पानीमा बुडिसन मरी का जायेना

सर्व साहित्य रसिकांना, वाचकांना प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
सव्वीस जानेवारी म्हणजे एका मुलीने स्त्रीत्वाची कशी किंमत चुकवली याची जाणीव करून देणारा दिवस. दुसऱ्यांचा जीव वाचवणाऱ्या मंगलला कधीच कुठला पुरस्कार मिळाला नाही आणि पोहण्याची आवड कशी धडपून टाकावी लागली याचे वाईट वाटत असते. अशा या मंगलची ही कहाणी. 
                   
                                                    पानीमा बुडिसन मरी का जायेना 

            २६ जानेवारी जसजसा जवळ येतो तसतशी मला तिची हमखास आठवण येते . तिची आठवण येण्याचे कारण म्हणजे तीस बत्तीस वर्षापूर्वी मी पाण्यात पडले आणि मला पोहता येत नसल्यामुळे मी गटांगळ्या खात असताना तिने पाण्यात उडी घेतली आणि माझी मानगूट पकडून मला पाण्यातून बाहेर काढले . अर्थात तिने मलाच पाण्यात  बुडता बुडता वाचवले असे नाही तर धुणे धुता धुता जी कोणी स्री किंवा मुलगी पाय घसरून पाण्यात पडली  की हिने क्षणाचाही विचार न करता उडी घ्यायची  आणि बुडणाऱ्याला वाचवायचे आणि ओल्या कपड्यानिशी घरी पोहोचताच घरच्यांची बोलणी खायची .  
         तीस बत्तीस वर्षापूर्वी ब्राम्हणगावासारख्या (ता. सटाणा, जि. नाशिक) छोटयाशा खेडयात सदोदित वाहणाऱ्या पाटाच्या (कालव्याच्या) पाण्यात ती पोहायला शिकली आणि लहानपणी सर्वजण तिला पोहता येते म्हणून कौतुक करायचे . तिला पोहण्याचे वेडच लागले . खूप वेळ श्वास रोखून ती पाण्यात गायब व्हायची . उडी मारलेल्या ठिकाणी आम्ही तिला पाहायचो परंतु ती मासळीसारखी खूप लांब जाऊन पोहोचायची मग आम्ही आश्चर्याने तिच्याकडे पाहायचो . लहान असेपर्यंत ती मुलांबरोबर पोहण्याची स्पर्धा करीत असे परंतु वयात येताच घरच्यांनी तिला सक्त ताकीद दिली आणि तिचे पोहणे बंद झाले . पाटावर कपडे धुवायला आली की तिला पोहण्याचा मोह काही आवरत नसे आणि एक डुबकी मारून ती घरच्यांची बोलणी खायला सज्ज असायची . त्यातच एखादी स्री किंवा मुलगी पाण्यात पडली तर मग तिला आयतीच पोहण्याची संधी मिळायची . बुडणाऱ्याला वाचवायचे आणि मग त्यादिवशी मनसोक्त पोहून घ्यायचे कारण घरच्यांना सांगायला तिला एक भक्कम कारण मिळायचे त्यामुळे त्यादिवशी घरी ओल्या कपड्यानिशी गेले तरी कुणी काही बोलताच ती म्हणायची , " मी अमुक अमुक स्रीला ,मुलीला वाचवले . " त्यामुळे घरच्यांना गप्प बसण्याशिवाय पर्याय नसे . ती नदीवर आली की आम्ही गमतीने म्हणायचो , "आता ही कुणाची पाण्यात बुडायची वाट पाहते." कधी कधी ती जाम चिडायची मग धमकी दयायची , " कुनी  पानिमा बुडीसन मरी का जाये ना , माले काय करानं शे ." अर्थात तिचे हे बोलणे वरवरचे आहे हे आम्हांला चांगलेच ठाऊक होते . कुणी पाण्यात बुडणे म्हणजे तिला पोहायला मिळण्याची संधी होय हे साऱ्या गावाला ठाऊक होते . 
             आज मुलींना पोहता यावे म्हणून काळजी घेणारे आईवडील पाहीले की मला बुडता बुडता वाचवणारी ' मंगल ' आठवते . तिला पोहता यावे म्हणून कुणी आटापिटा केला नाही किंवा तिच्या पोहण्याचे कुणी कौतुक केले नाही किंवा तिला जिल्हास्तरीय , राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत पाठविण्याचा खटाटोपही कुणी केला नाही .दुसऱ्यांना जीवदान देणारी  एक जलतरणपटू अशी अंधारातच राहिली याची खंत २६ जानेवारीच्या निमित्ताने नेहमीच वाटत असते .   

Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या