अनुभूती निसर्गाची
अनुभूती निसर्गाची
दि . ३० ऑक्टोबर २०१४ ला आम्ही एर्नाकूलमहून सकाळी सात वाजता निघालो आणि चार तासात आलेप्पीला पोहचलो आणि बँकवॉटर व हाऊसबोटची चौकशी केली असता एका इसमाने आम्हांला एका हाऊसबोटच्या मालकाकडे नेले आणि त्याच्याशी विचारविनिमय करून आम्ही तीन कुटुंबियांनी एक हाऊसबोट बुक केली . आमच्या गाडया एका बंगल्याच्या आवारात पार्क केल्यात आणि थोडेसे सामान घेऊन आम्ही हाऊसबोटमध्ये चढलो . हाऊसबोटमधील रूम्स खूपच छान होत्या . आमची हाऊसबोट सुरु होताच जो नजारा दिसला तो पाहून मन अगदी मोहून गेले . नेहमीच जमिनीवर राहणाऱ्या आमच्यासारख्या माणसांना पाण्यावर राहण्याचा अनुभव नक्कीच वेगळा होता . पाणी म्हणजे जीवन हे ठाऊक असणाऱ्या आमच्यासारख्यांना पाण्यावर जगणे व राहणे मात्र ठाऊक नसते . त्यामुळे दिवस व रात्र पाण्यात काढायची या निश्चयानेच आम्ही हाऊस बोटमध्ये राहण्याचा निर्णय घेतला . जिकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी आणि त्या पाण्यात छोटी छोटी हिरवीगार बेटे आणि त्या पाण्यावर तरंगणाऱ्या शेकडो बोटींचा ताफा व त्या ताफ्यात सामील झालेले देश विदेशातले पर्यटक . असे हे मनोहारी दृश्य मन मोहून घेत होते आणि एका वेगळ्याच विश्वात घेऊन जात होते . अशा रम्य ठिकाणी गेल्यावर ते निर्माण करणाऱ्या नियंत्याचे स्मरण होऊन त्याच्यापुढे आपण नकळत नतमस्तक होत असतो . नियंत्याने कुठे ,कसे नि काय निर्माण केले याचा शोध घेणे खरे तर आपल्या आवाक्यापलिकडचे असते . अशा रम्य ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यातून नियंत्याशी संवाद साधणे मला नेहमीच आवडत असते . क्षणभर मी माझ्यासोबत असणाऱ्यांनाही विसरून जात असते . कधी कधी आजूबाजूचा गोंगाटही लक्षात येत नाही इतकी तन्मयता अनुभवण्याचा योग मला आलेप्पीच्या हाऊसबोटमध्ये प्रवास करताना आला . निसर्गाशी संवाद साधतच मी आकाश , पाणी आणि जमीन या तिन्ही घटकांचा विचार करीत होते . आम्ही नेमके कुठे आहोत ? आकाश आणि पाणी यांच्यामध्ये की पाणी आणि जमीन यांच्यामध्ये की आकाश आणि जमीन यांच्यामध्ये . खरे पाहिले असता आम्ही आकाश ,पाणी आणि जमीन अशा तिन्ही घटकातच सामावले आहोत . आम्ही ज्या पाण्यात आहोत ते पाणी शेवटी जमिनीच्या भूभागावरच तर आहे आणि ज्या पाण्यात आमची हाऊसबोट तरंगत आहे त्याला अवकाशात व्यापलेल्या हवेचा आधार आहेच याचाच अर्थ आकाश ,पाणी आणि जमीन या तिन्ही घटकातच आम्ही राहतो परंतु पाण्यात असताना जमीन व आकाशाचे अस्तित्व लक्षात येत नाही आणि जमिनीवर असताना आकाश व पाण्याचे अस्तित्व लक्षात येत नाही . त्याचप्रमाणे माणूस व निसर्ग यातील नियंत्याचे अस्तित्व आमच्या लक्षात येत नाही .
आलेप्पीचा निसर्ग म्हणजे शांत व संयमी जीवनाचे प्रतिक होय . खवळणाऱ्या समुद्राला सोडून स्वतःची वेगळी वाट चोखाळत आलेले हे पाणी एका व्रतस्थ संन्याशासारखे वाटते . येथे आलेल्या प्रत्येक पर्यटकाला ते भरभरून आनंद व तृप्तता देत असते . येथील छोटी छोटी हिरवी बेटे म्हणजे चैतन्याची कारंजीच होत . या छोटयाशा बेटावर पाय ठेवताच जणूकाही आपण या संपूर्ण विश्वाचे खरेखुरे मालक आहोत असेच वाटते . ' भेदाभेद गळले सारे , उकलूनी गेले सारे , जगणे कळले खरे. ' अशीच भावसमाधी आलेप्पीच्या निसर्गाने प्राप्त झाली त्यामुळे आलेप्पी नेहमीच स्मरणात राहील .

Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.