आपल्या पाल्याची आवड जाणून घ्या

 आपल्या पाल्याची आवड जाणून घ्या  
              

                 इयत्ता दहावीच्या परीक्षा जवळ येत आहेत आणि गणित, विज्ञान व इंग्रजी याच विषयांना महत्त्व देणाऱ्या पालकांना मराठी, हिंदी व समाजशास्त्र या विषयांचे महत्त्वच कळले नाही त्यामुळे भविष्यात समाजाला याची फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे कारण मातृभाषेचा अभ्यास योग्यप्रकारे केला तरच मुलांवर सुसंस्कार होतात, नैतिक मूल्ये ही मातृभाषेतूनच रूजत असतात. तसेच समाजशास्राचा अभ्यास चांगल्याप्रकारे केला तरच मुले चांगले नागरिक बनून देशासाठी योग्य काम करतील. आज डॉक्टर, इंजिनियर यांचे प्रमाण मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्यामुळे त्यात यशस्वी करियर करणे म्हणजे खूपच कठीण झाले आहे. आज अनेक नवनवीन क्षेत्र मुलांसाठी उपलब्ध झाली आहेत त्यामुळे आपल्या मुलाचा कल, आवड ओळखून शिक्षण किंवा कौशल्य शिकविण्यातच शहाणपण आहे. आज वेळ व पैसा दोन्ही गोष्टी बहुमूल्य आहेत त्यामुळे लाखो रुपये क्लासेसची फी भरून मुलांना न आवडणाऱ्या क्षेत्रात टाकून वेळेचा व पैशांचा अपव्यय करून मुलांना नैराश्यात टाकून त्याची व कुटुंबाची शांतता भंग करू नका. हीच कळकळीची विनंती आहे. 
                   क्लासेसमधील नोकरी सोडून दहा-बारा वर्षे झालीत तरीदेखील प्रत्येक जून महिन्यात तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही .  जून २००६ मधील इयत्ता दहावीच्या निकालाचा दिवस . नात्यातील व मैत्रिणींच्या मुलांचे अभिनंदन करण्याकरिता मी टेलिफोनजवळ गेले . रिसिव्हर उचलताच दारावरची बेल वाजली म्हणून मी फोन न करताच रिसिव्हर ठेवून दरवाजाकडे वळले . दरवाजा उघडताच अश्विनी पेढयाचा बॉक्स हातात घेऊन उभी . तिला आत घेतले . तिने माझ्या पायांवर डोके टेकवताच मी तिला आशीर्वाद देऊन उठवले तर तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि तोंडातून शब्द बाहेर पडण्याचे नाव घेत नव्हते . तिने माझ्या हातावर पेढा ठेवला आणि डोळे पुसू लागली परंतु तिचे डोळे काही कोरडे होण्याचे नाव घेत नव्हते . तिला खूप बोलायचे होते परंतु तोंडातून शब्दही फुटत नव्हता . तिची मनःस्थिती ओळखून मी शांत राहिले . यशाचा खरा आनंद काय असतो ! याचा अनुभव मी त्यादिवशी खऱ्या अर्थाने अनुभवला होता . पाच मिनिटांच्या त्या शांततेने मला खऱ्या सुखाची अनुभूती दिली . अगदी तृप्त मनाने अश्विनीने शांततेचा भंग केला . ती म्हणाली , "मॅडम , तुमच्यामुळेच मी दहावी पास झाले आणि आता पुढे शिकणार आहे . "तिचा पुढे शिकण्याचा उत्साह पाहून मला खूप आनंद झाला . 
     अनेक विदयार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असतात परंतु अश्विनीचे दहावीत उत्तीर्ण होणे हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखे नव्हते . ती सलग दोन वर्षे दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाली होती . तेही इतिहास व हिंदी या दोन विषयात . ऑक्टोबर , मार्च करीत तिने चार वेळा परीक्षा देऊनही ती या दोन विषयात अनुत्तीर्ण झाल्यामुळे आत्मविश्वास गमावून बसली होती . शेवटचा प्रयत्न म्हणून तिने पुन्हा ऑक्टोबरच्या परीक्षेचा  फॉर्म भरला होता आणि एका खासगी क्लासेसमध्ये तिने प्रवेश घेतला असता त्याच कालावधीत मी त्या क्लासेसमध्ये मराठी , हिंदी व समाजशास्र इ . विषय शिकवित होते . प्रत्येक विद्यार्थ्याने माझ्या तासाला उपस्थित राहण्याची मी सक्ती केली होती . तरीदेखील अश्विनी आठवडयातून दोन दिवस क्लासला अनुपस्थित राहत  होती .  अश्विनी आठवडयातून दोन दिवस क्लासला अनुपस्थित राहायची तेव्हा मी तिला त्यामागचे कारण विचारले असता ती रडू लागली . तिला शांत केल्यावर तिने सांगितले , "मॅडम ,दोन दिवस मला सलाईन व रक्त घेण्याकरिता दवाखान्यात राहावे लागते . "तिच्या आजाराचे गांभीर्य लक्षात आल्यावर मी तिच्याकडे अधिक लक्ष देऊ लागले . कोणतीही अडचण असल्यास फोन करून ती माझे मार्गदर्शन घेऊ शकते ,असे मी तिला सुचविले होते . ऑक्टोबरला परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण अभ्यासक्रम दोन महिन्यात पूर्ण करण्याचे बंधन आम्हां शिक्षकांना पाळावे लागत असे . दोन महिन्यात शक्य होईल तेवढी तयारी अश्विनीकडून करून घेतली परंतु तिची स्मरणशक्ती क्षीण असल्यामुळे ती फक्त हिंदी विषयात उत्तीर्ण झाली आणि समाजाशास्र विषयात अनुत्तीर्ण झाली . तिचा पाचवा प्रयत्नही असफल झाल्यावर तिने शिक्षणाच्या आशेवर पाणी सोडले होते . माझा नि अश्विनीचा संपर्क फक्त दोन महिन्यांपुरताच होता त्यानंतर ऑक्टोबरचा दहावीचा निकाल लागल्यावर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे दूरध्वनी आले तर काही विद्यार्थ्यांनी पेढे देऊन प्रत्यक्ष भेट घेतली नि मी पुन्हा मार्चच्या परीक्षेकरिता बसलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात गुंतले असता एके दिवशी अचानक अश्विनी तिच्या वडिलांना घेऊन माझ्या घरी आली . अश्विनीचे वडील मला म्हणाले , "मॅडम , अश्विनी पुढे शिकायचे नाही म्हणते पण तुम्ही तिची स्पेशल टयूशन घेणार असाल तर ती मार्चच्या परीक्षेसाठी फॉर्म भरण्यास उत्सुक आहे ." अश्विनीच्या वडिलांचे उद्गार ऐकून खरी परीक्षा अश्विनीची नसून माझीच आहे असे मला वाटू लागले . कारण घर व खासगी क्लासमधील नोकरी तसेच दोन विद्यार्थ्यांची स्पेशल टयूशन घेत असल्यामुळे अश्विनीचा क्लास घेणे मला शक्य नव्हते पण अश्विनी हटूनच बसली , "मॅडम , नाही म्हणू नका . मी फक्त शेवटचा प्रयत्न करणार आहे आणि तेही तुम्ही टयूशन घेण्यास होकार दिला तरच . " तिच्या व तिच्या  वडिलांच्या आग्रहास्तव मी तिला मार्गदर्शन करण्याचे ठरविले परंतु मी तिला अट घातली की तुला सलग दोन किंवा तीन तास माझ्या घरी बसून अभ्यास करावा लागेल . माझी अट मान्य करून त्याप्रमाणे अश्विनीने दोन दोन तास लेखन केले . आज पाठ केलेल्या प्रश्नांची उत्तरे दुसऱ्या दिवशी ती विसरून जात असे . त्यामुळे पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध या प्रकरणांचा अभ्यास करताना युद्धाचे दृश्य तिच्या डोळ्यांसमोर उभे करून व टी . व्ही . तील इस्राईल व पॅलेस्टिनी यांच्यातील युद्धाच्या दृश्यांवरून महायुद्धाचे विक्राळ रूप तिला स्पष्ट करून सांगितल्यावर तिची इतिहास विषयात रुची वाढली आणि तिच्या अध्ययन क्षमतेत भर पडत गेली . समाजशास्राचा अभ्यास घेताना सोप्या व तिला आकलन होईल त्याच पाठ्यांशावर भर देऊन ती दहावी उत्तीर्ण कशी होईल ? याचाच विचार करून मी तिला शिकविले . माझ्या मार्गदर्शनानुसार अश्विनीने कष्ट घेतलेत आणि तिच्या त्या मेहनतीला आज फळ मिळाले होते . आपण पुढे शिकू शकत नाही याच विचाराने हवालदिल झालेली अश्विनी आज निकाल घेऊन घरी न जाता प्रथम माझ्याकडे आली होती आणि तिला जग जिंकल्यासारखे वाटत होते . दरवर्षी दहावीच्या निकालाच्या दिवशी मला अश्विनी महाले या माझ्या विद्यार्थिनीचा आनंदी चेहरा स्मरत असतो आणि ९५ %च्या पुढे गुण मिळूनही दुसऱ्याच्या मुलाला ९५. ५ %गुण मिळालेत म्हणून दुर्मुखणारे पालक व पाल्य पाहिले की वाटते , आनंद , सुख व दुःख हे व्यक्तीसापेक्ष आहे . याची प्रकर्षाने जाणीव होते . 
         पेठ सुरगाणा या आदिवासी भागात राहणारे अश्विनीचे वडील मोठया मुलीप्रमाणेच दुसऱ्या मुलीनेही शिकावे म्हणून किती सतर्क होते . याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे . मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या पालकांनी अश्विनीच्या वडिलांचे अनुकरण करावे हीच विनंती . 
©ज्योत्स्ना पाटील
         

Comments

  1. जसे गरूड उंच भरारी घेऊ शकतो पण पोहू शकत नाही मासा पोहू शकतो पण उ़ंच भरारी घेऊ शकत नाही तसे प्रत्येक मुलाची आवड वेगळी असते हे पालक व शिक्षकांनी लक्षात घेऊन मुलांना मार्गदर्शन करावे हाच आपल्या लेखाचा उद्देश . लेख आवडला.

    ReplyDelete
  2. लेख आवडला...आजचे समाजातील वास्तव चित्र
    ह्या लेखात मांडलेले आहे खरचं पालकांना विचार
    करण्यास लावेल अशीच आज परिस्थिती आहे
    मागणी व पुरवठा हेच समीकरण विद्यार्थी आणि
    नोकरी व शिक्षण हे गणित कुठे तरी बिघडत
    चालले समाजाने दखल घेणे आज ही काळाची गरज ओळखून हा लेख वाचतांना जाणवले.

    ReplyDelete

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या