पातोड्यांची आमटी - गोव्यात
पातोड्यांची आमटी - गोव्यात
मी मुलांना घेऊन गोव्याला पाटील साहेबांकडे गेले होते. आता गोव्याला पंधरा दिवस चंपाबाईच्या हातचे जेवण मिळणार म्हणून मी खूश होते. पंधरा दिवस स्वयंपाक घराशी मला काहीही देणेघेणे नाही,असा मी मनाशी ठाम निश्चय केला होता. परंतु सर्वच निश्चय पूर्णत्वास जातीलच असे सांगता येत नाही. माझा हा निश्चय दोन दिवसातच डळमळीत होण्याच्या मार्गावर दिसू लागला. मी गेल्यापासूनच भुपेशने(आमच्या कंपनीतील भागीदार रमेशभाई यांचा चिरंजीव) चांगलीच भुणभुण सुरू केली, "भाभीजी, तुम्ही आहेत तोपर्यंत चंपाबाईला रजेवर पाठवून देऊ." त्याच्या त्या वक्तव्यावर मी म्हणाले, "मी गोवा पाहण्यासाठी आले आहे. तुमची सर्वांची स्वयंपाकीण (कूक) म्हणून आलेली नाही." माझ्या उत्तरावर भुपेशकुमार अगदी अजीजीच्या स्वरात म्हणायचा, "भाभीजी, चंपाबाईच्या हातचं खाऊन इतका कंटाळा आला की, आता तिला आम्ही कायमची रजा देऊन टाकतो आणि नवीन गोवियन लडकीच शोधतो नि दिलिप भाऊला गोवेकर बनवून टाकतो." त्याच्या त्या वक्तव्यावर मीही ठासून म्हणाले, " दिलिप भाऊबरोबर तुम्ही सर्वजण गोवेकर बनून कायमचे गोव्यात राहिले तरी चालेल मला पण मी काही तुम्हांला स्वयंपाक बनवून खाऊ घालणार नाही." अशा वाद संवादाबरोबरच भूपेशकुमार दोन दिवस शांत बसला नि तिसऱ्या दिवशी कंपनीत गेले असता संध्याकाळी सहा वाजता चंपाबाईचा कंपनीच्या फोनवर फोन आला आणि भूपेशनेच फोन उचलला. पलीकडून चंपाबाईने भूपेशला सांगितले, "मॅडमला फोन दे." तर हा पठ्ठया तिला माझ्यासमोर सांगतो, " तुझी मॅडम गेली, दिलिप भाऊबरोबर गोवा फिरायला आणि तू फोन का केला तेही मला माहीत आहे. तू असे कर आज सुटी घे आणि मजा कर.आज आमची भाभी जेवण बनविणार आहे." एवढे बोलून फोन ठेवून दिला. फोनवरचे संभाषण संपताच मी भूपेशला दम दिला, "भूपेश, चंपाबाईला रजेवर पाठवून तू एक चांगले काम केलेस. आता सर्वांनी उपवास करायला हरकत नाही. रात्री नऊ वाजता घरी पोहचल्यावर मी तुमच्यासाठी स्वयंपाक करीन अशा भ्रमात राहू नकोस." अर्थात भूपेशला माझा दम चांगलाच ठाऊक होता. तो मला चिडवून बेजार करू लागला, "भाभी, आमचे किचन किती दिवसांपासून बेचैन होऊन तुमची वाट पाहत आहे. त्याला पातोड्यांच्या आमटीच्या झणझणीत मसाल्याच्या फोडणीच्या वासाचा नैवेदय हवा आहे." अशा या भूपेशच्या चिकाटीला सलाम करून मला माझा निश्चय मोडण्याशिवाय पर्याय नसे. शेवटी त्याला दम देत मी म्हणायची, "महाशय, जरा चंपाबाईला फोन लावण्याचे कष्ट करा आणि तिला सांगा, आलं, लसूण, कांदा, खोबऱ्याचे वाटण करून ठेवा." मी असे म्हणताच भूपेशकुमार टुणकन उडी मारतच," वा! क्या बात है! भाभीजी आत्ता फोन लावतो नि चंपाबाईला सांगतो."
रात्री आम्ही सर्वजण घरी पोहचताच मला मात्र स्वयंपाक घरात जाऊन पातोड्यांची आमटी करण्याच्या तयारीला लागण्याशिवाय पर्याय नसे. सर्वजण हातपाय तोंड धुऊन भाजी होण्याची वाट पाहत असत कारण सगळ्यांना कडकडून भूक लागलेली असायची. चंपाबाईने तयार करून ठेवलेले वाटण तेलात खरपूस रंगावर तळून त्यात गरम मसाला, लाल तिखट टाकून पाणी सोडताच मसाल्याचा घमघमाट सर्वत्र दरवळायचा नि सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटायचे. पातोड्या भाजीत सोडताच भाजीला उकळी येताच सर्वजण ताट वाटया घेऊन भाजी खाण्यासाठी उत्सुक असायचे. भूपेश व त्याचे वडील दोघेही एकदम खूश कारण खूप दिवसांनी आवडीची भाजी खायला मिळाली तर, याउलट पाटील साहेब ! गोव्याला आल्यावर बायकोला स्वयंपाक करावा लागला म्हणून आतल्या आत फुरंगटून बसत. जेवायला बसल्यावर मी एकदा पाटील साहेबांकडे पाहायचे तर एकदा भुरके मारीत आमटी वरपणाऱ्या त्या दोघा बापलेकांकडे पाहायचे. त्यात माझी दोन्ही कार्टून्स(मुलगा,मुलगी) तर अलगच दुनियेत. त्यांना त्यांची आवडती खिचडी व तळलेले पापड मिळण्याशी मतलब आणि जेवणानंतरचे भूपेश दादाकडून मिळणाऱ्या आईस्क्रीमची अवीट गोडी अजून काय पाहिजे. अशा या जेवताना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तऱ्हा पाहिल्या की वाटते, देवाने हे जग किती अजब प्रकारच्या माणसांनी बनविले आहे. एकच पातोड्यांची आमटी. ती भूपेशला व त्याच्या वडिलांना आवडते म्हणून बनविण्यातली मजा अनुभवणारी मी. ती खाऊन तृप्त होणारे ते बापलेक आणि आमटी आवडत असूनही मी गोव्याला आल्यावर स्वयंपाक करते याचे वाईट वाटून आमच्या पाटील साहेबांना बेचव वाटणारी आमटी आणि आमटीशी काहीही देणेघेणे नसणारी माझा मुलगा व मुलगी. त्यातच रात्री जेवणाला उशीर झाल्यामुळे चंपाबाईला आमटी पाठविता आली नाही म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तिचा ऐकावा लागणारा तोरा.
गोव्याला येणारे जगभरातले पर्यटक माश्यांवर ताव मारतात नि याउलट आमचे हे अजब गजब प्राणी प्रत्येक सुटीत माझ्यामागे पातोड्यांच्या आमटीचा तगादा लावतात. आता काय म्हणावे या खाद्य संस्कृतीला!
माझ्या हातची पातोड्यांची आमटी भूपेशच्या सर्वच नातलगांना खूप आवडते. त्याच्या काकू लक्ष्मी भाभी यांना भेटायला गेले होते तेव्हा त्या मला म्हणाल्या होत्या, " ज्योत्स्ना, मला तुझ्या घरी पातोड्यांची आमटी खायला यायचे आहे. " मी म्हणाले ,"भाभी,केव्हाही या पातोड्यांची आमटी खायला." त्यानंतर त्यांच्या दोघा मुलांना मी फोन केला नि भाभीला घरी जेवायला घेऊन या. त्या दोघांनी ,"भाभी, पुढच्या आठवडयात घेऊन येतो." असे सांगितले. त्यानंतर मी यवतमाळला पाटील साहेबांबरोबर पंधरा दिवस गेले नि नाशिकला परत आलो तर काय ....... ! पातोड्यांची आमटी खायला लक्ष्मी भाभी होत्याच कुठे ! पातोड्यांची आमटी खाण्याची लक्ष्मी भाभींची इच्छा तशीच अतृप्त राहिली. त्यादिवसांपासून ज्याने जी इच्छा व्यक्त केली त्याला त्याचवेळेला खाऊ घालणे महत्त्वाचे नाहीतर मनात नेहमीच एक खंत राहून जात असते.
पातोड्यांची आमटी म्हणताच गोव्यातील आमटी तर आठवते त्याचबरोबर लक्ष्मी भाभींना आयुष्याच्या शेवटच्या क्षणी पातोड्यांची आमटी खाऊ घालू शकले नाही याचे दुःख नेहमीच होत असते.
Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.