मिनी टिफिन

    मिनी टिफिन            

              प्रवासात वेळोवेळी अनेक हॉटेल्सला भेट दयावीच लागत असते आणि काही हॉटेल्स कायमच्या  स्मरणात राहतात  त्या एकतर चांगले जेवण मिळाले म्हणून किंवा सर्वात निकृष्ट , बेचव जेवण मिळाले म्हणून किंवा मेनूच्या गुणवत्तेपेक्षा अधिक दर आकारल्यामुळे किंवा हॉटेलच्या उत्कृष्ट वातावरण निर्मितीमुळे किंवा हॉटेलमधील वेटर , मँनेजर यांच्या सौजन्यपूर्ण व्यवहारामुळे . 
               असेच एक हॉटेल आमच्या सर्वांच्या कायमचे लक्षात राहील कारण हे हॉटेल आम्ही कधीच विसरू शकत नाही ते त्याच्या खास अशा खासियतमुळे .  १ नोव्हेंबर २०१४ ला आम्ही तीन कुटुंबिय कन्याकुमारीहून मदुराईला जाण्यास निघालो असता तिरुनेलवेली ( tirunelveli ) महामार्गाला लागलो असता रस्त्यात एक हॉटेल दिसताच आम्ही नाश्त्यासाठी गाडया थांबवल्यात . हॉटेल चांगले दिसत असल्यामुळे सर्वांनी नाश्ता करून पुढे जाण्याचे ठरवले . 
                आम्ही गप्पा करीत असतानाच वेटरने आमच्या ऑर्डरनुसार नाश्त्याची प्लेट आणून ठेवताच सगळ्यांच्या तोंडून एकच शब्द निघाला , " वा ! आजचा नाश्ता तर फारच कलरफूल आहे . " ती नाश्त्याची प्लेट पाहूनच मन प्रसन्न झाले आणि खाल्ल्यानंतर तर विचारायलाच  नको . जितका नाश्ता दिसायला छान तितकाच तो चविष्टही होता . आम्हांला देण्यात आलेल्या नाश्त्यात नऊ पदार्थ होते आणि तेही छानप्रकारे प्लेटमध्ये सजवून . ती नाश्त्याची प्लेट पाहून मला खाना खजानाचे झाडून सर्व शेफ आठवलेत . कारण त्या प्लेटमध्ये नऊ पदार्थ अगदी व्यवस्थितरित्या मांडले होते . पिवळ्या रंगाच्या चौकोनी प्लेटमध्ये इडली ,उत्तप्पा ,मेदूवडा , पुदिन्याची चटणी , खोबऱ्याची चटणी , लाल चटणी , भाताचा व मुगाच्या डाळीचा एक पदार्थ व शिरा त्या डीशमध्ये समाविष्ट होते . आणि या नाश्त्याच्या मेनूला नाव होते  ' मिनी टिफीन . '  आम्ही नाश्ता करीत असताना मी वेटरला आमचा फोटो काढण्याची विनंती केली असता माझे पती म्हणाले , " फोटोच काढायचा होता तर त्याने प्लेट आणून दिली तेव्हाच काढायचा होता आता तर प्लेटमधले निम्मे पदार्थ पोटात गायब झालेत ." यावर मी त्या वेटरला सांगितले , " तू असा फोटो काढ की सर्वांच्या प्लेटमधले पदार्थ या महाशयांनीच फस्त केलेत असे वाटले पाहिजे ." माझ्या या उद्गारासरशी त्याच्यासह सर्वच हसलेत . आणि त्याने खरोखर तसाच फोटो काढला .  असा हा मिनी टिफीन खाऊन सगळे अगदी तृप्त झालेत . आम्हांला सेवा पुरविणारा वेटर हा कार्यतत्पर व सौजन्यतेने वागणारा होता . त्याने आम्हांला आदराने विचारले , " तुम्हांला आमच्या मेनूबद्दल काही सुचवायचे असल्यास सुचवू शकता ! " त्याच्या या वक्तव्यावर आम्ही काय बोलणार ! कारण त्याला काही सुचविण्याऐवजी मेनू मनापासून आवडल्याचे प्रशस्तिपत्रक देऊन आम्ही त्याचा निरोप घेतला . 
              हॉटेलमध्ये नाश्ता करायला गेले की 'श्री श्रावण भवन ' हॉटेल आणि तेथील कर्तव्यतत्पर वेटर मुनिया व नवरंगी डिश हमखास आठवते . 


Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या