वडा होता होता 

            माझ्या दृष्टीने स्वयंपाकघर म्हणजे एक प्रयोगशाळाच होय. स्वतःच्या मनाने वेगवेगळे प्रयोग करायचे आणि प्रयोगाच्या परिणामांना सामोरे जायचे. कधी यशाचा तर कधी अपयशाचा सामना करायचा. यश मिळताच आनंद आणि अपयश आले तर मग असंख्य प्रश्नांना सामोरे जायचे. कोणता पदार्थ अधिक झाला तर कोणता पदार्थ कमी झाला असेल? उष्णता कमी दिली गेली का?की अधिक दिली गेली? असे अनेक प्रश्न आणि त्या प्रश्नांची उकल करण्याकरिता पुन्हा तो पदार्थ करून पाहण्याकरिता प्रचंड मानसिक तयारी करणे व पुन्हा खटाटोप करणे. अशाप्रकारे सर्व खटाटोपानंतर घरातील कुणाकुणाला हा पदार्थ आवडेल आणि कुणाला आवडणार नाही? याचे गणितीय आडाखे बांधण्याचेही महत् कार्य पार पाडावे लागते. 
             माझ्या या प्रयोगशाळेतील पदार्थ जसे अनेक प्रकारचे, अनेक चवींचे तसेच अनेक अनुभवांचे स्मरणही वेळोवेळी करून देणारे आहेत. माझ्या प्रत्येक पदार्थांबरोबर स्मरणांची बहुरंगी कारंजी सदोदित उचंबळत राहतात आणि त्यातूनच पुनःपुन्हा नवनवीन पदार्थ करून पाहण्याचे प्रयोग करण्यास ऊर्जा मिळत असते. 
              असाच एक प्रयोग पंचवीस सव्वीस वर्षांपूर्वीचा. नुकतीच पाककलेची तोंडओळख झालेली होती. एकदा उडपी हॉटेलमध्ये मेदूवडयाची ऑर्डर देऊन तो पदार्थ खाऊन पहिला.पदार्थ आवडला आणि तेव्हाच मनाने ठरवून टाकले की हा पदार्थ घरी करून पाहायचाच, असा निश्चय करूनच उडपी हॉटेलचे बिल देऊन बाहेर पडले. त्याच दिवशी रात्री उडदाची डाळ पाण्यात भिजत घातली. दुसऱ्या दिवशी उडदाची डाळ मिक्सरमधून वाटली असता फुकटात मिळणाऱ्या पाण्याने गरम तेलाच्या कढईत आपले अस्तित्व चांगल्याच प्रकारे दाखवून दिले. जणूकाही डाळीतल्या पाण्याने माझ्यावर चांगलाच सूड उगवला होता. फुकटात मिळतो म्हणून मला काही किंमतच नाही का? अशा घुश्श्यातच डाळीतल्या पाण्याने गरम तेलाचे फवारे माझ्या हातावर सोडले होते. डाळीतल्या पाण्याचा घुस्सा लक्षात येताच मी गॅस बंद केला आणि उडदाच्या डाळीचे पातळ झालेले मिश्रण घट्ट कसे करायचे?याचा विचार करू लागले. पातळ झालेल्या मिश्रणातून थोडेसे मिश्रण एका भांडयात घेऊन त्यात थोडेसे बेसनपीठ टाकले परंतु मेदूवडा काही माझ्यावर मेहेरबान झाला नाही. आता मीही इरेला पेटले होते. मिश्रणातल्या पाण्याची तर चांगलीच जिरवायची, असा निश्चय करून पुन्हा दुसरा प्रयोग करून पाहिला. आता मात्र मी डाळीच्या मिश्रणात गव्हाचे पीठ टाकून चांगले फेटून काढले नि पुन्हा कढईतल्या गरम तेलात वडा सोडताच मघाशी मला त्रास देणाऱ्या पाण्याने लागलीच पळ काढला आणि गुलाबी खरपूस वडा तयार झाला. प्लेटमधल्या मेदूवडयाला तितक्याच त्वरेने गट्टम केले आणि एक धडा कायमचा शिकले. मुबलक व सहज मिळणारे पाणी प्रत्येक ठिकाणी मोजूनमापून व योग्य ठिकाणीच वापरावे. स्वयंपाकाचा राजा जर कुणी असेल      तर ते म्हणजे ' पाणी ' होय. या राजाचा तोरा सांभाळला की स्वयंपाकाचे शिखर गाठणे सहज शक्य होते. 
           मला नाचवणाऱ्या मेदूवडयाला नंतर मात्र मी वेगवेगळ्या प्रकारे नाचवले. कधी मी त्याला तांदळाबरोबर (उडीदडाळ व तांदूळ एकत्र भिजवून वडे केलेत.) नाचविले तर कधी त्याला सर्व कडधान्यांबरोबर  झिम्मा खेळण्यास भाग पाडले. (उडीदडाळ, चणाडाळ, मूगडाळ, तूरडाळ, तांदूळ एकत्र भिजवून वडे केलेत.) कधी कधी त्याला मी बटाटयाबरोबर( भिजवलेल्या उडीदडाळ व तांदळाच्या मिश्रणात उकडलेला बटाटा मिक्स करून वडे केलेत.) गट्टी फू करण्यास भाग पाडले तर कधी ब्रेड क्रम्सबरोबर त्याला हात मिळवणी करण्यास भाग पाडले. अशी ही वेगवेगळ्या रंगाची, आकाराची व चवीची मेदूवडयाची मेजवानी वेळोवेळी पाहुण्यांची सरबराई करण्यास तत्पर असते. 
              उन्हाळ्याच्या सुटीत माझे भाचा, भाची,पुतण्या, पुतणी व बहिणीची  व भावाची मुले माझ्याकडे आलीत की या सर्वांना नाश्त्याला मेदूवडे करताना मेदूवडा मेकर न वापरता हातानेच भज्यांप्रमाणे वडे करणे भाग पडायचे कारण सगळ्यांना गरमागरम वडे खाऊ घालताना माझी चांगलीच गडबड उडायची. त्यांच्या प्लेटमधले वडे संपलेत की "काकू, मला वडे.  मामी, मला वडे, मावशी, मला वडे. आई, मला वडे." असा सगळ्यांचा गजर सुरू व्हायचा नि मग मुलांचा आवाज ऐकताच शेजारच्या महेकर मॅडम," वहिनी " अशी हाक मारीत यायच्या नि म्हणायच्या, "वहिनी ,मुलांची ही अंगतपंगत पाहून मला खूप छान वाटते. तुमच्याकडे सासर व माहेरची सर्वच मुले एकत्र कशी काय राहतात!" त्यांना या गोष्टीचे नेहमीच कुतूहल वाटायचे. आज ही सगळी मुले खूप मोठी झालीत पण मुलांच्या बालपणातल्या या सुगंधी आठवणी माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत. त्याकरिता या सर्व मुलांची मी नेहमीच ऋणी राहीन. 
                  तेजस्विनी, राहुल, मोना, राकेश, स्वप्नील, विशाल, पूर्ती,केतन, आशू ,विनू , उमा, चिनू, जिग्नेश,अभिषेक, प्रसाद हे बऱ्याचवेळा एकत्र राहायचेत नि भरपूर धमाल करून घर दणाणून सोडायचेत नि घराबरोबर सोसायटीतही चैतन्य निर्माण व्हायचे. नाशिकमधील मेरीतल्या वन बीएचके फ्लॅटमध्ये मुलांनी जी धमाल केली त्यामुळे माझ्या मधल्या बहिणीची मुले आशू व विनू मी जेव्हा नवीन घर घेतले तेव्हा मला म्हणाली, " मावशी, तुला सांगून ठेवतो, मेरीच्या घराशी आमच्या खूप आठवणी आहेत त्यामुळे ते घर विकायचे नाही." अशा अनेक आठवणी वडयाशी व मेरीच्या घराशी रूजल्यात त्या कायमच्याच.                                  

Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या