आदर्श राजकीय व्यक्तिमत्त्व -  श्रीनिवास पाटील सर
         
               डिसेंबर २०१७ ला आमच्या साहेबांनी सिक्कीम ट्रीपचे बुकिंग केले आणि दोन गोष्टी डोळ्यांसमोर आल्यात त्या म्हणजे सिक्कीमचा निसर्ग आणि महाराष्ट्राला भूषण वाटावे असे व्यक्तिमत्त्व सिक्कीमच्या प्रगतीला हातभार लावीत आहे, अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाला भेटण्याची मनापासून इच्छा निर्माण झाली. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमचे राज्यपाल म्हणून माननीय श्रीनिवास पाटील सरांची नेमणूक केली तेव्हाच एक कुतूहल निर्माण झाले होते पण श्रीनिवास पाटील सरांना भेटण्याचा योग येईल असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते परंतु सिक्कीम ट्रीपचे बुकींग झाल्याबरोबर मनात आशा निर्माण झाली नि काहीही झाले तरी आपण सिक्कीमला गेल्यावर दादासाहेबांची (माननीय श्रीनिवास पाटील) भेट घ्यायचीच. दोन महिन्यात अनेकवेळा मनात विचार येऊन गेला की, आपण सिक्कीमला गेल्यावर नेमके दादासाहेब (माननीय श्रीनिवास पाटील) कुठे दौऱ्यावर गेलेत तर आपली भेट होणार नाही किंवा टूरच्या नियोजनानुसार आपल्याला वेळ नाही मिळाला तर .... असे जर तरचे अनेक विचार डोक्यात येत होते. एकदाचे २४ डिसेंबरला पहाटे विमानाने सिक्कीमच्या दिशेने झेप घेतली नि पुन्हा मनात कुतूहल निर्माण झाले खरंच आपण सिक्कीमला गेल्यावर दादासाहेबांना भेटू शकू का? एकदाचे गंगटोकला पोहचलोत नि आमच्या टूर मॅनेजर संतोष व केल्टन या दोघांनी दुसऱ्या दिवसाचे सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंतचे वेळापत्रक जाहीर करून टाकले त्यानंतर २६ डिसेंबरचे वेळापत्रकही बारा तासांचे, २७ डिसेंबरला तर आम्ही गंगटोक सोडून लाचुंगाला नि दि. 2८ डिसेंबर २0१७ ला दुपारी साडेतीन वाजता पुन्हा गंगटोकला आम्ही परत आलोत आणि आमच्या टूर मॅनेजरने सर्वांना सांगितले की, "आता तुम्ही आराम करा किंवा गंगटोकमध्ये शॉपिंगला जा किंवा फिरायला जा." अरे वा! खूपच छान! असे मनात म्हणतच राज्यपालांच्या ऑफिसमध्ये म्हणजेच एटीसीला फोन करताच पलीकडून आवाज आला आणि राज्यपालांना का भेटायचे म्हणून विचारणा करण्यात आली. मी तेथील ऑफिसर यांना सांगितले की, "मी महाराष्ट्रातून आली आहे, मला सरांना भेटण्याची इच्छा आहे." त्यांनी मला सांगितले, "सर, कार्यक्रमासाठी गेले आहेत सुरक्षा अधिकारी थापा यांचा मोबाईल नंबर देऊन संपर्क साधायला सांगितला. सर थापा यांना फोन करताच त्यांना मी सांगितले की, "मी महाराष्ट्रातून आली आहे, मला पाटील सरांना भेटायचे आहे." त्यांनी दोन तीन प्रश्न विचारलेत नि नंतर सरांकडे मोबाईल दिला. सरांशी दोन शब्द बोलले नि मोबाईलच्या नेटवर्कने आपला नेहमीचा हिसका दाखवलाच. मोबाईलचे नेटवर्क नेमके मोक्याच्याच वेळी जात असते हे तर ठरलेलेच परंतु पुढच्याच मिनिटाला दादासाहेबांचा कॉल आला आणि मला विचारले की, " तुम्ही कितीजण आहात?" मी क्षणभर विचार केला आम्ही दोघे नवरा बायकोने भेटायला जाण्यापेक्षा सगळ्या ग्रुपलाच घेऊन जाऊ या कारण मी दादासाहेबांविषयी खूप गोष्टी ऐकून होत. दादासाहेबांना महाराष्ट्रीयन माणूस भेटायला गेल्यावर खूप आनंद होतो आणि ते भेटायला येणाऱ्या व्यक्तींना वेळ देत असतात मग दादासाहेबांच्या भेटीचा योग सगळ्यांनाच मिळाला तर.... तसेच राजकीय व्यक्तींविषयी लोकांची जी एक नकारात्मकतेची भावना असते तिला दूर करण्याची नामी संधी का चुकवायची! असा विचार करून मी दादासाहेबांना सांगितले, "दादासाहेब, आम्ही अठ्ठावीस जण आहोत, त्यातले किती लोकं येतील हे मात्र मला सांगता येणार नाही. मी सगळ्यांना विचारते नि तुम्हांला कळविते." दादासाहेब म्हणाले, "मी आता पाच मिनिटांत कार्यक्रम आटोपून चाळीस मिनिटात राजभवनला पोहचतो, तुम्हांला चाळीस मिनिटात पोहचणे शक्य आहे का, तुम्हांला 'फ्लॅग रिट्रिट' चा कार्यक्रमही पाहण्यास मिळेल." मी मागचा पुढचा विचार न करताच तात्काळ 'हो ' म्हटले नि उडी मारतच आमच्या साहेबांना सांगितले, "आपल्याला दादासाहेबांना भेटायला जायचे आहे, ग्रुपमधल्या सर्वांना विचारा कुणाला यायचे आहे." आमचे महाशय मोबाईलवर संवाद साधत साईटवरच्या कामाचा अहवाल घेण्यात दंग होते नि मी काय म्हणते हे क्षणभर कळलेच नाही. मग मी म्हटले, "महाशय, आपल्या हॉटेलपासून राजभवन चार पाच कि. मी. अंतरावर आहे सिक्कीमची ट्रॅफिक मला माहीत नाही पण आपल्याला तयारी करून चाळीस मिनिटात राजभवनला पोहचायचे आहे." मग आमचे साहेब मोबाईल बंद करून आमच्या टूर मॅनेजरकडे गेलेत नि त्यांना सांगितले, "राजभवनला येण्यास कोण कोण उत्सुक आहेत ते सांगा. आमच्या ग्रुपमधल्या वयस्कर व्यक्तींना येणे शक्य नव्हते तर काहीजण लाचुंगाचा खडतर प्रवास करून थकल्यामुळे येऊ शकत नव्हते शेवटी आम्ही तेरा व्यक्ती राजभवनाकडे जायला निघालो. आम्ही अगदी वेळेवर पोहचलो नि फ्लॅग रिट्रीटचा कार्यक्रम पाहण्याचा योग आला. आपल्या ध्वजाचा सन्मान कशाप्रकारे करण्यात येतो ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहीले नि मनोमन तिरंगाला सलाम करीत ऊर अभिमानाने भरून आले. त्यानंतर आमच्या बॅग्ज व मोबाईल बाहेर ठेवून आम्हांला राज्यपालांच्या कक्षात प्रवेश देण्यात आला. कुठलाही सुरक्षेचा बडेजाव किंवा डामडौल न करता राजभवनात प्रवेश करताना आम्हांलाच अवघडल्यासारखे झाले कारण आजकाल आम्हांला मंदिरात जातानाही सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उर्मट वागणुकीचा सामना करीतच जावे लागते नि येथे मात्र याउलट सन्मानाने सुरक्षा अधिकारी आम्हांला राजभवनात घेऊन जातात. किती हा विरोधाभास! पंधरा मिनिटांनी दादासाहेबांचा कक्षात प्रवेश झाला नि राजकारणात राहूनही सुसंस्कृतता व माणुसकी जपणाऱ्या वैचारिक व्यक्तिमत्त्वाचे खरेखुरे दर्शन झाले नि मन प्रसन्न झाले. सगळ्यांशी ओळख करून घेताना प्रत्येकाला बोलतं करण्याची त्यांची शैली मनाला खूप भावली. मी नाशिकहून आले असे सांगताच त्यांनी," वनाधिपती विनायक दादांना ओळखता का ?" "दादासाहेब माझ्या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन विनायक दादांच्या हस्तेच झाले आहे." ते लागलीच उत्तरले, "अरे वा! खूपच छान! " मी त्यांना पुस्तक भेट देताच त्यांनी प्रस्तावनेवरून नजर टाकताच म्हणाले, " परवाच दिल्लीला मी ज्ञानेश्वर मुळे सरांना भेटलो. तुमची व ज्ञानेश्वर सरांची ओळख कशी काय?" " दादासाहेब, ज्ञानेश्वर मुळे सरांना मी प्रत्यक्ष भेटले नाही पण मेलद्वारा मी त्यांच्याशी संपर्क केला नि त्यांनी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहून दिली." माझ्या पुस्तकातील मनोगतावरून नजर टाकताच त्यांनी प्रश्न केला ," तुम्ही धुळ्याचे का? " आम्ही 'हो' म्हणताच त्यांनी आमच्या साहेबांना, तुम्ही काय करता? असे विचारले. आमच्या साहेबांनी विदर्भात काम चालू आहे असे सांगताच त्यांनी विदर्भ महामंडळाच्या बेंबळा प्रकल्पाविषयी विचारले. आमच्याबरोबर असणाऱ्या श्री. व सौ. मढे पाटील यांच्याशी शाळेविषयी व शाळेच्या संस्थापकांविषयी चर्चा केली. श्री. व सौ. पवार यांच्याशी जि. परिषदेतील बांधकाम क्षेत्राविषयी चर्चा केली. श्री. निमकर व त्यांचे बंधू यांच्याशी दूरसंचार विभागाची उजळणी घेतली तर सीईओ श्री. सोळुंके यांची तर प्रकट मुलाखतच घेतली कारण प्रशासकीय सेवेतील अमुक अधिकाऱ्याचे काम कसे चालले! कोण कुठे आहे? व काय काम करीत आहे? हे दादासाहेबांना सिक्कीममध्ये राहूनही चांगलेच ठाऊक होते. औरंगाबादमध्ये डॉ. पुरुषोत्तम भापकर चांगले काम करीत आहेत तर वाशिमच्या भावना गवळी त्यांच्या मतदार संघात चांगले काम करीत आहेत आणि युवा मंडळी राजकारणात चांगले काम करीत आहेत याचे कौतुकही केले. दादासाहेबांमधील खऱ्या व हाडाच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाचे अगदी जवळून दर्शन झाले याचा सर्वांना खूप आनंद झाला. कोण कोणत्या पक्षाचा असा संकुचित विचार न करता योग्य काम करणाऱ्यांची दखल घेऊन कौतुक करणे, असा उदात्त विचार करण्याची गरज दादासाहेबांप्रमाणे आजच्या राजकीय नेत्यांमध्ये का नाही? याचे वैषम्य वाटते. कमी वेळात समोरच्यांकडून जास्तीत जास्त माहिती कशी काढून घ्यावी हे शिकावे तर दादासाहेबांकडून. आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्याप्रमाणेच आजचे आदर्श राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणजेच श्रीनिवास पाटील सर! असे म्हटले तर वावगे ठरू नये. सिक्कीम राज्यात फक्त दोन टक्केच क्राईम आहे नि आपल्या महाराष्टात क्राईमची टक्केवारी न विचारलेलीच बरी. तसेच सिक्कीममधील स्त्री-पुरुष समानता वाखाणण्याजोगी आहे. सुरक्षा रक्षकांमध्ये देखील स्रियांचे प्रमाण जास्त आहे. दादासाहेबांना सिक्कीमचे राज्यपाल म्हणून अभिमान वाटत असतानाच माझा महाराष्ट्र संतांचा, विचारवंतांचा प्रदेश असूनही पाहिजे त्याप्रमाणात वैचारिक प्रगती करू शकला नाही याची खंत त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. राजभवनात अल्पोपहार करून आम्हांला आमच्या हॉटेलमध्ये सोडण्याची सूचना देऊन दादासाहेब त्यांच्या पुढील कामास लागले. जवळ जवळ एक तास कसा आणि कुठे गेला ते कळलेच नाही. आमच्याबरोबर असलेले निमकर साहेब व पुराणिक साहेब म्हणाले, "आज श्रीनिवास पाटील साहेबांना भेटून खूप छान वाटले. राजकीय व्यक्ती इतकी विनम्र व संयमी असू शकते असा कधी आम्ही विचारच केला नव्हता कारण आमचा मुंबईतला मंत्रालयातला अनुभव न विचारलेलाच बरा!" त्यांच्या त्या वाक्यावरून खूप काही कळून चुकले आणि राजकीय व्यक्तीविषयींचें कलुषित मत बदलण्यास सिक्कीमची ट्रिप कारणीभूत ठरली याचा विशेष आनंद झाला.

Comments

  1. What an amazing experience. Politians now a days have lost respect amongst the public. I wish current politians follow the footsteps of these politicians.
    Old is gold, they say ...!! 👌🏼

    ReplyDelete
  2. खूपच छान अनुभव , आम्हाला ही वाचण्याचा योग आला व आमचा ही ऊर अभिमानाने भरून आला

    ReplyDelete

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या