परीक्षार्थी



                      परीक्षार्थी
           नाशिकहून पुण्याची घरगुती भटकंती नि त्या भटकंतीतील परीक्षा घेणारा व पाहणारा दिवस.
             एखादा दिवस आपली परीक्षा पाहणारा व आपल्यातलं सगळं धैर्य व सहनशीलतेचा कस पाहणारा ठरतो. असाच आजचा दिवस १९ नोव्हेंबर २०१९चा! १३ नोव्हेंबरला मुलगा एक महिन्यासाठी यूकेला गेला नि इकडे पुण्याला सूनेचा आठ दिवसांनी एका कंपनीत इंटरव्ह्यू असल्यामुळे मला पुण्यालाच थांबावे लागले. मी पुण्याला आली म्हणून सासूबाईंना पुतण्याकडे ठेवले. मी पुण्यात आल्यावर दोन दिवसांतच सासूबाई पडल्यात नि त्यांना कंबरदुखीचा त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी एक्स-रे, गोळ्या औषधे दिलीत पण काल त्यांच्या बोलण्यावरून जाणवले की त्यांना त्रास होत आहे आणि माझी कमी जाणवते आहे. पती महाशयांनाही आठ दिवसांपासून व्हायरल इन्फेक्शनने बेजार केले आहे. इकडे आड तिकडे विहीर अशी माझी अवस्था. त्यातच मला अपरिचित असणाऱ्या व्यक्तीने पुरस्कार घेण्यासाठी आमंत्रित केलेले अर्थात त्यांना मी कळविले होते की , मला माफ करा, मी पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहू शकत नाही. पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित न राहणे म्हणजे अनोळखी व्यक्ती जेव्हा आपल्या कार्याची दखल घेऊन आपले कार्य समाजासमोर आणीत असतात त्यांचा अपमान केल्याची कुठे ना कुठे टोचणी लागून अपराधीपणाची भावना निर्माण होत असते.


        आजच बालपणीच्या मैत्रिणीच्या भाचीचे लग्न नाशिकला माझ्या घराजवळच. ती लंडनहून लग्नासाठी आलेली तिला लग्नात भेटण्याची इच्छा असूनही भेटू शकले नाही, याची रूखरूखही वेगळीच. असा हा आजचा दिवस नेहमीच स्मरणात राहील तो माझी परीक्षा घेणारा म्हणून! शेवटी आपण आयुष्यभर परीक्षार्थीच असतो.
       काय अजब जगणे असते माणसाचे. तो फक्त एकावेळी एकाच गोष्टीला न्याय देऊ शकतो, हेच खरे. अशा अनेक अनुभवातून नेहमीच जावे लागते नि कोण आपल्याकडे आले नाही नि मग आपण त्यांच्याकडे का म्हणून जावे? अशा प्रश्नात न शिरता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती गोष्ट करणे हाच विचार करून पुढे जाण्यास चालना मिळते. जीवनाच्या अशा परीक्षांनी दिलेली उत्तरे आपणच शोधायची आणि कुठे त्या गोष्टींचे उपयोजन करायचे हे ज्याच्या त्याच्या बुद्धीवरच अवलंबून असते एवढे मात्र खरे.
©ज्योत्स्ना पाटील

Comments

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या