माझ्या उद्योगाविषयी घरादाराचे शेरे
माझ्या उद्योगाविषयी घरादाराचे शेरे
लहरी मना, थांब ना जरा,
असे मी कितीही म्हटले तरी ते लहरी, चंचल मन मात्र थांबण्याऐवजी सुसाट धावत असते नि जे काय करायचे ते करून मोकळे होत असते. नुकतेच सहा महिन्यापूर्वी माझ्या मुलाचे व मागच्या महिन्यात मुलीचे लग्न होताच मी सगळ्यांना सांगितले, "मी या प्रदर्शनात फूड स्टॉल टाकणार आहे." झालं, जे व्हायचे तेच झाले. सगळ्यांचा एकच प्रश्न, "तुला दमायची हौस आहे का?" मी एखाद्या गोष्टीची घोषणा करताच माझ्या लहान बहिणीला चांगलीच धडकी भरत असते. मी कोणतीही गोष्ट करायचे म्हटले की, सर्वात जास्त टेन्शन येते ते म्हणजे माझी लहान बहीण शारदा पवार हिला! मी काही करायचे म्हटले की, तिचा पहिला प्रश्न असतो, "तुला काय गरज आहे असले उद्योग करायची?" मला तिच्या या प्रश्नाचे नेहमीच हसू येत असते. मी तिला गंमतीने म्हणत असते, "उद्योग मी करते नि तुला टेन्शन का येते!" यावर ती जाम चिडते, "तू सगळ्या घरादाराला तुझ्या उद्योगात गुरफटून वैताग आणित असते." अर्थात हे ती गंमतीने म्हणत असते पण मी काहीही करायचे ठरवले की, तिला बयेला टेन्शन आलेच. याउलट तिची मुलं, "हो गं मावशी, तू कर तुला जे करायचे ते. आयुष्य एकदाच येते, मनांत जे आले ते करून मोकळे व्हायचे नंतर कुढत बसायचे नाही. मला हे करायचे होते नि ते करायचे होते." माझे मेहुणे मात्र बहिणीला हळूच सांगणार, "ए शारदा, तू बाईंना सांग उगीच त्रास करून घेऊ नका म्हणा!" बहिणीच्या घरात माझ्या उद्योगांविषयी ही तऱ्हा तर माझ्या घरी भलतीच तऱ्हा!
माझा नवरा म्हणतो कसा, "एक रुपया कमवायचा नाही नि नसते उद्योग करून आम्हांला त्रास द्यायचा." नवऱ्याचा गंमतीदार शेरा ठरलेला तर मुलगा व मुलगी दोघेही सूचनासत्र सुरु करून मलाच प्रश्न पडतो मी यांची आई आहे की हे माझे आई आहेत. परीक्षेला जाताना त्या दोघांना दिलेल्या सूचनांचे उट्टे काढून मी दिल्या नसतील त्याच्या चारपट सूचना ऐकणे मला भाग पडते. आता तर त्यात सूनबाईचीही भर पडली. मग काय बघायलाच नको!
यानंतर माझ्या उद्योगाचा तिसरा अध्याय सुरु होतो तो म्हणजे माझ्या माहेरी. माझी आई म्हणणार, "तुझ्या मनात आले की, तू ते करणार. तुला सांगून काही उपयोग नाही." माझे वडील मात्र पहिला प्रश्न विचारणार, "तू दादांना विचारले का?" त्यांच्या या प्रश्नावर त्यांची नि माझी खडाजंगी ठरलेली असायची, "उद्योग मी करायचे नि परवानगी दादांची घ्यायची हा कुठला न्याय!" पुरुषप्रधान संस्कृती विरुद्ध स्त्रीप्रधान संस्कृती यावरून खडाजंगी झाल्यावर मग आम्ही दोघेही लोकशाही तत्त्वावर येऊन ठेपायचो, एकमेकांच्या संगनमताने निर्णय घेणे म्हणजेच 'लोकशाही' होय. त्यांनी असे म्हणताच मीही हसून म्हणायचे, "आली तुमची 'लोकशाही' लक्षात! नुसती लोकशाहीच नाहीतर संपूर्ण नागरिकशास्त्राचे पुस्तकच तोंडपाठ झाले आता! आता मात्र हिटलरची, मुसोलिनीची हुकूमशाही, एकाधिकारशाही सांगून महायुद्धाला तोंड नका फोडू." मी असे म्हणताच ते मला म्हणायचे, "बस्स, पुरे आता आपला विषय! मला एक सांग दादा 'हो' म्हणालेत ना! मग काही हरकत नाही." त्यांनी असे म्हणताच मी डोक्याला हात लावून घ्यायची "शेवटी पृथ्वी गोल आहेच ना!" याउलट आमचे बंधूराज,"तू जाणे नि तुझे दादा!" यानंतर आमच्या वहिनीसाहेब चारूशीला पाटील, "बाई, हे सगळं तुम्हीच करू शकता. तुम्ही करा. मी येतेच मदतीला." माझे दोघे भाचे म्हणणार, "हे आत्या काय भारी ना! तुझ्या डोक्यात या सगळ्या आयडिया येतात कुठून!"
यानंतरचा चौथा अध्याय तसा आटोपशीरच असतो तो म्हणजे माझी लहान बहीण पूजा मराठे हिचा. ती एवढेच म्हणेल," ए बाई तुला सगळे जमेल ना! काही त्रास नाही ना होणार! तिच्या दादांना मात्र सगळं काही झाल्यावर बातमी कळते त्यामुळे ते म्हणतात, "अरे, मला कुणीच बोलले नाही." "तुम्हांला वेळ आहे का? असा बहिणीचा लटका रुसवा त्यांना ऐकावा लागतो. तिची दोघे कार्टून्स तिलाच म्हणणार, "बघ, ती बाई मावशी नाहीतर तुम्ही दोघी बहिणी." असे हे एक एक अध्याय पार पाडत मग कुठे माझ्या नव्या उद्योगाला सुरवात होत असते.
Too good👍
ReplyDeleteधन्यवाद!
DeleteGreat !!
ReplyDeleteThanks
Delete