बस्टचे जावळ

  बस्टचे जावळ  
         
                   दि . २४ नोव्हेंबर २०१४ ला आम्ही पटायाच्या  विमानतळावर   पोहचताच आमची लक्झरी बस आणि आमचा गाईड बस्ट हजर होते. आमची चाळीस पर्यटकांची टीम आणि आमचा टूर मँनेजर अतुल भोबे व बस्ट अशी  ही बेचाळीस जणांची प्रवासी gang दहा दिवस धमाल करणार होती. अतुलने आमच्या गाइडचं 'बस्ट' नाव विचारताच सगळ्यांना आपण काही चुकीचे तर ऐकत नाही ना! असे वाटले. बस्टचे सर्वांनी 'बस' असे नामकरण एकमताने करून टाकले. कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी एकमत करताना किती नाकीनऊ येते परंतु बस्टचे 'बस' असे नामकरण करताना एकमत व्हायला काहीच करावे लागले नाही म्हणजेच विनोद हा सर्वांच्या अंगी चांगलाच मुरलेला दिसतो असे दिसून आले. बस्टचे फक्त नावच आमच्या सहकाऱ्यांना खटकले नाही तर त्याची केशभूषासुध्दा आमच्या सहकाऱ्यांना खटकली. आता त्या बिच्चाऱ्या बस्टची केशभूषा तरी आमच्या सहकाऱ्यांच्या डोळ्यात का खुपावी! केस त्याचे स्वतःचे, त्याने ते कसे ठेवावेत हा त्याचा वैयक्तिक प्रश्न पण दुसऱ्याच्या वैयक्तिक गोष्टीत दखल घेणे जणूकाही आमचा जन्मसिद्ध हक्क आहे याच आविर्भावाने सर्वांनी  त्याच्या केशभूषेवर यथेच्छ तोंडसुख घेतले आणि सगळ्यांची चिवचिव ऐकून अतुलची चांगलीच करमणूक होत होती. त्यालाही पर्यटकांच्या सर्व तऱ्हा चांगल्याच ज्ञात झालेल्या त्यामुळे तो गालातल्या गालात हसत होता. त्याला हसताना पाहून आमच्याबरोबर असलेले सोळुंके साहेब अतुलला म्हणाले, "अरे अतुल, आपण आपल्या या ट्रीपमध्ये बस्टच्या जावळाचा कार्यक्रम उरकवून टाकू या!" सोळंके साहेबांच्या या वक्तव्यावर संपूर्ण बस इतकी खळखळून हसली की, सर्व पर्यटक का हसलेत हे मात्र आता बस्टला सांगण्याशिवाय अतुलला पर्याय नव्हता कारण बसमधील सर्वांना हसताना पाहून बस्टचा चेहरा असा काही प्रश्नांकित झाला की,' की हे वेडे लोक तर नाहीत ना, एकसारखे हसत आहेत.' बस्टच्या चेहऱ्यावरील प्रश्नार्थक भाव पाहून अतुलने त्याला जावळाच्या कार्यक्रमाची माहिती इंग्रजीतून सांगितली तेव्हा त्यालाही हसू आले. त्याने 'जावल सेरेमनी'  असा पुनःपुन्हा उच्चार करून त्याविषयी जाणून घेतले. आता मात्र यापुढे कुणी पर्यटक त्याच्या केसांवर हास्यविनोद करून याचं ' जावळ काढा रे ', असे जर म्हटले तर तो त्याला नक्कीच म्हणेल," Why are you cut my hair? It's my property." असे म्हणत गप्प करायचा. अशाप्रकारे प्रथमदर्शनीच सर्व पर्यटकांना बस्टची भलीमोठी वेणी काही भावली नाही आणि त्यावर सर्वांनी विनोद करून बस्टच्या वेणीला अजूनच लांब करून टाकले. बस्टच्या वेणीने मात्र सगळ्या अनोळखी पर्यटकांना एक करून टाकले आणि चाळीस जणांचे कुटुंब तयार झाले. अशाप्रकारे  हास्य विनोदी वातावरणाने आमची थायलंडमधील एंट्री सर्वांच्याच लक्षात राहिली . 
                आमची बस रस्त्यावर धावू लागताच सगळ्यांचा परिचय करताना अनेक गंमतीजंमती झाल्या. बाहेरचा सुंदर निसर्ग आणि त्यासोबत रस्त्यावर धावणाऱ्या बसबरोबर प्रत्येकाचे परिचय देणे व इतरांनी मधूनच एखाद्या वाक्यावर विनोद निर्मिती करून सर्वांना खळखळून हसायला भाग पाडणे .अशा या मनमोहक वातावरणात आमची बस पटायाहून फुकेतकडे जाण्यास निघाली . पटाया केव्हा सोडले आणि फुकेत केव्हा आले ते कळलेच नाही. पटाया ते फुकेत हा प्रवास कायमचा स्मरणात राहिला तो बस्टच्या लांब केसांमुळे व त्याने रबर बँड लावून घातलेल्या बो मुळे आणि सोळुंके साहेबांनी कल्पनेने केलेल्या बस्टच्या जावळामुळे. आजही कुणी जावळाचा विषय काढला की पटकन बस्ट आठवतो आणि पटाया ते फुकेतचा चाळीस सह प्रवाशांबरोबर केलेला विनोदी प्रवास. आतापर्यंत प्रवास हा चांगला किंवा त्रासदायक होतो एवढेच मला वाटत होते परंतु प्रवास विनोदीसुध्दा असू शकतो याचा प्रत्यय पटाया ते फुकेतच्या प्रवासाने दिला .

Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या