आठवणीतील केशभूषा - अंबाडा
आठवणीतील केशभूषा - अंबाडा
१९८९ साली आम्ही उधमपूरला माझ्या मोठ्या जेठकडे (त्यांना आम्ही आबा म्हणतो) गेलो असता तेथून आम्ही वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलो. आमच्यासोबत माझे मोठे जेठ व जाऊही होते. आम्ही संध्याकाळी पाच वाजता कटरा येथून वैष्णोदेवीचा पर्वत चढण्यास सुरुवात केली. जून महिन्यातील निरभ्र अशा वातावरणात आम्ही पर्वत चढत असताना देशभरातील पर्यटक आमच्यासोबत चालत होते. लहान मुलांपासून ते ऐंशी वर्षे वयाच्या वृद्धापर्यंत सर्वचजण एकाच उद्देशाने पर्वत चढत होते ते केवळ वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी. कुणी पायी चालत होते तर कुणी घोडयावर बसून तर कुणी पालखीत बसून तर कुणी पाठीशी लहान मुलांना घेत प्रवास करीत होते. पायी चालणारे स्वतःला चालता येत होते म्हणून नशीबवान समजत होते तर घोडयावर बसणाऱ्यांना वाटत होते जणूकाही आपण एखादे शूरवीर तर नाही ना! याउलट पालखीतून आरामात जाणाऱ्या भाविकांना वाटत होते, आमचे पाय साथ देत नाहीत म्हणून काय झाले पैशाच्या जोरावर आम्ही चौघांच्या खांद्यावरुन तर जात आहोत ना! त्यातच लहान मुलांची तऱ्हा मात्र या सर्वांहून वेगळी. नेहमी आई बाबांच्या कडेवर बसून टकामका पाहणारी ती मुले बिच्चारी कुणातरी अनोळखी माणसाच्या पाठीला चिकटून बसत पर्वत चढत होती . मधेच भोकांड पसरून आईकडे नाहीतर बाबाकडे झेप घ्यायचे परंतू आईबाबा मात्र काकांच्या पाठीवर शांत बैस, त्रास देऊ नकोस अशा सूचना देत किंवा चॉकलेट, बिस्कीट देऊन गप्प करीत . मिठू (पैसे घेऊन मुलांना पाठीवर घेऊन पर्वत चढण्याचा व्यवसाय करणाऱ्या काश्मिरी बांधवांना 'मिठू' म्हणतात.) ला त्रास देऊ नकोस असे सांगत होते. एखादे बोलघेवडे पोरगं मात्र मिठूला अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडत होते तर एखादं मूल आईच किंवा बाबाच पाहिजेचा हट्ट करायचे तेव्हा त्याला त्याचे आईवडील वेगवेगळ्याप्रकारे धाक दाखवून गप्प करीत होते. ज्यांच्यासोबत मुले नव्हती ते मनाशी म्हणत असतील, "बरे झाले, आपण मुलांना सोबत नाही आणले तेच ठीक झाले." आम्ही आमच्या पुतण्याला व पुतणीला वैष्णोदेवीला आमच्यासोबत यायला सांगताच ते म्हणाले, "नको, तुम्ही सगळेजण जा. आम्ही शेजारच्या वसिष्ठ काका काकूंकडे थांबणार." ते आमच्यासोबत का आले नाहीत ते आम्हांला वैष्णोदेवीचा पर्वत चढताना लक्षात आले कारण ते यापूर्वी तीनदा वैष्णोदेवीला जाऊन आले होते त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत न येता वसिष्ठ काकांकडेच राहण्याचा निर्णय घेतला . अशा या वेगवेगळ्या जाती, धर्माच्या व वयोगटातल्या माणसांच्या वेगवेगळ्या तऱ्हा न्याहाळत आम्ही वैष्णोदेवीचा पर्वत चढत असताना माझे व माझ्या जावेचे लक्ष मात्र स्रियांच्या केशभूषेकडे व वेशभूषेकडे हमखास जात होते आणि आम्ही त्यावर भरपूर संशोधनही करीत होतो. त्यातच आमच्यासोबत चालणाऱ्या दहा बारा पंजाबी बायकांमध्ये एका स्रीचा अंबाडा आम्हांला खूप आवडला. आम्ही दोघींनी ठरविले की, आपण त्या स्रीला विचारायचेच की तिने अंबाडा कशापद्धतीने घातला? आम्ही पाच सहा की. मी. अंतर चालून गेल्यावर थोडीशी विश्रांती घेण्यासाठी थांबलो असता आम्ही दोघीजणी मुद्दामहून त्या पंजाबी स्रीजवळ जाऊन बसलो . तिच्या हेअर स्टाईलचे कौतुक केले आणि तिला विचारले , " आपने हेअर स्टाईल कैसे बनायी ? " आमच्या या प्रश्नावर तिने आमच्याकडे अशा काही नजरेने बघितले की, जणूकाही मारकी म्हैसच आमच्याकडे बघत आहे." मैं नहीं बताऊंगी!" तिच्या त्या उत्तराने मात्र आम्हांला हसूच आले . आम्ही हसतच तेथून उठलो आणि आमच्या महाशयांजवळ आलो . आपले दोघे महाशय नक्कीच म्हणतील," कशी जिरवली तिने तुमची." आणि आम्ही हसत हसतच आमची झालेली फजिती आमच्या नवऱ्यांना सांगू लागताच त्यांनी तेच वाक्य उच्चारले. पुन्हा आम्ही चौघे जोरात हसलो आणि आमच्या आजूबाजूचे सर्वजण आमच्याकडे बघू लागलेत. कारण त्या सर्वांना आमचा मराठीतला संवाद कळणे शक्य नव्हते आणि अशावेळेस आपल्या मातृभाषेचा अभिमान जरा अधिकच उचंबळून येत असतो आणि आपली भाषा दुसऱ्यांना येत नाही ते एका दृष्टिने बरेच वाटते कारण दुसऱ्यांची पाहिजे तेवढी टर उडवायला आयतीच संधी मिळत असते. आता मात्र आम्ही त्या पंजाबी स्रीकडे अधिक लक्ष देत होतो. एक दीड तास चालल्यानंतर आम्ही एके ठिकाणी फ्रेश होण्यासाठी थांबलो असता माझे लक्ष पुन्हा त्या पंजाबी स्रीकडे गेले असता तिने नेमका अंबाडा सोडला आणि केस मोकळे करून विंचरू लागताच मी पळत पळत माझ्या जावेकडे गेले आणि जावेला सांगितले , " ताई , पटकन इकडे या . आपल्याला आपली हेअर स्टाईल सापडली." मी काय म्हणते ते काही माझ्या जावेच्या लक्षात आले नाही म्हणून मी हातानेच तोंडावर बोट ठेवून बोलू नका असा इशारा केला आणि गुपचूप त्या बयेकडे बघा असा इशारा करताच त्याही बघत राहिल्या. आम्ही त्या स्रीच्या पाठीमागून ती अंबाडा कसा घालते ते लांबून बघत राहिलो. तिने अंबाडा घातला आणि आम्ही दोघींनी डोक्यालाच हात लावून घेतला. कारण आम्ही फोडून अंबाडा घालायचो तसाच तिने घातला परंतू तो पूर्ण न फोडता अर्धवट फोडला आणि खाली न ओढता उलटा ओढून वरती पिना लावून घट्ट केला . ही रंभा तिच्या अंबाड्यावर एवढी भारी भरत होती आणि काय तर म्हणे ," खोदा पहाड , निकला चूहा ." पुन्हा आम्ही स्वतःवरच पोटभर हसून घेतले. आम्ही दोघींनी तसाच अंबाडा घालून त्या पंजाबी स्री समोरून जायचे आणि तिला दाखवून द्यायचे की , हम भी कुछ कम नही. पंरतू देवीने मात्र आम्हांला हवेत उडू देण्याएवजी जागेवरच राहण्यास बजावले नि आमचा निर्धार चांगलाच देवीने बारगळून टाकला. त्याचे झाले असे की आम्ही मोठया तावातावात अंबाडा घातला परंतू आमचे दोघींचे केस लांब आणि दाट असल्यामुळे आम्ही उलटा अंबाडा करून पिना खोचल्याबरोबर तो अंबाडा फक्त क्षणभर राहिला आणि असा काही घरंगळत खाली आला की त्या स्रीची जिरवण्याऐवजी आमचीच जिरली आणि कधी नव्हे त्या दिवशी लांब व दाट केसांचा खूप राग आला. आता आम्हांला हा पंजाबी अंबाडा ( आम्ही अंबाडयाला दिलेले नाव ) घालायचा तर कमीत कमी वीस पंचवीस तरी पिना हव्यात आणि आमच्याजवळ मात्र चार पाचच पिना होत्या त्यामुळे आमचे अंबाडा सेशन तेथेच थांबवावे लागले नि देवीचे म्हणणे ऐकून आपले पाय जमिनीवरच ठेवण्याचा मंत्र घेतला आणि एक समाधान होते की ज्या अंबाडयाने आपल्याला छळले परंतू एकदाचा शिकलो ना, बस्स !
दुसऱ्या दिवशी घरी गेल्याबरोबर आम्ही आमचे अंबाडा सेशन पूर्ण केले आणि चांगले मिरलोही पंरतू अर्ध्या तासातच डोके त्या जड अंबाडयाने दुखू लागताच त्याला डोक्यावरून पायउतार करून पाठीवर आणून सोडले आणि सर्वांनी पुन्हा विचारले," कुठे गेली तुमची पंजाबी हेअर स्टाईल ? "आम्ही म्हटले, " अंबाडयाचा डोलारा संभाळण्यापेक्षा, आमची महाराष्ट्रीयन वेणीच बरी, सापासारखी दुसऱ्यांना डसणारी ."
काय ! सापासारखी डसणारी म्हणजे आम्हांला चार हात दूरच राहावे लागेल की काय! असे म्हणत माझे पती म्हणाले, "वहिनी, आबांचे ठीक आहे हो पण माझे काय!" त्याबरोबर सगळेच हसलेत .
पंजाबी स्रीच्या त्या तीन शब्दांनी मात्र आमचा संवादच बंद करून टाकला . तिने जर आम्हांला अंबाडयाविषयी सांगितले असते तर दोन संस्कृतीत बरीच देवाणघेवाण झाली असती. खरे तर अंबाडा हे फक्त संवाद साधण्याचे निमित्त होते. परंतू काहींना संवाद साधणे जमतेच असे नव्हे . एक मात्र झाले, ती स्री त्या तीन शब्दांमुळेही आमच्या स्मरणात राहिली हेही नसे थोडे आणि कुणी नकार दिल्यावर शिकण्याची इच्छा दुपटीने वाढते याचा अनुभवही घेतला .
वैष्णोदेवीच्या ठिकाणी शिकलेला अंबाडा मला नेहमीच आठवत राहतो आणि कधी लहर आलीच तर घालून पाहते परंतू अर्ध्या तासाच्या पुढे अंबाडा घालणे शक्य नसते कारण मान आणि डोके या दोघांची चांगलीच वाट लागते .
Nice
ReplyDeleteThanks
Delete