माझ्या भ्रमंतीवरील ताशेरे
माझ्या भ्रमंतीवरील ताशेरे
मैत्रिणींचे फोन आलेत की सगळ्यांचे उद्गार असतात,"कालच तर तू नाशिकला होतीस नि आज वर्ध्याला पोहचली पण." पुन्हा पंधरा दिवसांनी मैत्रिणींचे फोन आलेत की, त्या हसतच म्हणतात, "वर्ध्यालाच आहेस की झाली पसार." मग मी म्हणते, " पसार व्हायला मी काय दरोडेखोर वाटली का तुम्हांला!" मैत्रिणी हसतच म्हणतात, "तुझा काही भरवसा नाही. एखादी लायब्ररी लुटली नाही म्हणजे झालं." मग त्यांना सांगावं लागतं आता मी लायब्ररीतून पुस्तके आणणेच बंद केले. वाटते तेव्हा पुस्तक विकत घेऊन वाचते त्यामुळे लायब्ररी सुरक्षित आहे. काळजी नका करू." मग मी हळूच सांगते कालच वर्ध्याहून पुण्याला आली." आता मी पुण्याला असल्याची बातमी सगळ्या मैत्रिणींपर्यंत पोहचलेली असते नि मग पुन्हा चार-पाच दिवसांनी दुसऱ्या मैत्रिणीचा फोन येतो तर मी तेव्हा नेमकी साक्री किंवा धुळ्याला असते नि मग ती मैत्रीण सर्व मैत्रिणींना लाईव्ह टेलिकास्ट देऊन मोकळी होते मग त्यातल्या दोघी-तिघींचे फोन येतात, " आम्हांला माहीत नाही यावेळेस तू ट्रीपला आलंच पाहिजे."
दुसरी मैत्रीण जाम चिडून म्हणते, "प्रुथ्वीवर आहेस की नेपच्यूनवर." तिचा वरती चढलेल्या नूरला खाली आणण्यासाठी मीही म्हणते, "मंगळ, बुध, गुरू सोडून तुला नेपच्यूनच का आठवला बाई. बरं तर बरं मी फक्त महाराष्ट्रातल्या चारच जिल्ह्यात फिरते नि लोकं एकेका दिवसात दोन दोन-तीन तीन देश फिरतात त्यांना का नाही पाठवत दुसऱ्या ग्रहावर." त्यावर आमच्या या मैत्रीणबाई म्हणतात, "आमचा संबंध तुझ्याशी आहे लोकांशी नाही. ते देश फिरोत की खंड फिरोत की महासागर पालथे घालोत आम्हांला काय देणे-घेणे त्यांच्याशी." अरे वा, असे कसे. एखाद्या कंपनीचा सीईओ असो किंवा राजकीय नेते हे जगभ्रमंती करतात तेव्हा तुमच्या खिशातले काही पैसे तर जातात ना!" ती चिडून म्हणते, "अगं ए बये, तुझं ते गणित जरा बाजूला ठेव. आधीच त्या गणिताने आमचा आख्खा भूतकाळ खाऊन टाकला, आता तरी वर्तमानात सुखासुखी जगू दे." ती फोन ठेवणार तितक्यात मी ओरडले, "अगं त्या नेपच्यूनचं काय झालं, तुझा भूगोल नक्कीच चांगला होता वाटतं म्हणून तुला मंगळ, बुध, गुरू सोडून एवढे अवघड नाव लक्षात राहिले." आता ही बया भडकणार हे माहीत होतेच, ती चिडूनच म्हणाली, "अगं आजकाल लोकांना विदेशाचेच वेड आहे ना! विदेशी बाईच्या नावाने गळे काढणारेही ऊठसूठ विदेशातच तर असतात. स्वदेशी स्वदेशी करत परदेशी पर्यटनच अधिक आवडते म्हणून मलाही विदेशी नाव असलेला ग्रह आवडतो त्यात तुला एवढे जळायला काय झाले." मला काही जळायला वगैरे झाले नाही. तो नेपच्यून काही माझा बॉयफ्रेंड नाही. आजच्या सिनेतारकांसारखा. मला माहीत आहे तो फक्त ग्रह आहे हं! "बाईसाहेब मी ग्रह आहे म्हणताच पुन्हा बरसल्या, "ए, तुला काय म्हणायचे आहे, तू काहीही ग्रह करून घेऊ नकोस हं. तू ना शितावरून भाताची परीक्षा करणं सोडून दे. आजकाल ती शितंही प्लॅस्टिकची असतात मेड इन चायना." अरे बाप रे! धन्य आहे त्या व्हाट्सएपची. कालपर्यंत जीकेचा नि तुझा छत्तीसचा आकडा होता नि आज तर तू जीकेची चँम्पियन झालीस. कौन बनेगा करोडपतीमध्ये जायला हरकत नाही. त्यातले एखादे लाख मात्र माझे." मी असे म्हणताच बाईसाहेबांनी दोन-चार शिव्यांचा मारा करीत फोन कट केला. तिच्या शिव्या ऐकून मला मात्र खूप हसायला आले. आता या बयेने जर दुसऱ्या कुणाला शिवी दिली असती तर नक्कीच झिंज्या ओढल्या असत्या. काय गंमत आहे ना शब्दांची पण! शेवटी शब्दांनाही स्थळ, काळ, परिस्थितीचे वलय असतेच.
यात प्रत्येक मैत्रिणीचा एक ठरलेला डायलॉग असतोच, "तुझी काय मजा आहे. आज येथे तर ऊद्या तेथे आम्ही काय एकाच ठिकाणी."
आता या माझ्या मैत्रिणींना काय माहिती की 'विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर' घेऊन फिरणे म्हणजे काय कसरत असते. 'जावे ज्याच्या वंशा तेव्हाची कळे' असे आपल्या पूर्वजांनी उगीचच नाही म्हणून ठेवले. माझ्या फिरस्तीचा हेवा करणाऱ्या मैत्रीणी चार-पाच दिवस कुठे फिरायला गेल्यात का मग हळूच म्हणणार, "बाप रे! तू कसा काय प्रवास करतेस इतका. आम्ही तर दोन दिवस गेलो तरी अंग दुखायला लागले. जेवणाचे हाल वेगळेच नि त्यात अँसिडीटी विचारूच नको." मैत्रिणी असे म्हणतात तेव्हा मला मात्र खूप हसायला येते मग मी पण हळूच म्हणते, आता तरी कळाले का, जावे ज्याच्या वंशा तेव्हाची कळे. हो माते चांगलेच कळले! आता पुन्हा कुठे गायब तर नाही ना होणार?
"अगं ए बये, गायब व्हायला मी काही आमदार वगैरे नाही." "अगं, आजकाल कशाचाच भरवसा देता येत नाही. रात्रीतून काय होईल ते सांगता येत नाही. सकाळी उठून कोणता बॉम्ब पडेल याचीच धास्ती वाटायला लागली. त्यामुळे न जाणो तू पहाटे उठून पण पसार व्हायचीस." "पहाटे उठून पसार व्हायला मला काही मंत्रीपदाची शपथ घ्यायची आहे का?"
"अरे वा, शाळेत नागरिकशास्त्राचा 'ओ का ठो' कळत नव्हते नि आता तुला आमदार, खासदार,मंत्रीपद, शपथविधी सारं काही कळायला लागले."
मग तुला काय वाटते, मी काही एकाधिकारशाहीत वावरते का! मी लोकशाही असलेल्या देशाची नागरिक आहे."
बरं बये, माझी सपशेल माघार तू खरोखर लोकशाहीत वावरते नि श्रीरामाच्या क्रुपेने आमची लोकशाही फळफळत राहो हीच साठा उत्तराची कहाणी सफळ, संपूर्ण होवो!
ता.क. तूर्तास मी माझे दौरे रद्द केले आहेत.
©ज्योत्स्ना पाटील
Chan lihla ahe 👍🏼
ReplyDelete