उकडपेंडीची गोष्ट
उकडपेंडीची गोष्ट
आपल्या पूर्वजांनी म्हणींचा व वाक्प्रचारांचा खजिना आपल्यासाठी जपून ठेवला आहे. म्हणींचा हा खजिना आपले जीवन ऐश्वर्यसंपन्न करीत असतो. म्हणींची अनुभव संपन्नता जेव्हा आपण प्रत्यक्ष अनुभवतो तेव्हाच त्या म्हणीतील गहन अर्थ अधिकाधिक उलगडत जातो. अशीच एक म्हण 'कोंड्याचा मांडा करणे.' या वाक्प्रचाराचा अर्थ खऱ्या अर्थाने अनुभवला गोव्याच्या निसर्गसंपन्न भूमीत.
मी उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना घेऊन एक महिना गोव्याला गेले होते. गोव्याला असताना आमचे दुपारचे जेवण कंपनीतच बनविले जायचे आणि सकाळचा नाश्ता व रात्रीचे जेवण घरी होत असे. कंपनीत जेवण बनविण्यासाठी अगदी मोजकेच साहित्य व खाद्यपदार्थ असायचे. सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत मी व मुले दिलिप सोबतच कंपनीतच राहत असू. मुलांना मधल्या वेळात खाण्यासाठी चिवडा, बिस्किटे असे पदार्थ मी कंपनीत जाताना सोबत नेत असे. एके दिवशी कंपनीत दिलिपचे मित्र आले असता त्यांना चहाबरोबर चिवडा व बिस्किटे खाण्यास दिली त्यामुळे मुलांना दुपारच्या वेळेस खाण्यासाठी काहीच नव्हते. संध्याकाळी पाच वाजता माझी मुलं म्हणाली, "आई, खूप भूक लागली. आपण घरी जाऊ." अशी एकच रट लावू लागली. घर ते कंपनी हे अंतर जवळजवळ १२ ते १३ कि. मी. तसेच कंपनी पिसुर्लेयम या भागात असल्यामुळे तेथे वाहनांची कोणतीही सुविधा नव्हती. मी मुलांना घेऊन घरी जाणे शक्य नव्हते आणि दिलिपला कंपनी सोडून आम्हांला घरी पोचवणे शक्य नव्हते. कारण नेस्लेसारख्या कंपनीची ऑर्डर पूर्ण करून वेळेत बॉक्स पोचणे महत्त्वाचे होते. अशा या त्रिशंकू अवस्थेत असतानाच मी आमच्या खानसाम्याला बोलावले. त्याला विचारले, "किचनमध्ये पोहे, मुरमुरे आहेत का?"यावर तो म्हणाला, "मॅडम, नाश्त्याचे कुठलेच साहित्य नाही. फक्त डाळ, तांदूळ, पीठ व बटाटे, कांदे, हिरवी मिरची एवढेच साहित्य आहे." मी त्याच्याबरोबर किचनमध्ये गेले आणि गव्हाचे पीठ पाहताच मला आठवली आईने बनविलेली उकडपेंडी. लहानपणी आम्हांला दुपारी भूक लागली की, आई उकडपेंडी बनवून द्यायची. मी खानसाम्याकडून गव्हाचे पीठ घेतले आणि तेलात खरपूस भाजून घेतले. नंतर जिरे, मोहरी, कांदे, हिरवी मिरची, शेंगदाणे, बटाटे तेलात तळून हळद टाकून पाणी सोडले. पाण्याला उकळी येताच हळूहळू भाजलेले गव्हाचे पीठ टाकून चांगले हलवले. त्यात चवीनुसार साखर मीठ टाकून गरमगरम मुलांना, दिलिपला, भुपेशला व ध्रुवकुमार या सर्वांना खाण्यास दिले. सर्वांना कडकडून भूक लागली होती त्यामुळे गरमागरम उकडपेंडीवर सर्वांनी चांगलाच ताव मारला. सर्वजण उकडपेंडी खाऊन एकदम खूश झालीत. उकडपेंडी खाल्ल्यावर मुले मला म्हणाली, "आई, तू आपल्या घरी कधीच उकडपेंडी बनवले नाहीस? का?" त्यांना मग मी सांगितले, "आजसारखी कडकडीत भूक तुम्हांला कधीच लागली नव्हती म्हणून मी उकडपेंडी केली नव्हती." अर्थात माझे उत्तर त्यांच्या डोक्यावरून गेले.
पूर्वी म्हणजे तीस-पस्तीस वर्षांपूर्वी दुकानातून रवा विकत घेऊन उपमा, सांजा, तिखट रवा बनवणे अनेक गृहिणींना शक्य नव्हते तसेच खेडेगावात दुकानात रवा विकण्यासाठी ठेवला जात नसे. त्याकाळी घरातल्या गव्हाच्या पिठाची उकडपेंडीच घरोघरी बनविली जात असे. आज उपम्याऐवजी नाश्त्याला उकडपेंडी दिली तर सर्वचजण नाके मुरडतील. काळानुसार सर्वच काही बदलत असते. तेथे आपली जीभदेखील अपवाद नाही. काळानुसार चवीदेखील बदलल्या. आजच्या ग्लोबल खाद्यसंस्कृतीत अनेक नवे पदार्थ आपल्या ताटात विराजमान झालेत त्याचबरोबर अनेक खाद्यपदार्थ काळाआड गडप होऊ लागलेत.
वीस-बावीस वर्षापूर्वीची आईच्या हातची उकडपेंडी आठवून सारे बालपण डोळ्यांसमोर उभे राहिले आणि तीच उकडपेंडी खाऊन आज माझ्या मुलांना जी तृप्ती मिळाली ते पाहून मला मुळांची आठवण झाली. झाडाची मुळे कितीही खोलवर गेलीत तरी ती आपल्या फांद्यांना, फुला, फळांना जीवनरस पोचवण्याचे काम करीत असतात. माणसांचेही तसेच आहे. 'उकडपेंडी' हे काय आहे? हेच ठाऊक नसलेल्या माझ्या मुलांना उकडपेंडी खाऊन जे समाधान लाभले त्यामुळे मला 'कोंड्याचा मांडा करणे' या वाक्प्रचाराचा खरा अर्थ उमगला. घरात जे काही उपलब्ध असेल त्यानुसार चविष्ट पदार्थ बनविणे हेच खऱ्या गृहिणीचे, सुगरणीचे काम होय.
'उकडपेंडी' या शब्दाचे मला नेहमीच आश्चर्य वाटत असे. उकड घेणे माहीत आहे परंतु 'पेंडी' हा शब्द या उकडीला का जोडला तेच कळले नाही. पेंडी ही चाऱ्याची, गवताच्या भाऱ्याची असते मग तिचा या खाद्यपदार्थाशी संबंध कसा काय जोडला याचे मला नेहमीच आश्चर्य वाटत असते.
आज माझ्या मुलांनी ज्या उकडपेंडीवर जो ताव मारला तो त्यांनी घरी असताना कधीच मारला नसता, कारण आजच्या इतकी कडकडीत भूकही त्यांना कधी लागलीच नव्हती आणि आमचे पूर्वज सांगून गेलेत, 'भुकेला कोंडा नि निजेला धोंडा' हे तितकेच सार्थ होय. अशा या म्हणींचा खरा अर्थ अनुभवांतीच अधिकाधिक उलगडत जातो.
Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.