पटाया टॉवर
वर्षातून एखादाच चांगला चित्रपट पाहणे मला आवडते हे माझ्या मुलाला व मुलीला चांगलेच ठाऊक असल्यामुळे ' नीरजा ' चित्रपटाचे बुकींग करून आम्हांला चित्रपट पाहण्यास जायला सांगितले . ऑन लाईन बुकींग केल्यामुळे तसा मोबाईलवर मेसेज आला होताच . मुलांनी बुकींग केल्यामुळे कुठलीही सबब न सांगता चित्रपट पाहण्यास जाण्याशिवाय पर्यायच नव्हता . चित्रपटाच्या मध्यंतरामध्ये आम्ही दोघेही चहा कॉफी काहीतरी प्यावे म्हणून बाहेर आलो आणि समोरून हातात पॉपकॉर्न घेऊन येणाऱ्या माहेश्वरी मॅडम दिसल्या आणि आनंदाने ओरडल्याच , " पाटील भाऊ , वहिनी !" जवळ येताच माहेश्वरी मॅडम म्हणाल्या , " वहिनी , पाठीमागे फिरा , मला तुमचे केस पाहू द्या . त्या बाबाची नजर तर नाही ना लागली . " त्यांच्या त्या वाक्याने आम्ही तिघेही थायलंडच्या आठवणीने पुन्हा हसलो .
आजही तो दिवस आठवला की हसू येते त्याचबरोबर काही प्रश्न अनुत्तरित राहिलीत . २७ डिसेंबर २०१४ ला आम्ही ५५ मजल्यांचा पटाया टॉवरवरून मोठ्या झोकात उड्या मारून , घाबरू नका आम्ही काही सरळ उडी मारून नाही तर थाई बाबांच्या दोरखंडांनी घट्ट जखडून पृथ्वीच्या दिशेने आलो आणि क्षणभर विकतचे पंख लावून पक्ष्यांप्रमाणे उडून पाहिले . पटाया टॉवरच्या खाली येऊन आमच्या मागून येणाऱ्या पर्यटकांचे निरीक्षण करीत आम्ही एका बाकावर बसलो होतो . कोण कसं घाबरत आहे , कोण कसे किंचाळत आहे तर काही महाभाग स्वतःला कसे सुपर मॅन समजत आहेत असे वेगवेगळे माणसांचे वेगवेगळ्या भावमुद्रा टिपत आम्ही गप्पा करीत होतो . पटाया टॉवरवरून येणाऱ्या पर्यटकांचे मजेशीर , उछलकूदवाले फोटोही काढीत होतो . आमच्याबरोबरचे काहीजण घाबरून पटाया टॉवरवरून केबल करणे येण्यासही घाबरलेत म्हणून त्यांना चिडविण्याचे कामही चालू होते . काही व्यक्तींना उंचीची भीती वाटत असते त्यामुळे सर्वांनी सांगूनही ती आपली धाडस करायला काही धजावली नाहीत .
माहेश्वरी कुटुंबिय , पवार पती पत्नी , सोळुंके पती पत्नी आणि कोल्हापूरचे आजोबा आजी आणि आम्ही दोघे पटाया टॉवरच्या खाली येऊन पटाया टॉवरच्या परिसराचे निरीक्षण करीत गप्पा रंगात आल्या होत्या . आम्ही ज्या बाकावर बसलो होतो तेथे एक थाई नागरिक माझ्याजवळ येऊन म्हणाला , " मॅम , कॅन आय कट युअर हेअर ?" मला क्षणभर तो काय म्हणतो ते लक्षातच आले नाही कारण मला असा कुणी प्रश्न विचारण्याचं साहस करेल आणि तेही एक अनोळखी व्यक्ती ! त्यामुळे चांगलीच बावरले आणि माझ्या पतीला व माहेश्वरी मॅडमला म्हटले , " हा माणूस बघा काय म्हणतो ? " मी त्याला नाही म्हणून सांगितले तरीदेखील तो पुन्हा म्हणाला ," मॅम , कॅन आय कट युअर हेअर ? " मी त्याला विचारले , " व्हाय आर यू कट माय हेअर ?" तो काहीच बोलला नाही फक्त केस कापू का ? हेच विचारत होता . शेवटी सगळ्यांनी सांगितले , " नो , शी लाईक्स लॉंग हेअर ." मला मात्र डोक्याला हात लावण्याची पाळी आली , कुठून दुर्बुद्धी सुचली नि मोकळे केस सोडलेत . कारण तो बाबा विग बनवणारा होता की हेअर सलूनवाला होता ते काही कळले नाही . तो मात्र आमच्याजवळून दूर उभा राहिला आणि यांचा विचार बदलतो की काय असे त्याला वाटत असावे .
लहानपणी एकदा मामाने माझे न्हाव्याकडून केस कापले होते तेव्हा जे आकांडतांडव केले होते ते आजही जसेच्या तसे आठवले आणि माझे केस कापू पाहणाऱ्या या थाई बाबाचे काय करावे ! असे मला झाले होते . अर्थात त्याचाही काही दोष नसेल . एक चांगला केशभूषाकार असल्यामुळे त्याला कदाचित लांब केस पाहून एक वेगळा प्रयोग करून पाहण्याची इच्छा झाली असावी . माणसाची आवड व छंद त्याला कोणतेही प्रयोग करून बघण्यासाठी धाडस , जिद्द व चिकाटी इ . गुण बहाल करीत असते आणि याच गुणांमुळे तो मोठ्या आशेने माझ्या केसांकडे पाहत होता परंतु माझाही नाईलाज होता . आजीने जीवापाड मेहनत घेऊन जपलेले माझे केस मी असे कुणाच्याही हातात सोपवणे शक्यच नाही . पटाया टॉवर त्याच्या भव्यतेमुळे जितका लक्षात राहिला तितकाच तो केशकर्तनकारामुळेही कायमचा लक्षात राहिला .


जोस्त्ना सुकेशनी😃
ReplyDeleteधन्यवाद मीना।
Delete