गड्या अपुला गांव बरा!
गड्या अपुला गांव बरा!
दि . २७ डिसेंबर २०१४ ला आम्ही सकाळी ७ वाजताच तयारी करून पुकेतला हॉटेल disiut D २ मध्ये नाश्त्यासाठी डायनिंग हॉलमध्ये सर्वजण जमलो . नाश्त्यासाठी पंचवीस तीस पदार्थ असूनही काय घ्यावे आणि काय खावे ? असा प्रश्न सर्वांना पडलेला कारण नाश्ता म्हणताच पोहे ,उपमा ,मिसळ , भजी खाणाऱ्या महाराष्ट्रीयन माणसाची धाव ही खरे तर इडली , डोसा , उत्तपा ,छोले भटुरे आणि ब्रेड ऑम्लेटच्या पलिकडे जाणे तसे कठीणच असते . त्यामुळे सर्वजण प्लेट हातात घेऊन आपल्या आवडीचे काही मिळते का ? या शोधात इकडून तिकडे पाहत फिरत होते . प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच भाव होता की , दिसायला सर्वकाही छान आहे पण आपल्या खाण्यासाठी काहीच दिसत नाही . मांसाहारी व्यक्ती ब्रेड ऑम्लेट घेत होते परंतु त्यातही काहींना तेथील ऑम्लेटचा वास काही आवडला नाही तेव्हा वाटले आता या ऑम्लेटसाठीही एखादा डी . ओ . शोधायला पाहिजे म्हणजे त्याचा येणारा दर्प एखाद्या सुवासिक वासात परावर्तीत झाला म्हणजे सगळ्यांना खाणे सोयीस्कर होईल आणि अवकाळी येणाऱ्या पावसामुळे भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली तरी सुवासिक ऑम्लेट खाऊन अन्नधान्याची टंचाई भेडसावणार नाही असे वाटले . काही माझ्यासारख्या फळांवर मनापासून प्रेम करणारे मात्र मनसोक्तपणे पपई ,टरबूज ,केळी , अननस इ. फळांचा फडशा पाडून मोकळे व्हायचे तर पेयावर प्रेम करणारे ज्यूस , चहा , कॉफी या पेयांनाच गटागटा प्राशन करून तरतरीत व्हायचे . तर काही तरुण मंडळी ब्रेड जॅम , ब्रेड बटर , केक यावर ताव मारायची तर काही पट्टीचे खवय्ये उकडलेल्या भाज्या व थाई करी , राइस व वेगवेगळे सॉसेस असे सर्वकाही चाखून पाहायचे . तर काही मात्र चला काही का असेना , जिभेचे चोचले करण्यापेक्षा पोटात टाकणे महत्त्वाचे . अशा या सर्व पर्यटकांच्या नाना तऱ्हा पाहिल्यावर वाटायचे , ' गड्या आपुला गाव बरा ' असे उगीचच म्हटले नाही . हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना या सगळ्या खवय्यांच्या तऱ्हा चांगल्याच ज्ञात झालेल्या कारण त्यांनी ब्रेडचे , केकचे व सॉसेसचे नाना प्रकार सजवून ठेवलेले असूनही मोजकेच खवय्ये या पदार्थांच्या जवळपास फिरकतात तसेच आम्हांला आमच्या पुढ्यात कुणीतरी आणून देण्याच्या सवयीमुळे हातात प्लेट घेऊन आणि टोस्टरच्या रांगेत उभे राहून ब्रेडला टोस्टरच्या स्वाधीन करायचे नि मग तो टोस्ट आपल्या प्लेटमध्ये घेण्याचे कष्ट केल्यावर तो टोस्ट खायला खरे तर उत्साहच राहत नाही त्यातच आपण रांगेत असताना मात्र इतरांनी मस्तपैकी ताव मारत बसणे म्हणजे अन्यायकारकच होय पण काय करणार ! देश सोडून आंतराष्ट्रीय नागरिक बनायचे तर या सर्व गोष्टींना सामोरे जाण्याशिवाय पर्यायच नाही हे जाणून आलिया …. अर्थात येथे आमच्यासोबत काही आलिया भट आली नाही तर मला म्हणायचे होते ' आलिया भोगासी असावे सादर ' अशीच सर्वांची गत होती . सगळेचजण आपापल्या प्लेटमधले पदार्थ संपवण्याच्या तयारीत असतानाच अतुलची ( आमचा टूर manager ) ललकारी सर्व हॉटेलच्या डायनिंग हॉलमध्ये गुंजते , " चला आटपा वीणा वर्ल्डवाले , समोर आपली बस आलेली आहे तिच्यात जाऊन बसा ." अतुलची ललकारी गुंजल्यानंतर सर्वजण खडबडून जागे व्हायचे नि मग खाण्याचा वेग चांगलाच ताशी पन्नास साठच्या वेगाने वाढायचा त्यात आमचे महाशय घरी जेवण करताना सतराशे बावन्न नखरे करतील परंतू बाहेर मात्र जे समोर आले ते आज्ञाधारक बालकाप्रमाणे खाऊन मोकळे व्हायचे आणि इतरांचे खाणे होईपर्यंत फोटो सेशन करीत बसायचे . खाद्य पदार्थांच्या चवीपेक्षा ते किती सुंदरपणे सजवून ठेवलेत ते पाहत बसणे हे खाण्यापेक्षा अधिक बरे असे वाटायचे . एकदाचा नाश्ता आटोपून सर्वजण बसमध्ये आपापल्या नेमून दिलेल्या जागेवर स्थानापन्न झालेत आणि तीन दिवस ज्या disiut D २ त वास्तव्य केले त्या वास्तूला अखेरचा निरोप देत पुन्हा तेथे येणे तसे शक्यच नाही हे ठाऊक असल्यामुळे कुठेतरी मन हळहळत होते . disiut D २ ला बाय बाय करून आणि पुकेतलाही अखेरचा निरोप देत आमची बस विमानतळाकडे भरधाव सुटली . रस्त्याने पुन्हा समुद्राच्या निळाशार पाण्याचे व लाटांचे मनोहारी दृश्य नजरेस पडले आणि सर्वत्र हिरवीगार झाडी आणि सुशोभित रस्ते व त्यावरून धावणारी आमची बस आम्हांला पुकेतच्या विमानतळावर केव्हा घेऊन आली ते कळलेदेखील नाही .
पुकेतमधील तीन दिवस कसे गेलेत ते कळलेदेखील नाही . या तीन दिवसात सागराचे जे दर्शन झाले ते शब्दात व्यक्त करणे खरे तर शक्यच नाही . समुद्राचे पाणी व त्याच्या आजूबाजूचा निसर्ग किती विविध प्रकारे आपल्यासमोर उभा ठाकतो ते पाहून मन अचंबित होत असते . निसर्ग आणि मानव यांचे नाते किती अतूट आहे याची जाणीव क्षणोक्षणी होत असते नि मन निसर्गापुढे नतमस्तक होत असते . पुकेतच्या आजूबाजूला असणाऱ्या बेटांवर फिरताना समुद्राशी आपण इतके एकरूप होऊन जातो की असे वाटते आपण जमिनीवर राहण्याऐवजी पाण्यावरच राहायला हवे . बोटीतून विहार करताना अंगावर उडणारे पाण्याचे तुषार मन अगदी तृप्त करून टाकत असतात . समुद्राच्या अथांग पाण्यावर स्वार होणारा मानवी प्राणी तसा खूपच क्षुद्र भासत असतो तरीदेखील मानवाने बुद्धीच्या जोरावर निसर्गाला काही अंशी आपल्या काबूत करण्याचा प्रयत्न स्तुत्यच होय . जोपर्यंत त्सुनामी येत नाहीत तोपर्यंत समुद्र आपल्याला सुंदर वाटत राहतो आणि जेव्हा त्सुनामी येते तेव्हा हाच सुंदर व अथांग समुद्र आपल्याला राक्षसासारखा क्रूर भासत असतो . ज्याप्रमाणे सुष्ट व दुष्ट शक्तींनी मानव बनला त्याच दोन शक्ती निसर्गातही वास करीत असतात म्हणूनच मानव व निसर्ग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याची प्रचीती वेळोवेळी येत असते . मानवी मनाचे आकलन करणे जितके कठीण असते तितकीच समुद्राची गहराई व त्यात दडलेल्या अमूल्य साठ्याचा शोध घेणेही कठीणच ! पुकेतच्या परिसरातील बेटांवर समुद्राचे पाणी इतके स्वच्छ आहे की आपण त्या पाण्याच्या प्रेमातच पडतो . त्या पाण्याने मन इतके मोहीत होऊन जाते की तेथून हलूच नये . आकाशातील ढगांच्या वेगवेगळ्या प्रतिमांचे समुद्राच्या पाण्यात पडलेले प्रतिबिंब जे क्षणाक्षणाला बदलत जाते आणि आपल्या मनात अनेक विचारांचे तरंग उमटवीत जाते तेव्हा आपण समुद्राशी अगदी तादात्म्य पावत असतो . अशावेळेस कवी कुसुमाग्रजांचा उत्तुंग आशावाद आठवल्याशिवाय राहत नाही आणि नकळत ओठांवर ओळी येतात , ' अनंत अमुची ध्येयासक्ती , अनंत अन आशा , किनारा तुला पामराला ! ' खरंच समुद्राला देखील किनाऱ्याचे बंधन आहे पण मानवी मनाला कसलेच बंधन नाही एकामागून एक विचार मानवी मनात डोकावतच राहतात नि आपल्या मनाची समुद्राशी चाललेली क्रीडा म्हणजे जन्मोजन्मीचा चाललेला मूकसंवाद होय . पुकेत येथील त्या तीन दिवसांतील समुद्राशी केलेला मूकसंवाद आजही आठवण येताच चालू होतो नि मग पुन्हा कल्पनेची भरारी घेत मन पुकेतच्या समुद्रात रपेट मारून येत असते .

Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.