मुलांचे बालपण संपल्याची जाणीव करून देणारा दिवस

         मुलांचे बालपण संपल्याची जाणीव करून देणारा दिवस 
      
             सर्व रसिक वाचकांना काल मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊ शकले नाही त्याबद्दल क्षमा असावी . वरवर शुभेच्छा देणे मला खरेच जमत नाही कारण काल मी स्वतःच दिवसभर वेगळ्या विचारात होते. काल मी दिवसभर माझ्या मुलांचे बालपण आठवण्यात इतकी मग्न होते की कुणालाही शुभेच्छा पाठवू शकले नाही. 
                चार- पाच दिवसांवर मकर संक्रांत आली की आमच्या कॉलनीत पतंग उडवणारी मुले घरासमोरचे पटांगण दणाणून सोडायची. चि. स्वप्नील व चि. पूर्ती जसे चालायला लागलेत तसे त्यांना बाहेर पतंग उडवणारी मुले दिसलीत की, त्यांच्या बाबांना पतंग आणायला सांगायची आणि त्यांचे बाबा डझनभर पतंग आणून द्यायचे. मग दोघे मला लाल रंगाची पतंग हवी तर कधी मला हिरवी पतंग पाहिजे अशी तुतुमैंमैं करीत पतंगांची वाटणी करायची नि दोघे आपापल्या पतंग वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून एक एक पतंग हातात घेऊन बाहेर पडायची. दोघेही दिवसभर फक्त हातात पतंग घेऊन फिरायची. हात वरती करून पतंग उडवायला जायचे तर ती पतंग त्यांच्या तोंडावरच पडायची. पुनःपुन्हा हात वरती करून त्यांचे हात दुखायला लागायचे नि त्यातच पतंगांच्या काड्यांचे तोंडाला ओरखडे पडायचे पण त्यांना त्याचे भान नसायचे. त्यांची पतंग उडवण्याची धडपड पाहून कुलकर्णी बाईंचा नितिन, महेकर मॅडमचा संदीप, सोमू, त्या दोघांची पतंग उडवून द्यायची नि मग त्यांना फक्त हातात मांजा पकडायला द्यायचे. त्या दोघा भावंडांना खूप आनंद व्हायचा पण मोठी मुलं पुन्हा त्यांची पतंग उडवण्यात गर्क व्हायची तेव्हा या दोघांची पतंग धप्पकन जमिनीला शरण यायची नि मग दोघं बहीण भावांची तोंडं पाहण्यासारखी व्हायची. दोघे पुन्हा हिरमुसायची. दिवसभर ती मोठ्या मुलांच्या मागे पतंग घेऊन फिरत राहायची. त्यांची पतंग उडवण्याची सर्व धडपड मी कधी गॅलरीतून पाहायची तर कधी स्वयंपाक करताना खिडकीतून पाहायची नि खूप वाईट वाटायचे. स्वप्नीलला व पूर्तीला कधी एकदाची पतंग उडवता येईल असे वाटायचे. जवळजवळ पाच सहा वर्षे दोघे बहीण भाऊ प्रत्येक मकर संक्रांतीला महिनाभर पतंग हातात घेऊन फिरत राहायची आणि एके वर्षी तो दिवस उजाडला नि त्यादिवशी मला, स्वप्नीलला व पूर्तीला जो आनंद झाला तो आनंद मी कशातच मोजू शकत नाही. संक्रांत तीन-चार दिवस पुढे होती आणि मी स्वयंपाकघरात नेहमीप्रमाणे स्वयंपाक करीत असताना माझे अर्धे लक्ष स्वप्नील व पूर्तीच्या पतंग उडवण्याच्या धडपडीकडे होते. स्वप्नीलची पतंग आकाशात झेपावताच पूर्तीने जोरात टाळ्या पिटाळल्यात  नि मोठ्याने स्वप्नील व पूर्ती ओरडले, "आई, आमची पतंग उडाली." स्वप्नीलची पतंग आकाशात उडताच मी धावतच गॅलरीत पळाले नि कितीतरी वेळ कौतुकाने त्या पतंगाकडे व मुलांकडे पाहत राहिले. गॅसवरची पोळी जळाल्याचा वास येताच स्वयंपाकघरात पळाले. त्यादिवशी दोघे बहीण भाऊ पतंग उडवण्यात इतके मग्न झालेत की, जेवण करायलाही यायचे नाव घेत नव्हते. त्यांना बळजबरीने जेवणासाठी आणावे लागले. त्यावर्षी पूर्तीने फिरकी पकडायची नि स्वप्नीलने पतंग उडवायची मध्येच थोडा वेळ पूर्तीच्या हातात पतंग देऊन ढील कशी द्यायची हे शिकवायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी पूर्तीलाही पतंग उडवता यायला लागली. मग काय दोघे बहीण भावाची स्पर्धा सुरू व्हायची कोण जास्त पतंग काटतं! स्वप्नीलला मंगळसूत्र बांधायचा सगळ्यात जास्त कंटाळा यायचा मग तो पूर्तीला म्हणायचा, "ताऊ (पूर्तीचे टोपणनाव), मला मंगळसूत्र बांधून दे ना," मग काय पूर्ती बराच भाव खायची नि मग कुठे त्याला मंगळसूत्र बांधून द्यायची. 
                दोघे बहीण भाऊ दुसरी तिसरीत होते तेव्हापासून पतंग उडवू लागलीत नि संपूर्ण जानेवारी महिना त्यांचा पतंगमय होऊन जायचा. बाजारात पतंग येण्यापूर्वीच ते दोघे बहीण भाऊ घरी पतंग बनवून घरासमोरच्या पटांगणात पतंग उडवायची नि मकर संक्रांतीच्या दिवशी मात्र सकाळपासूनच टेरेसवर जाऊन पतंग महोत्सव सुरु व्हायचा नि दिवसभर मी त्यांना भजी, चिवडा, फरसाण, लाडू  यासारखे पदार्थ खाण्यासाठी नेऊन देण्याचे काम करायची कारण स्वप्नील, पूर्ती, राहुल, चिराग, सोमू, नितिन, कैलास, पशु, मनिष अशी सर्व लहानमोठी मुले एकच दंगा करायची. 'चली चली रे पतंग' चे सूर मोठ्या आवाजात निनादायचे नि त्यातच समोरच्या बिल्डिंगमधील एखाद्याची पतंग काटताच जो आरडाओरड व्हायची त्याविषयी न विचारलेलेच बरे! पतंग कुणी काटली याविषयी काहीच देणेघेणे नसायचे पण समोरच्या बिल्डिंगमधल्या खिलाडीची पतंग काटण्याचा आनंद काही औरच असायचा. खरंच कोणत्याही खेळात एकोप्याची किती जादू असते हे अशावेळेस लक्षात येते. खेळातली सांघिक भावना खूपच प्रबळ असते. एरव्ही एकमेकांची उणीदुणी काढणारी सोसायटीतील बालगोपाल मंडळी त्यादिवशी सगळे विसरून एक होऊन जी धमाल करायचे त्याला तोड नसायची. 
               एखाद्या संक्रांतीला माझ्या लहान बहिणीची मुले यायची तेव्हा तर स्वप्नील पूर्तीला चांगलाच उत्साह यायचा. 
               मुलांनी इयत्ता बारावीपर्यंत प्रत्येक मकर संक्रांतीला जल्लोष केलेला नि त्यानंतर ती पदवी शिक्षणासाठी पुण्याला गेलीत तेव्हा तेथील मकर संक्रांतीला कुणीच पतंग उडवताना दिसले नाहीत तेव्हा ती फार हिरमुसली नि स्वप्नील, आशू, पूर्ती, वत्सल, विनू हे सर्वजण एकत्रित जमले असता मकर संक्रांतीचा विषय निघताच म्हणतात कसे, "अरे यार, काय धम्माल करायचो आपण. किती पतंग काटायचो. पुण्याला तर काहीच नाही." 
                पूर्तीला पतंग उडवता येते हे माहीत झाल्यावर तिच्या कॉलेजमधील मित्रमैत्रिणींना खूप आश्चर्य वाटायचे, तिचे मित्र तिला म्हणायचे, "पूर्ती, एक तो खेल हमारे लिए छोड यार! पतंग उडाना, गिल्ली डंडा, क्रिकेट तुझे क्या लडकों के ही खेल खेलना आता हैं क्या!" कारण तिच्या कॉलेजमधल्या खूप मुलांना पतंग उडवता येत नव्हती त्यामुळे ते तिला चिडवायचे. 
                 पूर्तीला जसे कळायला लागले तसे ती स्वप्निलच्या मागेच फिरत राहायची आणि स्वप्नीलचे मित्र हेच तिचे मित्र बनलेत नि त्यांनाही ती मुलगी आहे असे कधीच वाटले नाही. त्यात अजून भर म्हणजे माझ्या माहेरीही ती एकटीच मुलगी. आमच्या शेजारच्या महेकर मॅडम तिला 'टॉम बॉय' म्हणायच्या. आमच्या सोसायटीत सगळी मुलेच होती नि त्यात पूर्ती एकटीच मुलगी त्यामुळे तिचे बालपण स्वप्नीलने व त्याच्या मित्रांनी व तिच्या सर्व भावंडांनी खऱ्या अर्थाने समृद्ध केले. 
                  आज मात्र पतंग उडवणारी पूर्ती हळदीकुंकवाची तयारी करीत होती नि स्वप्नील बायकोला घेऊन सातासमुद्रापार संसारासाठी धडपडू लागला. आजचा दिवस म्हणजे मुलांचे बालपण खऱ्या अर्थाने संपले. याची सारखी जाणीव करून देत होता. दिवसभर डोळ्यांसमोरून मेरी (नाशिक) येथील जुने घर व तेथील मुलांचे बालपण आठवत होते. कशातच मन लागत नव्हते. जेथे मनच थाऱ्यावर नसते तेव्हा शुभेच्छा देणे हा नुसता कोरडा उपचार ठरतो.                                                                                       

Comments

  1. लेख वाचतांना लहान पण देगा देवा ह्या
    म्हणीची आठवण झाली ..
    खरचं अप्रतिम लेख



    शारदा पवार

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद।

      Delete

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या