हरवलेल्या बॅगेला धन्यवाद

हरवलेल्या बॅगेला धन्यवाद 
           
             चि. स्वप्नील व दीपश्री दोघेही १२ डिसेंबर २०१८ ला स्वीडनला जाण्यासाठी मुंबईहून सकाळी दहा वाजता विमानाने निघालेत नि कार्गोमध्ये चार बॅग्ज टाकून दोन बॅग्ज त्यांनी स्वतःजवळ ठेवल्यात. रात्री साडेबाराला (भारतीय वेळेनुसार) स्टॊकहोमला पोहचले असता कार्गोने आलेल्या चार बॅगांपैकी फक्त तीनच बॅग्ज मिळाल्यात नि एक बॅग काही मिळाली नाही तेव्हा त्यांनी एअरपोर्टवर नियमानुसार एक बॅग न मिळाल्याची नोंद केली नि फार्म भरून कार्यवाही पूर्ण केली. 
              स्वप्नील यापूर्वी दोनदा स्वीडनला जाऊन आल्यामुळे त्याला स्वीडनच्या वातावरणाची तशी सवय झालेली होती पण दीपश्री (सून) प्रथमच स्वीडनला जात असल्यामुळे तिच्यासाठी सर्वकाही नवीनच होते. त्यात बॅग हरवल्याची खंत होतीच. रात्री तिच्याशी बोलताना तिला सांगितले, "बॅग हरवल्याचे दुःख वाटून घेऊ नकोस, तुम्ही एवढ्या लांब सुखरूप पोहोचलात याचाच आनंद खूप आहे. बॅग सापडली तर ठीक आहे, नाहीच मिळाली तर वस्तू गेल्याचे दुःख करू नकोस." असे सांगितले तेव्हा दीपश्रीला माझे म्हणणे पटले नि नवा देश, नवे वातावरण याचा आनंद घेण्यास ती तयार झाली. 
               व्हिडीओ कॉल करून दीपश्रीने सगळे घर फिरून कुठे काय ठेवले? व कसे ठेवले? याचे अगदी सविस्तर वर्णन करून दाखविले तेव्हा असे वाटत होते की, ती व स्वप्नील अगदी माझ्यासमोरच आहेत. खूप छान वाटले पण लागलीच ती म्हणाली, "आई, सगळेच बदलल्यासारखे वाटते. आपल्याकडची गजबज किती छान वाटते, ते येथे आल्यावर कळते. इतक्या शांततेची आपल्याला बिलकूल सवय नसते, त्यामुळे सगळेच वेगळे वाटते. अशा बऱ्याच गप्पा झाल्यानंतर आम्ही दोघींनी एकमेकींची ख्यालीखुशाली विचारून फोन ठेवला."  
               दुसऱ्या दिवशी सकाळीच दीपश्रीचा फोन आला आणि ती लागलीच म्हणाली, "आई, काल आपली बॅग हरवली त्या बॅगेत चहा, साखर होते त्यामुळे कालपासून चहा घेतला नाही तर खूपच चुकल्यासारखे वाटत होते. आज चहा घेताना इतके छान वाटत आहे ना! की विचारूच नका." तिचा सकाळी सकाळी चहा घेत असताना आलेला फोन खूप काही सांगत होता तेव्हा, मी तिला म्हणाले, "कोणतीही निर्जीव वस्तू, पदार्थ यांचे मोल आपल्या जीवनात किती असते हे तुला हरवलेल्या बॅगेमुळे कळू शकले. जेव्हा माणसाला निर्जीव वस्तू,पदार्थ यांचे मोल कळते तेव्हाच माणसाला सजीवांचे महत्त्व नि विशेष करून माणसांचेही मोल कळत असते. आपल्या भारतीय संस्कृतीत निर्जीव वस्तूला देखील चुकून पाय लागला तर नमस्कार करण्याची पद्धत मला खूप आवडते नि आपल्या संस्कृतीचा अभिमानही वाटतो पंरतु आज दुर्दैवाने दुसऱ्याला लाथाडणाऱ्या महाभागांना आपल्या संस्कृतीचा विसर पडतो तेव्हा खूप वाईट वाटते. 
               लहानपणी दिव्यांची पूजा का करायची? नवी गाडी घेतली तर त्याची पूजा का करायची? असे अनेक प्रश्न पडत असत परंतु जसजसे आपण मोठे होतो नि जेव्हा त्या वस्तूंचे आपल्या जीवनातील प्रयोजन लक्षात येते तेव्हा त्या वस्तूंविषयी मनांत अनेक भावभावना जोडल्या जात असतात. या विश्वात असणारा प्रत्येक घटक कुठल्या ना कुठल्या नात्याने आपल्याशी जोडला जात असतो म्हणूनच संत ज्ञानेश्वर म्हणतात, 'हे विश्वचि माझे घर' ते काही उगीचच नव्हे! पुन्हा हरवलेल्या बॅगेमुळे संत ज्ञानेश्वरांचे उदगार नव्याने येऊन उभे ठाकलेत. ते एक वेगळा आयाम लेवून. 
                   दीपश्रीलाही माझे म्हणणे पटले नि ती म्हणाली, " खरंच आई, हरवलेल्या बॅगेमुळे खूप काही शिकायला मिळाले. प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची असते, हे कळले," पुन्हा एकदा दीपश्रीच्या समजूतदारपणाचे कौतुक वाटले नि हरवलेल्या बॅगेला मनापासून धन्यवाद दिलेत.    
©ज्योत्स्ना पाटील                                

Comments

  1. Haravleli ek bag Khup kahi shikavun gheli....Ti punha sapadlyavar jo Aanand milala tyache mol kashatach hou shaknar nahi

    ReplyDelete

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या