गरीबी शाप की वरदान

गरीबी शाप की वरदान 
          २९ डिसेंबर २०१८ ला माझ्या लेकीचे लग्न झाले आणि लग्न यशस्वी व्हावे म्हणून ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांची देणी देण्याचे काम चालू असताना माझ्या घरात काम करणारी माझी मदतनीस गीता समाधान अंभोरे हिला मी पैसे देत असताना तिने चक्क पैसे घेण्यास नकार दिला. ती काही केल्या पैसे घेण्यास तयारच होत नव्हती. मी खूप आग्रह केला तरीही ती पैसे घेईना. ती मला म्हणाली,"ताई, मी ताऊ दीदीच्या लग्नात काहीच काम केले नाही म्हणून पैसे घेणार नाही." कारण लग्नाच्या वेळेस आठ दिवस केटरर्सकडूनच जेवण येत असल्यामुळे व जेवणासाठी पत्रावळींचाच उपयोग केल्यामुळे आमच्या गीताला भांडी धुण्याचे कामच नव्हते. रोजच्याप्रमाणे थोडीफार भांडी घासण्यासाठी असायची त्यामुळे तिने यावेळेस पैसे घेण्यास साफ नकार दिला तेव्हा तिचे मला खूपच कौतुक वाटले. एक अशिक्षित स्त्री की, जिला आपल्या कामाचे मूल्यमापन करता येते नि याउलट आमच्या देशातील सरकारी नोकरदार वर्गाला आपण घेत असलेल्या पैशाचे मूल्यमापन का करता येत नाही? मला सरकार ज्या कामासाठी पैसे देते ते काम मी चोखपणे पार पाडावे असे का वाटत नाही. सरकारच्या पैशावर मजा करायची नि काम करताना मात्र कामचुकारपणा (वीस टक्के सरकारी नोकर मात्र याला अपवाद आहेत, हे नजरेआड करून चालणार नाही.) करणाऱ्या महाभागांना गीताचे उदाहरण म्हणजे झणझणीत अंजन होय. आज माझ्या या मदतनीसला खरे तर पैशांची खूप गरज आहे. तिचे किडनी स्टोनचे दोन दिवसांनी ऑपरेशन आहे. तिला पंचवीस-तीस हजार रुपये डॉक्टरने खर्च सांगितलेला असतानाही ती माझ्याकडून पैसे घेण्यास नकार देत होती तेव्हा मला जे वाटले ते मी शब्दांत नाही सांगू शकत! 
          परिस्थितीने गरीब असणारी माणसं आपल्या व्यवसायाशी इतकी प्रामाणिक कशी काय असू शकतात! आमच्या घरात गीताला एक वेगळेच स्थान आहे पण आज मात्र तिने माझ्या हृदयात जे स्थान मिळवले त्याला तोड नाही. गीताला ऑपरेशनसाठी पैशांची गरज आहे त्यामुळे तिला पैसे घेण्यास भाग पाडले पण तिला मात्र ते पटत नव्हते. खरंच अशी माणसं आपल्या आजूबाजूला असतात तेव्हा ते आपल्यालाही नकळत समृद्ध करून जात असतात नि पुन्हा 'गरीबी शाप की वरदान' हे कोडे मात्र पुनःपुन्हा विचारांचा भुंगा घोंघावीत राहतो. 
             कर्म करीत राहा, फळाची अपेक्षा करू नकोस हे गीतेतलं तत्त्व अंगी बाळगणारी व 'गीता' या नावाला सार्थ करणारी गीता मला खूप भावली.                                       

Comments

  1. खरंय...अशी गीता तुला लाभली...हे ही किती छान.

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच् ती खूप समंजस व जीव लावून काम करणारी आहे. धन्यवाद सखी.

      Delete
  2. मनापासून धन्यवाद सर!

    ReplyDelete

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या