नखरेल लसूणी मेथी

                                           नखरेल लसूणी मेथी 

                  हॉटेलमध्ये जेवायला जाणे म्हणजे स्वतःला मूर्ख व बावळट बनवून घेण्यासारखेच होय . असे मला वाटते . कारण मेनू कार्डवरील पदार्थांची छान छान नावे वाचून तोंडाला पाणी सुटते आणि ऑर्डर दिल्यानंतर पुढयात आलेल्या पदार्थावर ताव मारण्याच्या उद्देशाने पहिला घास घेताच ऑर्डर दिलेल्या डिशच्या नावाचा आणि गुणांचा ताळमेळ घालणे म्हणजे एक महादिव्यच ठरते . तसेच आपल्यापुढे आलेला पदार्थ कसाही असला तरी त्याविषयी चकार शब्द बोलायचे नाही म्हणूनच की काय हॉटेल चालकांनी हॉटेल मँनर्स नावाची टूम काढलेली दिसते . आणि हॉटेल मँनर्स पाळत एक डीश आवडली नाही तर दुसऱ्या डीशची ऑर्डर देऊन आमचा धंदा तेजीत चालवा असेच तर हॉटेल चालक, मालक आपल्याला सांगत नाहीत ना! असे सारखे वाटत असते . 
               एकच पदार्थ वेगवेगळ्या हॉटेलमध्ये कसा मिळतो ? याचा सर्व्हे करायचे ठरवले तर त्या पदार्थाची मूळ चव सांगणेच कठीण होय . वेगवेगळ्या शहरातील पन्नास-साठ हॉटेलमध्ये खाऊन पाहिलेली लसूनी मेथीची डीश खाऊन पाहिल्यावर मी लसूनी मेथीची खरी चवच विसरून गेले . नाशकातील चांगल्या हॉटेल्समधून मागविलेली लसूनी मेथीची डीश कशी वेगवेगळ्या पद्धतीने सादर झाली हे सांगायचे झाले तर मेथीच्या डिशचे प्रदर्शनच भरवावे असे मला वाटते .        
              पाटील साहेबांनी हॉटेलमध्ये गेल्यावर लसूनी मेथीची ऑर्डर देताच मला धडकीच भरते . कारण त्यांना लसूनी मेथीच्या डिशमध्ये मेथीच्या पानांप्रमाणेच लसूणही डोळ्यात भरण्यासारखा असला तरच ती लसूनी मेथी, असे त्यांचे लसूनी मेथीचे समीकरण डोक्यात फिट्ट बसले आहे . मेथीची पाने व लसूण समप्रमाणात दिसली नाहीत तर महाशयाचं डोकं फ़िरलच म्हणून समजा. आणि मग वेटरला धारेवर धरण्याच्या बेतात असतानाच मुलं त्यांच्या वडिलांना सांगतात, "पप्पा , भाजी वेटरने नाही बनविली, कूकने बनविली. तुम्ही त्या बिचाऱ्या वेटरला काही धारेवर धरू नका." मुलांच्या या वक्तव्यावर मला मात्र हसावे की रडावे असे होऊन जाते. एकीकडे नवरा, दुसरीकडे मुलं नि मध्ये वेटर आणि या त्रिवेणी दृश्याची मी साक्षीदार. मुलांच्या वक्तव्यावर आमचे महाशय चांगलेच भडकतात नि म्हणतात, "मी एका डिशचे दोनशे अडीचशे रुपये मोजलेत तरी मी काहीही खायचे का ? मला जे पाहिजे ते देणे त्यांचे कर्तव्य आहे." परंतु आमच्याकडे प्रत्येक क्षेत्रात कर्तव्य आणि जबाबदारी या दोन शब्दांची कशी हकालपट्टी झाली आहे, हे मी माझ्या नवऱ्याला पटवून देऊ शकत नाही. त्यामुळे कधी वेटर, कधी हॉटेल मँनेजर, चालक, मालक असा कुणी ना कुणी महाभाग माझ्या नवऱ्याच्या तावडीत सापडतात. अर्थात भांडण वगैरे काही नसते. हॉटेल मॅनर्स पाळत बाजूच्या टेबलावरच्या खवय्यांनाही ऐकायला जाणार नाही अशा सौम्य शब्दात कानउघाडणी केल्याशिवाय माझ्या नवऱ्याला चैन पडत नाही. मी मात्र मनातल्या मनात तो सीन एन्जॉय करीत असते. 
               तर अशी ही लसूनी मेथी एका हॉटेलमध्ये माझ्यापुढे सादर झाली तीच मुळी लाल लाल टोमँटोची फुले माळूनच. तिचे हिरवेपण कुठे लुप्त झाले होते तेच मला कळेनासे झाले होते. ती माझ्या पुढयात आली तीच मुळी लालीलाल वेषातच. लसूनी मेथीतला लसून गायब होऊन टोमॅटोचेच प्रथम दर्शन झाले. अर्थात तेव्हा टोमॅटो दोन रुपये किलोनेदेखील बाजारात कुणी घेत नव्हते. त्याचा फायदा हॉटेल चालक उठवणार नाही तर कोण उठवेल ? शेतकऱ्यांचे टोमॅटो रस्त्यावर फेकले जाऊ नयेत याची काळजी घेत हॉटेलच्या कूकने सढळ हाताने टोमॅटोला लसूनी मेथीच्या स्वाधीन केले होते. 
              दुसऱ्या हॉटेलची तऱ्हा तर अजूनच निराळी. लसूनी मेथीची ऑर्डर देताच लसूनी मेथी आली तीच मुळी लसूणची साथ संगत सोडून. मेथीबाई आल्या त्या चक्क कांद्याबरोबर डान्स करीतच. अर्थात तेव्हाही कांदा तीस रुपये किलोवरून घसरत चार पाच रुपये किलोवर आल्यामुळे हॉटेलच्या कूकने मोठया उदार हस्ते लसूनी मेथीला कांद्याच्या सहवासात सोपविले होते. 
               बाजारात लसणाचे भाव १०० ते १२५ रुपये किलो असताना आम्ही हॉटेलमध्ये गेलो असता नवरेबुवाने नेहमीच्या सवयीप्रमाणे लसूनी मेथीची ऑर्डर देताच मी ओरडलेच, " आज लसूनी मेथी कॅन्सल. आज जर आपण लसूनी मेथीची ऑर्डर दिली तर आपल्या टेबलवर नक्कीच महाभारत घडेल आणि जेवणाचे तीनतेरा वाजलेत म्हणून समजाच." परंतु माझ्या नवऱ्याला लसूनी मेथीने चांगलेच पछाडलेले असल्यामुळे तो बायकोचे म्हणणे ऐकून तरी घेईल कसा! आणि शेवटी लसूनी मेथी जिंकली नि बायको हरली. मोठया तोऱ्यात मिरवत लसूनी मेथी आमच्यापुढे सादर झाली तीही चक्क वेषांतर करूनच. लसूनी मेथीतला लसूण चक्क शेंगदाण्याच्या रूपातच ठाकला. त्या हॉटेलमधील कूकच्या धोरणीपणाला मी सलामच केला. लसूनी मेथीतील लसूणने तर मेथीशी काडीमोड घेतलाच होता आणि तिचे शेंगदाण्याशी जे संगनमत झाले होते ते पाहता लसूणलाही कोडे पडले असावे की माझ्याच वेषात माझ्यासारखा असलेला हा महाभाग आहे तरी कोण? लसूनी मेथीतला शेंगदाणा लसूणच्या जागी विराजमान झालेला पाहून लसूणची हालतही आमच्या पुराणातल्या गौतम ऋषीप्रमाणे झाली असावी. अगदी लसणाच्या तुकड्याप्रमाणे शेंगदाण्याचे पांढरे तुकडे पाहून माझ्या नवऱ्याचा चांगलाच पारा चढला असता मी लागलीच म्हणाले, "महाशय, सव्वाशे रुपये किलो लसूणचा भाव असताना लसूनी मेथीची ऑर्डर देण्याची मूर्खता आपण केली त्यामुळे आपल्याला शेंगदाणा मेथी लसूनी मेथी समजून खाण्याशिवाय पर्याय नाही. आणि हो, मी आधीच लसूनी मेथीची ऑर्डर कॅन्सल करायला सांगितले होते त्यामुळे आता या टेबलवर महाभारत घडविणे शक्य नाही." शेंगदाणा मेथी आणि अजून दोन तीन डिशचा फज्जा उडवून हॉटेल बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही हे पती महाशयांनी ओळखले. त्यानंतर पुन्हा तीन चार महिन्यांनी एका हॉटेलमध्ये जाण्याचा योग आला. त्यावेळेस मेथीची छोटीशी जुडी २५ ते ३० रुपयाला मिळत होती. सवयीप्रमाणे फिक्स डिश लसूनी मेथी ऑर्डरमध्ये सामील होतीच. बाजारातल्या भावाचा अंदाज घेत मी मनातल्या मनात लसूनी मेथीची डीश कशी असेल? याचा विचार करू लागले. यावेळेस आमच्यापुढे सादर झालेली लसूनी मेथी अगदीच कृश झाल्यासारखी दिसली. नेहमीच्या मेथीच्या पानांचा आकार आणि रंग दोन्हीही वेगळाच नूर घेऊन आलेली. लसूनी मेथीचा पहिलाच घास इतका कडवट लागला की ती खाणे शक्यच नव्हते. ही मेथीची भाजी बनविणाऱ्या कूकला तर मी सलाम करण्याऐवजी लोटांगणच घातले. त्याने बाजारात मेथीचे भाव वाढलेत म्हणून चक्क कसूरी मेथीच पाण्यात भिजवून फोडणी देऊन आमच्यापुढे सादर केली त्यामुळे ती कडवट आणि करपलेली लागत होती. अर्थात अशा अनेक प्रकारच्या व अनेक तऱ्हेच्या चवीची लसूनी मेथी खाऊन आता हॉटेलमध्ये गेल्यावर लसूनी मेथीची ऑर्डर देण्याचे साहस न केलेलेच बरे असे समजून तिला रामराम ठोकण्यातच खरे शहाणपण होय. 
              आमच्या शहरात फूड इन्सपेक्टर हे पद का? व कशासाठी? हे एक कोडेच होय. शहरातील रेस्टारंटसचा दर्जा, तेथील पदार्थांची गुणवत्ता व दर याविषयी खवय्यांमध्ये जागरुकता कधी निर्माण होईल हे सांगणे कठीणच होय. हॉटेल्स, रेस्टारंटसचा प्राण असणारा ग्राहक, खवय्या मात्र दुर्लक्षित असतो. 
            अनेक हॉटेल्समधील लसूनी मेथी चाखून पाहिल्यावर लक्षात राहिली ती म्हणजे गोव्यातील फोंडा येथे एका हॉटेलमध्ये खाल्लेली लसूनी मेथी.   

Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या