेवटची सीट भरली गेली नि तिकीट काउंटरवरच्या महिला वाहकने दहा मिनिटांसाठी तिकीट काउंटर बंद केले. दहा मिनिटे रांगेत उभे राहिल्यानंतर पुन्हा तिकीट काउंटर उघडले नि तिकीट घेऊन मी गाडीत जाऊन बसले. साडे तीन वाजता आमची बस नाशिकच्या दिशेने निघाली. बसने पाच वाजता चांदवड सोडले आणि आमची बस ठराविक वेगाने चालली असता अचानक एक बस मागून आली आणि आमच्या बसला ओव्हरटेक करीत असतानाच आमच्या बसमधील चालकाने ओव्हरटेक करणाऱ्या बस चालकाला शिटी वाजून आणि हाताने इशारा करीतच सांगितले, "तू मला ओव्हरटेक करून जाऊ शकत नाही. माझीच बस पुढे राहील." अर्थात ते दोघे चालक एकमेकांना चांगले ओळखत होते, हे त्यांच्या इशाऱ्यावरून नि बोलण्यावरून कळत होते. मागून पुढे जाणाऱ्या बसला मागे टाकण्यासाठी आमच्या बस चालकाने स्टिअरिंग अशा काही सफाईने फिरवली नि एक्सलेटर देत गाडीचा वेगही वाढवला. गाडीला वेगाने चालवीत नि मागे वळून हसतच मागे राहणाऱ्या बस चालकाला बाय केले. स्वतःची बस मुद्दामहून मागे ठेवून आणि आपल्या बरोबरच्या चालक बंधूला पुढे जाऊ देणाऱ्या त्या चालकाचे मला खूप कौतुक वाटले कारण त्या चालकाने पुढे जाणाऱ्या चालकाला इतके छान खळखळून स्माईल दिले की ते स्माईल म्हणजे 'हेल्दी ड्रायव्हिंगचा' उत्तम नमुना होता.
रस्त्यावर ड्रायव्हिंग म्हणजे एक स्पर्धा समजून गाडी चालवणाऱ्या चालकांना 'हेल्दी ड्रायव्हिंग' म्हणजे काय असते हे त्या चालकाकडून खरोखरच शिकण्यासारखे होय. याची जाणीव झाली. त्या चालकाचे स्माईल आणि 'हेल्दी ड्रायव्हिंग' चा संदेश नेहमीच स्मरणात राहील आणि रस्त्यावर गाडी चालवणाऱ्या चालकांनी रस्ता म्हणजे स्पर्धेचे ठिकाण नसून आपला प्रवास सुखकर करणारा मार्ग होय. हे लक्षात ठेवले तर बरेचसे अपघात टळून सर्वांचाच प्रवास सुखकर होईल.
योगायोग असा की, मी माझ्या कार्यक्रमात आजचे तरुण गाडी चालवताना किती बेफिकीर असतात नि त्यामुळे कसे अपघात होतात याच विषयावर बोलले नि त्याच दिवशी मला 'हेल्दी ड्रायव्हिंग' चा अनुभव आला हाही एक योगायोगच!
Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.