मैत्रीपूर्ण वास्तू - सागर दर्शन

मैत्रीपूर्ण वास्तू - सागर दर्शन 

               तेरा चौदा वर्षांपूर्वी मे महिन्यात गोव्याला गेले असताना आम्ही दोना पावला बीचवर जाण्यासाठी निघालो आणि अचानकपणे रस्त्याच्या उजव्या बाजूला ' सागर - दर्शन ' नाव दिसताच खूप आनंद झाला . खरे तर सागर - दर्शन या नावाशी माझं कोणते नाते जोडले गेले होते ! ' सागर - दर्शन ' नाव वाचल्यावर मला आनंद का व्हावा ? एक वास्तू ! जिचे नाव ' सागर - दर्शन ' . काय होते त्या वास्तूत ? खरे तर आजच्या घडीला काहीच नव्हते तरीही मला त्या ' सागर - दर्शन ' या नावाने वेड लावले होते . कितीतरी वेळ मी त्या वास्तूकडे पाहत राहिले . या वास्तूने माझी मैत्री हरवली होती . या वास्तूने मला माझ्या मैत्रीपासून लांब नेले होते . 
               माझ्या डायरीत लिहिलेल्या पत्त्यावर ' सागर - दर्शन ' , दोना पावला असे लिहिले होते आणि आज मी चक्क त्या वास्तूसमोर उभी होती , परंतु हात पसरवून स्वागत करणारी माझी मैत्रीण त्या वास्तूत नव्हती . ' सागर - दर्शन ' राहणारी माझी मैत्रीण खरोखरीच सागर दर्शनाकरिता निघून गेली . आज ती साता समुद्रापार जाऊन पोहचली परंतु सागर दर्शनने मला मैत्रिणीचे आठवणीतून दर्शन घडविले . माझ्या मैत्रिणीचे सागर - दर्शन या वास्तूत वास्तव्य होते म्हणून मला ती वास्तू आपलीशी वाटली . त्या वास्तूला माझ्या खळखळून हसणाऱ्या मैत्रिणीचे हास्य लाभले होते . सतत जगापुढे दोन पाऊल पुढे असावे असे वाटणारी ही महत्त्वाकांक्षी मैत्रिण आणि जगापासून चार हात दूर राहणारी मी . अशा या दोन , दक्षिण - उत्तर ध्रुवाचं मीलन कसे झाले ते तिलाही सांगता यायचे नाही किंवा मलाही सांगता यायचे नाही . 
               सागर - दर्शनने मला गोव्यात असूनही ब्राम्हणगावाला  ( ता . सटाणा , जि . नाशिक ) नेऊन पोहचवले . समोर फेसाळणारा समुद्र असूनही मला मात्र ब्राम्हणगावच्या  शेतातली वाऱ्याच्या झोताबरोबर डोलणारी पिकेच दिसू लागली . दोनापावला बीचवर फेसाळत येणाऱ्या लाटांमध्ये मला  ब्राम्हणगावच्या  शेतातल्या विहिरीचं पाणी शेतात कसे वळणं घेत घेत जात असे आणि त्या पाण्यात आम्ही कसे पाय बुडवित असू याचे स्मरण झाले . दोनापावला बीचवर सूर्य बुडत असताना मला मैत्रिणीच्या शेतातील अस्ताला जाणारा सूर्य आम्हांला घराचा रस्ता धरण्यास कसा भाग पाडीत असे  याची आठवण झाली . अस्ताला जाणारा सूर्य हा आमचा सर्वात मोठा शत्रू वाटायचा कारण शेतातून घरी जायचे खरे तर जीवावर यायचे , परंतु नाईलाजास्तव घराची वाट धरावी लागत असे . अनेकवेळा उशीरा घरी पोहचल्यामुळे घरच्यांची बोलणीही खावी लागत असत ,परंतु मनसोक्तपणे शेतात हुंदडण्याच्या आनंदापुढे बोलणी मनावर घेण्याचा प्रश्नच नसे . 
             दोना पावला बीचवरील ' सागर - दर्शन ' या वास्तूने मला दोना पावला बीचचे खरे दर्शन कधी घडूच दिले नाही . प्रत्येक सुटीत दोना पावला बीचवर जावे तर ' सागर - दर्शन ' नावाची वास्तू पुढ्यात हजर राहायची आणि मला गोव्याचा विसर पडून मी नकळतपणे ब्राम्हणगावाला जाऊन पोहचत असे . ' सागर - दर्शन ' या वास्तूपासून मी आठशे कि . मी . राहते . या वास्तूचा आणि माझा गोव्याला येण्यापूर्वी काहीही संबंध नव्हता ,परंतु मी गोव्याला आले आणि या वास्तूने मला पुरते झपाटून टाकले ते केवळ माझी प्रिय मैत्रिण नीलिमाचे वास्तव्य काही वर्षे या वास्तूत होते म्हणून ! 
            मी गोव्याला गेली तेव्हा माझी मैत्रिण नीलिमा जोशी - कुलकर्णी ही इंग्लंडला नोकरीनिमित्ताने गोवा सोडून गेली पण तिने दिलेल्या गोव्याच्या पत्त्यावर ती तेथे असेपर्यंत जाऊ शकले नाही याची खंत होती आणि ' सागर - दर्शन ' वास्तू ती खंत अधिकच करून द्यायची .   

Comments

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या