मावस सासूबाईंची खव्याची पोळी
मावस सासूबाईंची खव्याची पोळी
लग्नानंतर मी व दिलीप दोघेही त्यांच्या मावस बहिणीकडे गेलो होतो. माझ्या मावस नणंद सौ. आशा अशोक मराठे या साक्रीला राहतात. त्यांच्या घरी आम्ही प्रथमच गेलो त्यामुळे त्या आम्हांला जेवणाचा आग्रह करीत होत्या परंतु आम्हांला जेवणासाठी थांबणे शक्य नव्हते; तेव्हा आम्ही फक्त चहा घेऊन निघतो असे सांगताच नणंदबाई म्हणाल्या, " जेवायला नाही थांबत; तर निदान नाश्ता तरी करावाच लागेल." असा दम दिल्यावर त्यांनी नाश्त्याची जी डिश दिली ती जेवणातल्या पदार्थांसारखीच भरून होती. नाश्त्याला चार-पाच पदार्थ दिले होते त्यातला एक पदार्थ मला खूप आवडला. मी नणंदेला विचारले,"ताई, तुम्ही दिलेली गोड पोळी खूपच छान आहे. फारच चविष्ट लागली. पोळी कशाची आहे?" मी असे विचारताच त्या म्हणाल्या, "वहिनी, खव्याची पोळी आहे. मुलांना खूप आवडते म्हणून आईने चांगल्या अर्धा किलो खव्याच्या पोळ्या कालच हेमंतबरोबर पाठवल्यात. मुलं दोन दिवसही पोळ्या राहू देत नाहीत. तुम्ही उद्या आल्या असतात तर तुम्हांला चवीलाही मिळाली नसती." "मग तर आम्ही नशिबवानच आहोत , सासूबाईंच्या हातची खव्याची पोळी खायला मिळाली." या प्रसंगानंतर माझ्या मावस सासूबाई दोन वर्षांनी माझ्याकडे आल्या असता त्यांना मी पहिला प्रश्न विचारला, "मावशी, तुम्ही खव्याच्या पोळ्या कशा करता? मला सांगा ना." माझ्या या प्रश्नाला मावस सासूबाईंनी चांगलेच झणझणीत उत्तर दिले, "साध्या पोळ्या येत नाहीत, मग काय गं शिकवलं तुमच्या आयांनी? कसं होईल माझ्या पोराचं!" अर्थात मीही त्यांचीच सून. मीही त्यांना गंमतीने म्हणाले, "मावशी आमच्या आयांना काहीच येत नाही, तरीही तुम्ही एवढ्या वर्षापासून आमच्या आयांबरोबर संसार कसा काय करीत आहात! आणि तुमच्या मुलांचं म्हणाल तर लग्नाआधी सुकडे बोंबील असणारे तुमची मुले चांगलेच गोलमटोल भोपळे झाले आहेत! त्यामुळे तुमच्या मुलांचं भलंच झाले आहे, तुम्ही काळजी करू नका." अशा या संवादानंतर आमची बरीच जुगलबंदी चालायची आणि घरात विनोदी वातावरण तयार होऊन जणुकाही हास्य संमेलनच सुरू व्हायचे. माझ्या या मावस सासूबाई घरी येत त्याच मुळी हास्याचे फव्वारे घेऊन. एकदाचे हास्य संमेलन आटोपले तेव्हा कुठे त्यांना खव्याची पोळी आठवली आणि खव्याच्या पोळीवरून सुरू झालेल्या हास्य संमेलनाची सांगताही खव्याच्या पोळीची पाककृती सांगूनच झाली.
मावस सासूबाईंनी सांगितल्यानुसार मी बाजारातून खवा आणून पोळ्या करून पाहिल्यात आणि सर्वांनाच खव्याची पोळी खूप आवडली. सर्व पोळ्या एकाचवेळी फस्त झाल्यात. गावाकडून सासूबाई, दीर, जेठ कुणीही आले तर मी माझ्या पुतण्यांसाठी खव्याच्या पोळ्या पाठवीत असे.
असेच एकदा ऑफिसच्या कामानिमित्ताने माझे अकोल्याचे दीर नाशिकला आले असता घरात फक्त चारच खव्याच्या पोळ्या डब्यात उरलेल्या होत्या. मी त्या चार पोळ्या दिरांकडे पॅक करून दिल्या. माझे दीर सकाळी सहा वाजताच अकोल्याला पोहचले त्याचवेळेस माझ्या पुतणीची शाळेत जाण्याची लगबग सुरू होती. दिरांना मी दिलेला खाऊ आठवला आणि त्यांनी लेकीला सांगितले, "काकूने, बघ तुझ्यासाठी खाऊ दिला." असे म्हणतच त्यांनी मी दिलेले पॅकेट बॅगेतून काढून तिच्या हातात दिले. माझी जाऊ म्हणाली, "बरे झाले आता डब्यात काकूचाच खाऊ घेऊन जा." जावेने त्याच पोळ्या तिला डब्यात घालून दिल्या. दुपारी माझी पुतणी शाळेतून घरी येताच माझ्या जावेला म्हणाली, " तू काकूला आत्ताच्या आत्ताच फोन करून विचार की, पोळ्या कसल्या होत्या?" जावेने फोनवर सर्व वृत्तांत सांगितला आणि मला म्हणाली,"ताई, फक्त तुमच्या बेटीपुरताच खाऊ नका पाठवत जाऊ, आमच्यासाठीही पाठवत जा." जावेला फोनवरच खव्याच्या पोळीची पाककृती सांगितली. अशाप्रकारे खव्याच्या पोळीचा प्रवास इकडून तिकडे चालूच राहिला.
अशीच एके दिवशी वृत्तपत्र वाचत असताना एका शीर्षकाने लक्ष वेधून घेतले. शीर्षक होते 'पाककृती पाठवा.' 'सकाळ' वृत्तपत्रातील पाककृती स्पर्धेविषयी वाचले आणि कोणती पाककृती पाठवावी असा विचार मनात येताच प्रथम आठवली ती खव्याचीच पोळी. क्षणाचाही विचार न करता कागद पेन घेतले नि खव्याच्या पोळीची पाककृती लिहून टपालाने पाठवून दिली. त्यानंतर मी खव्याच्या पोळीचे नाव अचानकपणे वृत्तपत्रात वाचले नि मला आश्चर्यच वाटले कारण पाककृती स्पर्धेविषयी मी विसरूनही गेले होते आणि वृत्तपत्रात लिहिले होते - या महिन्यातील उत्कृष्ट पाककृती 'खव्याची पोळी.' त्याच्यापुढे माझे नाव पाहून मी अचंबितच झाले. खव्याच्या पोळीला त्या महिन्यातील उत्कृष्ट पाककृतीचे शंभर रुपयांचे बक्षीस मिळाले होते. ही घटना १९९४ सालातली. या घटनेनंतर काही दिवसांतच माझी भेट माझ्या मावस सासूबाईंशी झाली असता त्यांना सांगितले,"मावशी, तुम्ही सांगितलेल्या खव्याच्या पोळीला शंभर रूपयांचे बक्षीस मिळाले" हे ऐकून त्यांना खूपच आनंद झाला. मी त्यांना शंभर रूपये देऊ करताच त्यांनी ते घेण्यास साफ नकार दिला. त्या मला दटावतच म्हणाल्या, "ते तुझ्या कष्टाचे आहेत. मी कसे घेणार?" मी त्यांना सांगितले, "मी फक्त आयत्या पिठावर रांगोळी काढली." मी असे म्हणताच त्या माझ्यावर चांगल्याच बरसल्या, "काय! तू मला शहाणपणा शिकवतेस. मी दहा वर्षाची होते तेव्हापासून स्वयंपाक करीत आले आहे. खव्याची पोळी म्हणजे काय तोंडाची वाफ दवडली की झाली आणि खाल्ली असे वाटते का तुला!" अर्थात त्यांच्यापुढे सपशेल माघार घेण्याशिवाय आम्हांला पर्यायच नसे. आम्ही सर्वजण आमच्या या सासूबाईंना नारळाची उपमा द्यायचो. नारळासारख्या वरून कठीण आणि आतून मृदू, गोड असे हे व्यक्तिमत्त्व जरी आज आमच्यात नसले तरी त्यांचे प्रेम आणि गडगडाटी हास्य विसरायचे म्हटले तरी विसरू शकत नाही. 'माणसांसाठी भुकेलेला आत्मा' हेच बिरूद मी त्यांना बहाल केले होते. त्यामुळे भुकेलेल्या माणसाला खव्याची पोळी दिली असता माझ्या या सासूबाईंचा आत्मा नक्कीच तृप्त होत असेल यात शंकाच नाही.
'खव्याची पोळी' म्हणताच मावस सासूबाईंची मूर्ती डोळ्यांसमोर येते तीच मुळी निखळ हास्याने फुललेला प्रफुल्लित चेहरा घेऊनच. आजही खव्याच्या पोळीप्रमाणेच गोड स्मृतींच्या रूपात त्या आमच्यात आहेत असा भास होतच असतो. श्रीमती इंदिरा बेडसे पाटील या माझ्या मावस सासूबाई स्मृतीरूपाने सतत आमच्याजवळ राहणार यात शंकाच नाही.
Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.