fort of raigarh (raigad)
महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान - किल्ले रायगड
काल १९ फेब्रुवारी, सगळ्यांनी शिवजयंती धुमधडाक्यात साजरी केली. सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहून मन प्रफुल्लित होत होते. सगळे नाशिकच शिवमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र नेहमीच प्रगतीपथावर राहो हीच प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाची इच्छा आहे. शिवाजी महाराजांचा एक जरी गुण प्रत्येकाने अंगी बाणवायचे ठरवले तरी जीवनाचे सार्थक झाल्यासारखे होय. अशीच एक आठवण रायगडाविषयी.
केरळला जात असताना पहिला मुक्काम अलिबागला केला आणि दुसऱ्या दिवशी अलिबागहून निघताना प्रथम रायगडाला भेट द्यायचे ठरले . संध्याकाळी पाचाडला पोहचलो आणि रायगडाच्या पायथ्याशी आल्यावर वरती किल्ल्याकडे नजर टाकताच मन भूतकाळात केव्हा गेले ते कळलेच नाही .चौथीत असताना कमलबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे केलेले वर्णन आठवले आणि बाईंनी ज्याप्रमाणे सव्वातीनशे वर्षाचा काळ आमच्या समोर उभा केला होता तोच काळ आज पुन्हा डोळ्यासमोर उभा राहिला होता फक्त सव्वातीनशे ऐवजी साडेतीनशे वर्षे मागे जाऊन इतिहासाची पुनरावृत्ती कल्पनेने चितारताना अंगावर रोमांच उभे राहिलेत तर प्रत्यक्षातला तो सोहळा कसा असेल , शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर पाय ठेवताना ज्या भावना मनात दाटल्यात त्यांना शब्दात बंदिस्त करणे शक्यच नाही . त्यासाठी स्वानुभवच महत्वाचा आणि ज्याने जसे महाराजांना जाणले तसे त्याला त्या भूमीवर गवसत असते . कुणाला त्यांच्या देशभक्तीचे , राष्टभक्तीचे मोल कळते , कुणाला त्यांची कार्यावरील निष्ठा आवडते , कुणाला त्यांची त्यागी व्रुत्ती भावते , कुणाला त्यांची दूरद्रुष्टी जाणवते , कुणाला त्यांचा मुत्सद्दीपणा वेडावून टाकतो , कुणाला त्यांचे साहस , धैर्य यांचे कौतुक वाटते तर कुणाला त्यांची न्याय प्रियता मोहीत करते तर कुणाला त्यांची विजुगीषी व्रुत्ती खुणावते . माणसातलं माणूसपण आणि देवातलं देवत्व यांचा समसमा संयोग असलेली असामान्य व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज . अशा या असामान्य व्यक्तित्वाचे वेगवेगळे पैलू फक्त मराठी माणसालाच वेड लावतात असे नव्हे तर सबंध जगाला त्यांनी वेडं केलं . तेथे माझ्यासारख्या पामराची काय कथा .
वेळेअभावी रायगडावर पायी जाणे शक्य नव्हते म्हणून आम्ही रोप वे ने गेलो आणि वरती माथ्यावर गेल्यावर सभोवारचा नजारा पाहिल्यावर लक्षात येते की महाराजांनी राजधानीसाठी रायगडाची निवड का केली . रायगडावरील किल्ल्याची भक्कम तटबंदी महाराजांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे दर्शन घडविते , टेहळणी बुरूज महाराजांच्या दूरद्रुष्टीची साक्ष देतात , प्रत्येक दरवाजा भारदस्ततेची जाणीव करून आल्या गेल्यांचे औदार्यपूर्वक स्वागत करीत असतात . हिरकणी बुरूज मातेच्या विराट प्रेमाची महती सांगत असतो , तेथील पाण्याचे नियोजन जगण्याचा स्त्रोत उलगडत जाते . तेथील भाजी बाजार व बाजारपेठ जमिनीपासून ठराविक उंचीवर बांधून शेती व व्यापार हे प्रगतीचे द्योतक होत हे दर्शविते . गडावरील टकमक कडा हे समाजातील वाईटाचा निःपात करणारे होय . जगदीश्वराचे मंदिर भक्तीचा जागर करणारे होय . रायगडावर हत्ती तलाव पाहून हत्ती रायगडावर कसे पोहचलेत असा प्रश्न दीडशे वर्षे आमच्यावर राज्य करणाऱ्या इंग्रजांनाही पडला तेव्हा महाराजांच्या बुद्धीमत्तेला दाद द्यावीशी वाटते आणि कोणतीही गोष्ट अशक्य नाही , अशक्य गोष्टही शक्य करणारा असा हा आमचा ' जाणता राजा ." हत्तीच्या लहान पिलांना पालखीने गडावर नेऊन त्यांची उत्तम व्यवस्था ठेवून गडावर दखील हत्तींचा वावर असलेला पाहून सर्वच चकीत व्हायचे . सर्व राण्यांचे निवास स्थान , अष्टप्रधान मंडळातील सदस्याचे निवास स्थान , इतर कर्मचाऱ्यांचे निवास स्थान , गुप्त खलबत करण्यासाठी विशेष जागा आणि दरबारात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महाराजांचे बोल अगदी स्पष्टपणे ऐकायला जाईल अशी ध्वनीक्षेपण व्यवस्था . शत्रुने किल्ल्याला वेढा दिला तर सर्व प्रजेला वर्ष भर अन्नधान्य पुरेल अशी अन्नधान्याची कोठारे . किल्ल्यात अशा सर्व बाबींचा विचार करण्यात आलेला पाहून साडेतीनशे वर्षापूर्वीचे वास्तुविशारद हिरोजी इंदुळकर यांनी किल्ल्याचे बांधकाम करताना सर्व बारीकसारीक बाबींचा विचार केला होता . किल्ल्यासाठी लागणारा दगड हा गडावर खोदण्यात आलेल्या अकरा तलावातील खोदून काढलेला दगड वापरण्यात आला आणि पाणी अडवा , पाणी जिरवा हे तंत्रही अंमलात आणण्याचा प्रयत्न केला . दगडाचे बांधकाम करताना वापरण्यात आलेल्या चुन्यामध्ये शिसे , गूळ व उडदाच्या डाळीचे पीठ यांचे मिश्रण करून बांधकाम केले आणि आजही ते भक्कम स्थितीत आहे . हा किल्ला बाधण्यासाठी चौदा वर्षे लागलीत आणि पैशांअभावी या गडाचे काम पूर्ण करणे शक्य नव्हते तेव्हा हिरोजीने स्वतःचे घरदार विकून किल्ल्याचे काम पूर्ण केले . शिवाजी महाराजांनी जेव्हा हिरोजीला विचारले , " तुला काय पाहिजे ते माग , वतन , जहागिर , मोहरा . '' त्यावर हिरोजी म्हणाला , " महाराज मला काहीच नको , फक्त जगदीश्वराच्या पहिल्या पायरीवर माझे नाव लिहिले जावे म्हणजे तुमच्या पायांची धूळ माझ्या मस्तकी
लागेल . '' इतका प्रचंड त्याग करणाऱ्या देशभक्तांच्या जीवावर महाराज झोकून देऊन काम करीत होते . त्यांचा एक एक मावळा म्हणजे अस्सल हिरा होता .
रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचे श्रेय खरे तर महात्मा फुले यांचे होय . तसेच गडावर वाघ्या कुत्र्याची समाधी बांधून काही महाभागांनी जातीयतेचे गलिच्छ राजकारण करून महाराजांना कमीपणा आणून खोटा इतिहास रचण्याचे महापातक केले आहे . अशा या जाणत्या राजाला आजही जाणून घ्यायची क्षमता आमच्यात आलेली नाही म्हणून एवढेच म्हणावेसे वाटते , शिवबा तुमच्या नावाचा नुसता उच्चार जरी केला तरी एक अनामिक शक्ती नसानसातून दौडत जाते आणि जगण्याचं बळ देऊन जाते . तुम्हांला प्रत्येक मराठी माणूस मानाचा मुजरा करतो ते तुमच्या अतुलनीय नेतृत्वाला । जय शिवाजी , जय महाराष्ट्र ।
Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.