कुटुंबातील रँगिंग
कुटुंबातील रँगिंग
अनेक कुटुंबात नव्या नवरीचे कौतुक वगैरे करण्याची फारशी पद्धत दिसत नाही. नवी नवरी घरात आली आणि कांकण सुटले की तिने कामाला लागले पाहिजे असा दंडक असतो. अठ्ठावीस वर्षांपूर्वी अशाच एका नवरीला कांकण सुटताच कामाला लागावे लागले. कांकण सुटताच नव्या नवरीला फर्मान सोडण्यात आले वांग्याची भाजी करण्याचे. सासूबाईंनी नव्या नवरीकडे दीडएक किलो वांगी सुपूर्द केलीत. माहेरी आईकडे असताना वांगी म्हणताच तिच्या तोंडाला पाणी सुटायचे आणि सासरी मात्र सासूबाईने वांगी तिच्या हाती देताच तिच्या तोंडचे पाणीच पळाले शिवाय त्या वांग्यांच्या काटयांचे अक्राळविक्राळ रूप पाहून तर चांगलीच बावरली बिच्चारी ... आता मात्र आलिया भोगासी .... याशिवाय पर्यायच नव्हता.
नाटयाभिनय करून इतिहास शिकविणाऱ्या बाईंचे शिकविणे तिने जितक्या तन्मयतेने अनुभवले तितक्याच तन्मयतेने तिने वांगी कापण्यास सुरूवात केली परंतु काही नाठाळ वांग्यांनी मात्र जो इंगा दाखवायचा तो दाखविलाच. टचकन बोटात खुपसणाऱ्या काटयांनी टचकन तिच्या डोळ्यात पाणी आणले आणि सासर - माहेर यातलं अंतरही तिला जाणवून दिले. जणुकाही तिने वांग्यांची चिरफाड केली होती म्हणून वांगीही तिच्यावर जाम वैतागली होती. त्यांनी त्यांचा सर्व वैताग तिच्या बोटात काटे खुपसून काढला त्याबरोबर तिच्या डोळ्यात पाणी आले नि जणुकाही ती वांगी तिला वेडावून दाखवित होते, ' बाईसाहेब, आमची चिरफाड करायला नुसती तन्मयता कामाची नसून त्यासाठी अंगी कौशल्य पण बाणवावे लागते.' वांग्यांच्या वेडावण्याला चांगलाच हिसका दाखवायचाच असा निर्धार करीतच तिने पदर खोचला नि नवीन घरात, नवीन स्वयंपाकघरात, नवीन माणसांमध्ये ती कामाला लागली.
तिने वांग्यांना एकदाचे चांगले कापून काढले आणि बाजूला ठेवून दिले. बोटाला इजा करणाऱ्या वांग्यांना झणझणीत मसाल्यात चांगलेच घोळवायचे असा निर्धार करीतच ती मसाला तयार करण्याच्या तयारीस लागली पण नेमकी सुरूवात कुठून करायची हेच कळेनासे झाले. जाऊबाई तर फक्त शेंगदाणे व मसाल्याचा डबा तिच्या हवाली करून नदीवर कपडे धुण्यास निघून गेल्यात. शेंगदाणे किती घ्यायचे व मसाला किती टाकायचा! घरात कुणाला विचारावे? असा प्रश्न तिला पडला. सासूबाईंना विचारावे तर सगळ्यांसमोर अपमान करायच्या. मोठया जावेला विचारावे तर सर्वांसमोर आईचा उद्धार करायच्या. त्यापेक्षा जे होईल ते असे मनाशी म्हणतच तिने मनानेच शेंगदाणे घेऊन चांगले खरपूस भाजून काढलेत व त्यात मसाला, मीठ, हळद घालून चांगले तेल सुटेस्तोवर शेंगदाणे कुटून वांग्यांचा मसाला तयार केला. शेंगदाण्याचा मसाला वांग्यांमध्ये भरून गरम तेलात वांग्यांना सोडून तिने सुटकेचा निःश्वास सोडला. वांगी चांगली तेलात परतल्यावर हळूच गरम पाणी सोडले नि चर्र .... आवाज होताच तिच्याही छातीत चर्र ... झाले. बाप रे! वांग्यांची भाजी तर केली स्वतःच्या मनाने पण खाणारी तोंडे पंधरा - सोळा! पुढे काय काय ऐकावे लागेल. या विचारसरशी तिला धडकी भरली. एकदाची पुरूष मंडळी जेवायला बसताच घरातील समस्त महिला वर्गाचे कान टवकारलेत, नव्या नवरीच्या हातची भाजी कशी झाली! हे जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. घरातील पुरूष मंडळींनी वांग्याच्या भाजीचा चांगलाच फडशा पाडला आणि शेवटी मोठे जेठ म्हणाले, "आज भाजी छान झाली, कुणी केली." मोठया जेठने भाजीला दिलेले सर्टिफिकेट तिला कॉलेजच्या सर्टिफिकेट इतकेच मौल्यवान वाटले नि मणामणाचं ओझं उतरल्यासारखं झालं. दोन तीन तासांपासूनचा ताण एकदम हलका झाल्यासारखं झालं . तिच्या जेठने भाजीला छान! स्वादिष्ट! असे सर्टिफिकेट बहाल करताच बोचलेल्या काट्यांचं दुखणं लागलीच दूर पळाले.
कॉलेजच्या रँगिंगचा अनुभव नसलेल्या तिच्यासारख्या युवतीला कुटुंबातल्या या रँगिंगचा अनुभव चांगलाच सुखावून गेला. कुटुंबातल्या रँगिंगमुळे तिच्या जीवनाची पाठशाळा चांगलीच नावारूपाला आली. अर्थात ही पाठशाळा नावारूपाला येण्याकरिता अनेक काट्यांचा अडथळा तिला पार करावा लागला. आज तिला हे काटे बोचत तर नाहीत उलट ती म्हणते, "वांग्यांची बोच अक्युप्रेशरचं काम करून जीवन सुसह्य करीत आहेत,याचा आनंद होतो."
आजही तिला वांग्याची भाजी खायला जितकी आवडते तितकीच ती बनवून दुसऱ्याला खाऊ घालायलाही आवडते.
मॅडम या सुनबाई ने जेव्हा हे challenge स्विकारले, खरं म्हणजे तेव्हाच ती ते जिंकली होती. पण खरं सांगायचं तर मी सुद्धा वाचता वाचता घाबरत होतो की भाजी नेमकी कशी झाली असेल.
ReplyDeleteछान लेखन करता आपण.
मनापासून धन्यवाद सर,
Delete
Nice lines
ReplyDeleteNice
ReplyDeleteThanks
DeleteMadam tumcha lekh vachat astanach sare kahi aplya dolyansamor pratyakshat ghadtay asa bhas amha vachkanna hoto
ReplyDeleteDhanyavad!
Delete